स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळांत थोड्याच अवधींत त्यांना नेतृत्वहि लाभलें. नेतृत्वांतून सत्ताहि त्यांच्याकडे चालून आली. संयुक्त महाराष्ट्राची प्रचंड चळवळ म्हणजे महान् दिव्यच होते. जनक्षोभाच्या दाहक ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. भाषिक राज्य न दिलेल्या भाषिक प्रदेशांतील जनता, विरुद्ध भारतीय काँग्रेसची केंद्रवर्ती सत्ता असा तो विलक्षण संग्राम होता. त्यांत यशवंतरावांसारख्या भाषिक प्रांतवादी क्राँग्रेसपक्षीय व्यक्तींना अंतर्विरोधामुळे विलक्षण मानसिक यातना सोसाव्या लागल्या. हा भाषिक प्रांतवाद विरुद्ध केंद्रसत्ता यांचा विग्रह या पुस्तकांत विस्ताराने व तपशीलवार रीतीने मांजलेला आहे. हा विस्तार व तपशील कांही बाबतींत अपुरा असला व मतभेदाचा विषय होण्याची शक्यता असली, तरी त्यांत वर्णिलेलें स्वत: यशवंतरावांचें स्थान काय होतें, याबद्दल फारसा वाद होण्याचें कारण नाही. खवळलेल्या समुद्रांत सापडलेल्या प्रचंड नौकेसारखी महाराष्ट्र प्रदेश-क्राँग्रेसची अवस्था झाली होती. या दुस्तर स्थितींतून उलट्यासुलट्या मार्गांनी श्री. यशवंतरावांनी महाराष्ट्र प्रदेश-क्राँग्रसला वादळांतून सुरक्षित स्थानी नेऊन पोंचविलें. त्यांतच त्यांचे नेतृत्व पणास लागलें व अखेरीस स्थिरहि झालें.
व्यक्ति मोठ्या सत्तेवरून उतरली की ती जनमानसांतूनही बहुधा उतरते व बहुश: थोड्या अवधींत विस्मृतिपथांतहि जाते. यशवंतराव चव्हाण १९६२ सालीं महाराष्ट्र प्रदेश राज्याची धुरा आपल्या खांद्यावरून खाली ठेवून, केंद्रसत्तेंत गेले. तेंव्हाच एका अर्थी ते सत्तास्थानावरून खाली उतरले; परंतु सत्तेवरून उतरले तें अधिक उच्च कर्तव्याच्या हाकेमुळे! केंद्रसत्तेंतील एकमेव अद्वितीय नेते कै. पंडित जवाहरलाल नहेरू, त्यांचे सहकारी मंत्री आणि लोकसभेचे व राज्यसभेचे भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांतून निर्वाचित होऊन आलेले सदस्य यांनी भारत-चीन संग्राम-प्रसंगीं त्यांना हाक दिली. हा एक विलक्षण, राष्ट्रीय निष्ठेची कसोटी पाहणारा क्षण होता. महाराष्ट्रांतील जनतेला यशवंतरावांचें प्रादेशिक नेतृत्व, लोभनीय व अमोल वाटत होतें. फार मोठ्या आशा-आकांक्षा यशवंतरावांमुळेच सफल होतील अशी बळकट श्रद्धा महाराष्ट्रीय जनतेच्या ठिकाणीं त्या वेळी होती. अशाच वेळीं यशवंतरावांनी ती विलक्षण मोहिनी बाजूस सारून अलिप्तपणें, अनासक्ते केंद्रसत्तेच्या आवाहनाबरोबर क्षणाचाहि विलंब न करतां, मागे न पाहतां दिल्लीस प्रयाण केलें. प्रदेशाचे मुख्य मंत्री व केंद्राचे प्रधान मंत्री हीच खरीखुरी सत्तास्थानें होत. म्हणूनच असें म्हणतां येतें की, कर्तव्याच्या हाकेसरशी त्यांनी सत्तेकडे पाठ फिरवली; परंतु महाराष्ट्रांतील जनमनांत त्यांची प्रतिमा जी रुजली ती कायम. आता सोळा वर्षे झालीं, तरी महाराष्ट्राच्या अंतरंगांत ती प्रतिमा सतत उज्ज्वल राहिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनांत महाराष्ट्रांतील राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, साहित्यिक इत्यादि सर्व क्षेत्रांतील मोठमोठ्या व्यक्ति मोठ्या संख्यने संयुक्त महाराष्ट्र समितीच्या परिवारांत सामील झाल्या होत्या ते सगळे यशवंतरावांच्या विरोधी होते; परंतु ते मोठमोठे विरोधी लोक, राजकीय कार्यकर्ते, विद्यापीठीय प्रशासक, प्राचार्य, प्राध्यापक, साहित्यकार, कालाकार, पत्रकार आज यशवंतरावांचे मित्र व सुहृद बनलेले दिसतात. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनांत आज यशवंतरावांना अजातशत्रुपद प्राप्त झालें आहे; याचें निदर्शन कराड येथील गतवर्षी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य-संमेलनांत मिळाले. त्या वेळीं यशवंतरावांचे मन साहित्यकारांतील व पत्रकारांतील अस्वस्थता व क्षोभ पाहून चिंताग्रस्त झालें होतें; परंतु संमेलनांतील स्वागताध्यक्षीय अखेरच्या भाषणाने त्यांनी साहित्याकारांचा आणि पत्रकारांचा एकदम विश्वास संपादन केला. पेंचप्रसंग व शृंगापत्ति यांमधून त्यांना या वेळींहि वाट सापडली.