इतिहासाचे एक पान.. १०

कृतज्ञता

संकल्प करत रहाणं हा मनुष्याचा स्वभाव असतो. मीहि असाच एक सकंल्प केला. दहा-पंधरा वर्षे झालीं. परंतु तो संकल्प तसाच राहिला होता. श्री. यशवंतराव चव्हाण यांचं चरित्र लिहावं असा तो संकल्प होता.

त्यांचा-माझा परिचय तसा जुना; परंतु यशवंतरावांची धांवपळ आणि माझा तो संकल्प यांची गाठ-भेट घडणं मुष्किल ठरलं. मुलाखतीसाठी, लेखांसाठी मी त्यांना भेटत होतों, चर्चा करत होतों, त्यांचं व्यक्तिमत्त्व, विचार, तत्त्वज्ञान समजून घेण्याची तपश्चर्या सुरू होती. तरी पण संकल्प पूर्ण होत नव्हता हे मात्र खरं. एक तपावरचा काळ असाच गेला. ‘केसरी’ चे संपादक व विश्वस्त
श्री. जयंतराव टिळक हे त्यासंबंधी वारंवार स्मरण करून देत होते. तरी पण चरित्र लिहायचं तर यशवंतरावांचं बहुरंगी व्यक्तिमत्त्व शब्दांच्या संपुटांत साठवणं बरंच बिकट कार्य आहे, असं मला एकसारखं वाटत होतं. वर्षे उलटत चाललीं तसं तें अधिक बिकट वाटूं लागलं. कारण दिवसेंदिवस त्यांचं व्यक्तिमत्त्व फुलत होतं, माझ्या विचारावर पुटं चढत होतीं, भाव-भावनेचे वळसे वाढत होते. चरित्र लिहिण्याचे विचार मात्र प्रखर बनत होते.

चरित्र-लेखन लांबणीवर पडत होतं याचं एक कारण होतं. चरित्र लिहितांना मला जबाबदारीची जाणीव ठेवावी लागणार होती. या जबाबदारीच्या कसोटीला उतरायचं, तर आपला अभ्यास, अवलोकन, चिंतन पुरं व्हायचंय् याची मनातं रुखरुख होती. चरित्र लिहिण्याची कल्पना, संकल्प हें सारं मनांत ठेवून मी वावरत होतों; परंतु कधी तरी कल्पनेचीं पाखरं कागदावर स्थिर करावीं लागणारच होती. संकल्प-सिद्धीचा तो योग आज आला आहे.

यशवंतरावांचं चरित्र त्यांच्या हजारो चाहत्यांना सादर केल्यानंतरहि माझ्या मनांत कुठे तरी अतृप्ततेचा सल सलत आहे. कारण सागरांतील बर्फाच्या कड्याप्रमाणे त्यांच्या चरित्राचा हा व्यक्त भाग त्यांच्या चरित्राच्या अव्यक्त भागापेक्षा पुष्कळच अल्प आहे याची जाणीव मला आहे. तथापि प्रत्येकाच्या शक्तीला कांही मर्यादा या असतातच.

यशवंतरावांचा प्रदीर्घ सहवास योगायोगानं घडला, त्यांच्याशीं संवाद करतां आला, चरित्राची घडण न्याहाळतां आली आणि त्यांतूनच त्यांच्या चरित्राचीं हीं पानं रेखाटतां आलीं. यशवंतराव ही व्यक्ति इतिहासाचं एक पान आहे असं मानलं, तर मी लिहिलेलं त्यांचं हें चरित्र म्हणजे एक शब्द आहे, एवढं श्रेय जरी मला मिळालं तरी मी संतुष्ट आहे.