राजर्षि शाहू महाराजानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीच्या चळवळीला अधिक मूलगामी सर्वव्यापी अन् खोलवर रूजविण्याचा प्रयत्‍न केला. दलितांच्या मुक्तीचा खरा मार्ग त्यांनी दाखविला. डॉ. आंबेडकरांनी दलित समाजात आत्मतेज, आत्मविश्वास आणि स्वाभिमान व माणुसकीचे नवचैतन्य निर्माण केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर ही केवळ महान व्यक्ती नव्हती तर ती एक सर्वंकष क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी व त्यासाठी लढणारी एक शक्ती होती. नवसमाज निर्मितीचे स्वप्न पाहणारी प्रवृत्ती होती. मनुष्यत्वाची प्रतिष्ठा हे सर्व श्रेष्ठ मूल्य मानणार्‍या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षि शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, आगरकर आदी महापुरूषांच्या परंपरेतील बाबसाहेबांनी व्यक्तिपूजेपेक्षा विचारांची पूजा श्रेष्ठ मानली. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून त्यांनी जो दलितांचा मुक्तिसंग्राम सुरू केला तो एका अर्थाने मानव मुक्तीचा लढा होता. शिका, संघटित व्हा आणि लढा, असा आदेश देत त्यांनी समाजक्रांतीची गती वाढविली. सांस्कृतिक पुनरूत्थानासाठी त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेऊन दलितांची अस्मिता जागी केली. प्रतिगामी प्रवृत्तीशी संघर्ष करूनच क्रांती यशस्वी होईल. पण त्यांनी ‘हिसे’ चा मार्ग अवलंबिला नाही. कारण त्यांची श्रद्धा होती की विचाराचा पराभव विचारच करू शकतो.

डॉ. बाबासाहेबांनी समग्र हिंदू समाजाच्या पुनर्घटनेची मागणी आपल्या चळवळीतून सुरू केली. म. फुले आणि आंबेडकर यांनी आपल्या चळवळीतून हिंदू समाजाच्या समग्र पुनर्रचनेचा आग्रह धरला. मनुस्मृती ही हिंदूच्या धार्मिक, सामाजिक, निर्बंधिक नियमांचा संग्रह होता, मात्र त्यात अस्पृश्यावर सामाजिक, आर्थिक व धार्मिक अमानुष गुलामगिरीचे निर्बंध घातलेले होते, म्हणून मनुस्मृती कोणालाच मान्य नव्हती. तीवर एकाहून एक असे प्रखर हल्ले सुधारकांनी चढवून तिचे वाभाडे काढले. धर्मग्रंथातील दोष दाखविले, पण मनुस्मृती पायाखाली तुडवून जाळून टाकण्यापर्यंत आणि असा हा हिंदू धर्मच नको म्हणण्यापर्यंत कोणाही सुधारकाची मजल गेली नव्हती. शक्य तो पोट तिडकीने ‘देव नको आणि हा हिंदू धर्म ही नको’ अशी निर्भय आणि क्रांतिकारक घोषणा करणारी पहिली व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही होय. डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ज्ञान ही अमोघ शक्ती आहे. या ज्ञान शक्तीचा कण आणि कण आत्मसात केल्याशिवाय दलित वर्ग आपले स्वातंत्र्य आणि समतेचे ध्येय कधीच गाठू शकणार नाही.’

बौद्ध धर्मामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तीन गोष्टी प्रामुख्याने आढळतात. अपरिमित स्वातंत्र्याला समतेमुळे बाध येते आणि सदासर्वकाळ समता पाहात गेलो तर स्वातंत्र्याला बाध येतो, म्हणून दोन्हींवर अंकुश ठेवण्यासाठी बंधुभावाची आत्यंतिक जरूरी आहे. हा बंधुभाव म्हणजे मानवता, अशी डॉ. बाबासाहेबांची श्रद्धा होती. ज्या धर्मामध्ये मानवतेला स्थान आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, संघटना स्वातंत्र्य आहे परंतु अंधश्रद्धा नाही अशा प्रकारचा बौद्धधर्म हा एकमेव एक धर्म असून हिंदू संस्कृतीशी मिळता-जुळता आहे म्हणून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

डॉ. बाबासाहबांनी आपल्या बुद्धीच्या बळावर दलित समाजाला माणूसपणाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रचंड मोठी लोकचळवळ उभी केली. त्यांच्या धर्मांतराचा निर्णय दलितांना मानवी प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून यशवंतराव चव्हाण यांनीही आयुष्यभर कार्य केले.

समाज परिवर्तनाच्या बाबतीत यशवंतराव जागरूक होते. विचार मंथनाच्या काळात डॉ. बाबासाहेबांच्या विचारसरणीचा आणि तात्त्विक भूमिकेचा ते बारकाईने अभ्यास करीत होते. एका बौद्धिकाच्या वेळी अस्पृश्यतेबद्दलची तीव्र जाणीव व्यक्त करताना यशवंतराव एकदा म्हणाले होते. ‘आपण अस्पृश्यांवर फार मोठे अत्याचार करीत आहोत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्यावरही घोर अन्याय सतत करीत आहोत. डॉ. आंबेडकरांनी मुंबईच्या विधानसभेत महारवतन रद्द करण्याच्या बाबातीत एक बिल आणले होते. हे वतन महार लोकांच्यावर गुलामगिरी लादणारे वतन होते. असा अन्याय कोणत्याही सुसंस्कृत समाजाने चालू ठेवला नसता, पण ते बिल नामंजूर करण्यात आले ही आपल्या समाजाच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट होय. यशवंतराव चव्हाण बोलघेवडे समाजसुधारक नव्हते, ते कृतिशील नेते होते. याचा प्रत्यय पुढे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते झाले त्यावेळी आला. मुख्यमंत्री म्हणून पहिली गोष्ट जर त्यांनी कोणती केली असेल तर ‘महारवतन’ रद्द करण्याचे बिल त्यांनी मंजूर करून घेतले हे होय. ते आवर्जून म्हणत असत, डॉ. बाबासाहेबांनी जो लढा लढविला तो अस्पृश्यांच्या जीवन मरणाचा लढा होता आणि या लढ्यात त्यांना साथ देणे हे त्यांच्या नव्हे, आपल्या समाजाच्या हिताचे आहे.’