ग्रामीण जीवनाला त्या वेळीं अस्पष्ट अशी आत्मसंवेदना प्राप्त होऊं लागली होती. मोठा सामाजिक परिवर्तनाचा आदेश सत्यशोधक समाजाच्या दणदणीत प्रचाराने महाराष्ट्राच्या ग्रामीण जगांत दुमदुमूं लागला होता. पुणें, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील ग्रामीण जीवनामध्ये या प्रचाराला प्रखर स्वरूप प्राप्त झालें होतें. सामाजिक विषमतेपेक्षा राजकीय पारतंत्र्याच्या विरुद्ध उत्पन्न झालेली आंदोलनेंहि येथील लहान-मोठ्या नगरांना वेढून ग्रामीण भागामध्येहि पसरत होतीं. वैचारिक द्वंद्वें आणि वैचारिक संघर्ष यांचे पडसाद वारंवार उमटत होते. त्यांचाहि परिणाम यशवंतराव चव्हाण यांच्या तरल व प्रत्ययशील बुद्धीवर होत होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशांत परकीय पारतंत्र्याविरुद्ध तीन मोठीं देशव्यापी वादळें दहा-बारा वर्षांच्या अंतरांनी निर्माण झालीं. शेवटच्या वादळाचें फळ ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंत! पहिलें वादळ असहकारितेचें; ते १९२२-२३ च्या सुमारास शांत झालें. १९३० साली दुसरें अधिक मोठें सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे वादळ उठलें. त्यांनी देश व्यापला. वादळी शक्तीमध्ये श्री. यशवंतराव चव्हाण सामील झाले. त्या वेळी ते यौवनाच्या पहिल्या उन्मेषांत होते. भारतीय राष्ट्रवाद त्यांच्या जीवनाचा कायमचा मार्गदर्शक तेव्हाच ठरला. मनाचीं कवाडें खुलीं ठेवल्यामुळे इकडे विद्यालयीन पुस्तकी शिक्षण चालू असतांनाच भोवतालचें राष्ट्रीय जीवन आणि जागतिक उलाढाली यांचेही पडसाद त्यांच्या बुद्धींत उमटूं लागले. भोवतालची वैचारिक आंदोलनेंही त्यांच्या बुद्धीला शिकवत होती; असें फार थोड्यांच्या बाबतींत घडते. १९३० ते १९४५ या कालखंडांतील भारत म्हणजे यशवंतरावांचें वाच्यार्थाने विश्वविद्यालयच बनलें. अभ्यासाने त्यांची बुद्धि व विचार संपन्न व समर्थ बनले. लो. टिळक, म. गांधी, पंडित नेहरू, एम्. एन्. रॉय इत्यादिकांचे परिशीलन त्यांनी मोठ्या आस्थेने केलें. त्याबरबोरच पश्चिमेकडील क्रांत्यांच्या मुळाशी असलेली सिद्धान्तसरणीहि तुलनात्मक रीतीने अभ्यासली. प्रत्यक्ष राजकीय आंदोलनांत भाग घेतल्यामुळे पुस्तकी अध्ययनाला मर्यादा पडल्या; परंतु भारतीय वस्तुस्थिति, राजकीय वा सामाजिक वस्तुस्थिति आणि ध्येयवादी तत्त्वज्ञानें यांच्या तुलनात्मक परिशीलनांतून वस्तुवादी दृष्टीकोण प्राप्त झाला. तत्त्वांशी तडजोड करणें प्राप्त झालें तरी, ध्येयवादाच्या प्रकाशापासून हा वस्तुवाद दूर, बाजूला विशेष पडणार नाही, याचीहि काळजी त्यांनी घेण्याचा प्रयत्न चालविला असें दिसतें. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आंदोलनांत त्यांनी निष्ठेने जें अनुयायित्व पत्करलें, त्यातच त्यांच्या नेतृत्वाचें बीज रोवलें गेलें. या आंदोलनांत विचारांबरोबर वक्तृत्वाची कलाहि त्यांना संपादन करतां आली. त्यांची भाषणशैली अगदी अलग आहे. तिचें एक खास वैशिष्ट्य आहे. मातेचें वात्सल्य त्यांना जसें दीर्घ काल लाभलें, माता अपार कष्ट सोसत आहे व अपार मायाहि करीत आहे, हें जसें त्यांनी अनुभवलें, तसेंच सामान्य जनता अपार कष्ट सोसत आहे, त्याप्रमाणे अथांग प्रेमहि करीत आहे, हेंहि त्यांनी अनुभविलें. त्यांच्या वक्तृत्वकलेला या जनतेच्या प्रेमाने अगदी वेगळा असा आकृतिबंध दिला. आपल्या माणसांशी आपण तन्मय होतों, आपले हृद्गत सांगतों, हितगुज बोलतों, भावुकतेने आत्मनिवेदन करतों; अशा प्रकारचें त्यांचें वक्तृत्व असतें, जिव्हाळ्याच्या आप्तेष्टांशीं बोलणा-याची रीति त्यांत असते. जनतेपेक्षा वेगळा असलेला, जनतेच्या उद्धाराचा बाणा बाळगणारा, तडफदार वक्ता म्हणजे यशवंतराव नव्हे. त्यांना फड जिंकायचा नसतो; जनतेला मोहिनी टाकून कोठे तरी वाहवत न्यावयाचें नसतें; जनतेची फसवणूक करून जनतेला नादी लावावयाचें नसतें. फड जिंकूं पाहणारा व मोहिनी टाकणारा वक्ता लोकशाहीची निष्ठा अखंड ठेवूं शकत नाही; यशवंतरावांना लोकशाहीची जोपासना करावयाची आहे, त्यामुळे त्यांची वक्तृत्वकल्पनाहि निराळ्या प्रकारची झाली आहे. त्यांना पक्कें माहीत आहे की, लोकशाहीचा नेता लोकशिक्षक असावा लागतो. या लोकशिक्षकाची मुख्य जबाबदारी म्हणजे लोकांना विचार देऊन मार्गदर्शन करणें होय.