महात्मा फुले यांच्यानंतर राजर्षि शाहू महाराजांनी सबंध महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाच्या चळवळीचे नेतृत्व केले. ‘अजून देशातल्या सगळ्या रयतेला कोंड्याची भाकरी मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,’ असे सांगणारा रयतेचा वाली आज कुठे दिसत नाही. ‘राजवैभव थोर असो, पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे,’ हे शाहू महाराजांच्या विचारातले मुख्य सूत्र होय. अस्पृश्यता निवारण, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, विद्यार्थी वसतिगृहांची व्यवस्था, गंगाराम कांबळे या अस्पृश्यास काढून दिलेले हॉटेल, धरणे बांधून हरित क्रांतीचा केलेला आरंभ, राज्यकारभारात कामगारांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून रशियन राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटना काढण्यासाठी कामगारांना त्यांनी दिलेली प्रेरणा, दत्तोबा पोवार या पहिल्या अस्पृश्य व्यक्तीस कोल्हापूर नगरपालिकेचे अध्यक्षपद, ज्ञानोबा घोलप या अस्पृश्य समाजातील व्यक्तीस मुंबई असेंब्लीत प्रतिनिधित्व, मल्लविद्येला दिलेले उत्तेजन, चित्र-संगीत-ललितकलांना आणि कलावंतांना दिलेला आश्रय, रंगभूमीच्या विकासासाठी केलेले प्रयत्‍न ही सर्व कार्ये पाहता राजर्षि शाहू महाराज समग्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. ‘शाहूराजा नुसता मराठा नव्हता, ब्राह्मणेतरही नव्हता, तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरूष होता. तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता.’

राजर्षि शाहूंनी अस्पृश्यांना पोटाशी धरले. त्यांना माणसात आणण्यासाठी जे जे काही करता येणे शक्य होते ते ते त्यांनी सारे व्रत म्हणून केले. शाहू जसे अस्पृश्यांच्या घरी-दारी निर्मळ मनाने जात होते तसेच अस्पृश्यही शाहूंच्या राजगृही मोकळ्या मनाने वावरत होते. दलितांना-अस्पृश्यांना राजवाड्यात थारा देणारा महामानव शाहू छत्रपतीच होत.

उद्रेकाशिवाय स्थित्यंतर घडून येत नाही आणि पोटतिडकीशिवाय उद्रेक होत नाही हा कार्यसिद्धीचा व्यवहारी सिद्धांत शाहूंनी स्वीकारला होता आणि तो वसतिगृहांच्या स्थापनेबाबत विविध प्रकारे फलदायी ठरला होता. अस्पृश्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य व त्यांच्या दु:स्थितीची दखल घेता अस्पृश्यांचे नेतृत्व अस्पृश्यानेच करणे ही अतीव गरजेची गोष्ट होती. शाहूंचा हा विचार वास्तवाशी व मनवी स्वभावाशी इमान राखणारा होता.

मानवी हक्क प्राप्त करून घेण्यासाठी उद्रेकी उपयांची कास धरल्याशिवाय अस्पृश्यांना गत्यंतर उरले नव्हते. त्यासाठी अस्पृश्यांचे नेतृत्व अस्पृश्यानेच करणे आवश्यक होते. अस्पृश्यता निर्मूलन हे जीवित कार्य मानणार्‍या राजर्षी शाहूंची गरूड नजर अस्पृश्यातील नेतेपणास पात्र व्यक्ती शोधण्यासाठी चौफेर भिरभिरत होती. भीमराव आंबेडकर या शिक्षणार्थी दलित तरूणावर त्यांची नजर स्थिरावली. शाहूंना आंबेडकरांमध्ये अस्पृश्यांचा त्राता दिसत होता. म्हणून त्यांनी आंबेडकरांना अस्पृश्यांच्या नेतेपदाचा म्हणजेच स्वोद्धारक चळवळीच्या अग्रणीपदाचा अभिषेक करण्याचा बेत आखला. हजारो वर्षे मुका असलेल्या अस्पृश्य समाजास बोलका करण्याच्या इराद्याने शाहू छत्रपतींच्या आश्रयाखाली सार्थ व समर्पक नाव धारण केलेले मूकनायक हे साप्ताहिक आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० ला सुरू केले आणि एका परी आंबेडकर मूकनायक झाले. हा चमत्कार शाहूंनी हेतुत: घडवून आणला. नंतर आंबेडकरांना अस्पृश्यांच्या अग्रणीपदाचा अभिषेक माणगाव मुक्कामी स्वहस्ते करण्याचे त्यांनी निश्चित केले.

२० मार्च, १९२० ला कागल जहागिरीतील माणगाव येथे अस्पृश्यांची पहिलीच व जंगी परिषद भरली. या परिषदेचे शिल्पकार शाहू छत्रपती होते. तसेच या परिषदेची खास वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे माणगावच्या या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष होते एक अस्पृश्य.... भीमराव आंबेडकर. या ऐतिहासिक परिषदेत मार्गदर्शनपर भाषणात राजर्षि शाहू छत्रपती म्हणाले, ‘माझे प्रिय मित्र आंबेडकर यांच्या भाषणाचा लाभ मिळावा म्हणून मी शिकारीतून मुद्दाम येथे आलो आहे. आंबेडकर मूकनायक पत्र काढतात व सर्व मागासलेल्या जातींचा परामर्श घेतात, याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.’ अशा रीतीने पवित्र करवीर क्षेत्राच्या परिसरातील माणगावी योजनापूर्वक आयोजित केलेल्या भव्य परिषदेत मराठी-कानडी मुलखातील हजारो अस्पृश्यांच्या साक्षीने शाहू छत्रपतींनी आंबेडकर यांच्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ शाही इतमामाने रोवली. परिषदेचे अध्यक्ष आंबेडकर यांनी समयोचित भाषण केल्यानंतर हा अग्रणीपद मुहूर्तमेढ सोहळा यथासांग पुरा झाला. नवोदित अस्पृश्याग्रणी आंबेडकरांच्या सत्कारार्थ शाहूंनी सहभोजन केले. कसब, गुण, कर्तृत्व या विषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती. समाजातल्या रंजल्या गांजल्याबद्दल त्यांना कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते, तसेच त्यांचे मनही होते. त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान यांना महाराजांचा आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्यांना, पिडितांना तो अपील कोर्टासारखा वाटावा. शाहू महाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते आणि लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात, त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. ‘राजर्षि शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने राजे नव्हते, तर ते लोकांचे राजे होते.’