संरक्षणमंत्री पदाची सूत्रे घेण्यासाठी दिल्लीस जाताना मुंबई शहरातर्फे यशवंतरावांचा एक सत्कार शिवाजी पार्कवर करण्यात आला होता, त्याप्रसंगी अनेक वक्त्यांनी त्यांच्यावर विविध प्रकारच्या स्तुती सुमनांचा वर्षाव केला. खफहींनी त्यांची लो. टिळकांशी तर काहीनी छत्रपती शिवाजींशी तुलना केली. उत्त्तरादाखल भाषण करताना यशवंतराव म्हणाले,''माझ्यावरील प्रेमामुळे आताच काही व्यक्तिंनी माझी युगपुरुषाबरोबर तुलना केली. त्यांच्या भावना मी समजू शकतो परंतु मी त्या नेत्यांएवढा मोठा नाही आणि तेवढा मोठा नाही हे न समजण्याइतका लहानही नाही'' अविर्भावयुक्त भाषणातील या नम्रभावनायुक्त वाक्याला श्रोत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यशवंतराव लौकिक अर्थाने मोठे झाले. सुखी झाले परंतु आयुष्यातील अखेरचे दीडवर्ष त्यांच्या जीवनावर निराशेचे सावट सोडून गेले. हा प्रकार कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सर्वच थोर व्यक्तिंच्या वाट्याला असतो की काय न कळे!
यशवंतरावांना महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार म्हणतात याचे कारण महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचा पाया त्यांनी घातला. कृषी, औद्योगिक रचनेबरोबर समाजाच्या सांस्कृतिक परिवर्तनासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. भहुजन समाज सर्वार्थाने प्रगत व्हावा अशी त्यांची धारणा होती. शेती करणारा माणूस नुसता श्रीमंत होता कामा नये तर त्या श्रीमंतीबरोबर त्याच्या घरात चार पुस्तके हवीत याची त्यांना ओढ होती. समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्यात त्यांना स्वारस्य होते. पण आर्थिक आणि मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी मन सुसंस्कृत ठेवले पाहिजे हेही त्यांनी बहुजन समाजाला सातत्याने सांगितले. त्यासाठी अनेक सुधारणा घडवून आणल्या, सांस्कृतिक वातावरण निर्मिती करण्यासाठी जातीने लक्ष घातले. सामान्य माणसाला त्यामुळेच त्यांच्याविषयी मनापासून प्रेम वाटत राहिले. यशवंतरावांचे सुसंस्कृत संपन्न, समतोल राजकारणी, रसिक आणि चौफेर व्यक्तिमत्व व आईने दिलेली संस्काराची, श्रद्धेची शिदोरी यशवंतरावांना आयुष्याच्या वाटचालीत प्रेरक ठरली.
खफही काही व्यक्तिंचे व्यक्तिमत्व कार्यकर्तृत्व त्या त्या काळावर ठसा उमटवून गेले असल्याचे दिसून येते. लो. टिळक, मं. गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, इंदिराजी यांच्या कार्याचे एकेक युग होते. इतिहास होता. महाराष्ट्राच्या जडण घडणीच्या इतिहासात स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावाची काही पाने लिहिली गेली आहेत. आधुनिक, नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार या नात्याने चिरंजीवी ठरले आहे.
महाराष्ट्र-देश-समाज मोठा समर्थ व्हावा अशी जिद्द बाळगलेला, देशभक्तीने भारलेला असा हा नेता.