द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाल्याबरोबर मुंबई येथे ग्रँड हॉटेलमध्ये त्यांच्या काही चाहत्यांनी सत्कार केला होता. त्याप्रसंगी भाषण करताना यशवंतरावजी म्हणाले होते, ''मी एक सामान्य मनुष्य आहे. आज जरी मुख्यमंत्री झालो असलो, तरी मी हा माझा वैयक्तिक मोठेपणा मानीत नसून महात्मा फुले, राजर्षि शाहु महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, या थोर पुरुषांनी सुरु केलेल्या चळवळीमधून निर्माण झालेले हे नेतृत्व आहे, असे मी मानतो, जर शाहू महाराज नसते तर मी माझ्या खेड्यात शेतात नांगराच्या मागे कदाचित दिसलो असतो'' याचा अर्थ यशवंतरावांच्या थोरवीचे रहस्य त्यांनी त्यांच्या शब्दात सांगून महात्मा फुले आणि शाहु महाराज यांच्या चळवळीचे ॠण मान्य केले आहे. महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजाला शिक्षित करणे त्यांना शैक्षणिक सवलती व मुलीना मोफत शिक्षण देणे हा त्या विचारसरणीचाच एक भाग होता. तथाकथित विद्वानांची टीका सहन करुनही साहेबांनी महाराष्ट्रात त्याकाळी हे कांतिकारी पाऊल टाकले.
महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निर्मिती ही त्यांनी महाराष्ट्राला दिलेली देणगीच होय. सत्त्तेचे विकेंद्रीकरण करुन सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रकियेत सहभागी करुन घेण्याचा हा हेतू आज सफल झाला आहे, ग्रामीण भागातून नेतृत्व तयार करण्याचा त्यांचा दृष्टीकोन सर्वार्थाने योग्य व समर्थक होता असे म्हणावे लागेल. यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय जीवन म्हणजे एक उघडा ग्रंथ आहे. वृत्त्तपत्रातील अनुकूल व प्रतिकूल टीका पंचवूनही महाराष्ट्राचे एकमेव नेते म्हणून जनमानसात यशवंतरावजींनी आपले स्थान टिकवून ठेवले होते. मतभेद राखनही प्रेम कसे करावे, स्नेह वृद्धिंगत कसा करावा हे त्यांना जितके सहजकत्या साध्य झाले होते तितके ते इतर कोणत्याही राजकारणी पुरुषाला साध्य झाले नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
''राजकारण म्हणजे केवळ सत्त्तेच्या क्षेत्रात काही कारभार करणे वा निवडणूक लढविणे नसून समाज परिवर्तनाचे ते एक साधन आहे. सामाजिक कांती हेच आता आपल्या सर्व सार्वजनिक जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनले पाहिजे. देशाचा विकास व समृद्धि घडविण्याचे ते साधन मानले पाहिजे'' असे ते म्हणत.
आजच्या धर्मांध व अर्थांध सत्त्तापिंपासू आणि अनीतिमान, गढूळ गचाळ राजकारणाला दिशा देण्याला त्यांच्या पखर राष्ट्रभक्तांच्या नि निखळ राजकारणाची खरी गरज होती, किमान त्यांचे आदर्शतरी आज अनुसरण्याची आवश्यकता वाटावी, इतके उत्त्तुंग सह्याद्रिवत व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते. सत्ता अभिलाषेने स्वार्थाने आणि धर्मवेडेपणाने बरबटलेल्या आजच्या राजकीय जीवनात यशवंतरावांनी दिलेले विचार मोलाचे वाटतात.
ते म्हणतात, ''पराकोटीच्या त्यागी वृत्त्तीची आज देशाला फार गरज आहे. हिम्मतीने ताठ उभे राहून हा क्षात्रधर्म आज उभा करायचा असेल तर माणसामाणसामध्ये आपण जिद्दीची भावना निर्माण केली पाहिजे. देशाभिमानाचे आणि स्वातंत्र्याचे वेड देशाला लाभते तेव्हाच तो देश आपले स्वातंत्र्य राखू शकतो. आत्मविश्वास हे संरक्षणाच्या शस्त्रागारातले अत्यंत महत्वाचे शस्त्र आहे. आपल्या महाराष्ट्रीय परंपरेत जे जे पवित्र व उच्च असेल ते ते भारताच्या उत्थापनासाठी आपण दिले पाहिजे.''