भारतीय नेत्यांचे मन वळविण्याएवढा विश्वास यशवंतराव संपादन करुं शकले नसते तर ज्या मार्गाने महाराष्ट्र निर्मितीची बोलणी सुरु झाली तो मार्ग खुंटला असता. राज्य पुनर्रचनेच्या वेळी मुंबई महाराष्ट्राला मिळूं न देण्याचा ज्या भारतीय नेत्यांचे प्रयत्‍न कारणीभूत झाले त्यांना निष्प्रभ करण्याएवढी पुण्याई यशवंतरावांनी मिळविली होती. परंतु भारतीय नेत्यांचे मन वळवूनहि मुंबई राज्यांतील सहकार्‍यांचा विश्वास व सहकार्य यशवंतराव मिळवूं शकले नसते तरीही महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न सुकर झाला नसता. सभ्दावनेच्या वातावरणांत वाटाघाटींनी हा प्रश्न सुटला हें या घटनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

उत्तम प्रशासकाचे ठिकाणी आवश्यक असलेले गुण यशवंतरावांचे ठायी आहेत याची जाणीव त्यांची मुंबई राज्याचे मंत्रिमंडळांत संसदीय सचिव म्हणून समावेश झाल्यापासूनच प्रशासनाशीं संबंध येणार्‍या लोकांना झाली. विशेषत: ते नागरी पुरवठा खात्याचे व स्थानिक स्वराज्यखात्याचे मंत्री असतांना राज्यकारभाराचा उरक सांभाळून, कार्यक्षमतेला बाधा येउफ् न देतां तो लोकाभिमुख कसा करतां येईल, या दृष्टीने त्यांचा प्रयत्‍न असे. मुख्य मंत्री झाल्यानंतर त्यांच्या प्रशासकीय गुणांच्या अभिव्यक्तीला व्यापक वाव मिळाला. कठीण जबाबदारी पत्करल्यामुळे त्यांच्या गुणांचा प्रकर्षत्वाने विकासहि झाला. लोकांची गा र्‍हाणीं मोकळेपणाने ऐकून घेउफ्न त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. तसेंच, लोकांचे समाधान हीच लोकशाहीतील पशासनाची कसोटी आहे, यावर भर देउफ्न त्यांनी शासनांतील अधिकारी वर्गाला नव्या मनूची जाणीव दिली. मुद्द्याला धरुन आणि थोडक्यांत भाषणें करण्याची त्यांची प्रथा आपल्या देशामध्ये राजकारणी पुढार्‍यांनी रुढ केलेल्या परंपरेला अपवाद वाटते. प्रशासनांतील उणीवांची जाणीव असल्याचे ते जाहीररीत्या कबूल करतात. आणि मुख्य म्हणजे कोणताहि लहानसहान प्रश्न प्रतिष्ठेचा करण्याबद्ल त्यांचा आग्रह नसतो., त्यामुळे सामाजिक व्यवहाराला आवश्यक असलेली तडजोड होण्यास मदत होते. मुंबईमध्ये हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यास संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागणीला यशवंतरावांनी जे उत्त्तर दिलें आणि ज्या रीतीने दिलें ते या वृत्त्तीचें निदर्शक आहे.

परंतु प्रशासकीय गुणांपेक्षाहि राजकीय नेतृत्वाचे गुण यशवंतरावांच्या महाराष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये विशेष दिसून आले. त्यांचे नेतृत्व प्रभावी होण्याला तीन गुण प्रामुख्याने कारणीभूत झाले आहेत. राजकीय घटनांबाबत त्यांचा दृष्टिकोन वास्तववादी असतो आणि धोरणाबद्ल त्यांची भूमिका व्यावहारिक असते. ठोकळेबाज तत्वज्ञान किंवा भोंगळ आदर्शवाद यांचा पगडा यशवंतरावांवर कधीहि बसला नाहीं. पण त्यांची भूमिका व्यावहारिक असली तरी संधिसाधूपणाची नसते. याचें कारण राजकीय प्रश्नांबद्ल अभ्यासू दष्टि स्वीकारुन विचाराच्या बैठकीवर त्यांची भूमिका बनत असते. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबद्ल त्यांची वैचारिक भूमिका घट्ट होती. मुंबई विधानसभेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसची या प्रश्नाबद्लची भूमिका विशद करणारें जें भाषण यशवंतरावांनी केले होतें त्यामध्ये ही घट्ट वैचारिक भूमिका स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. परंतु व्यावहारिक दृष्टिकोनांतून ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पर्याय स्वीकारावा लागेल असें दिसूं लागलें, त्यावेळी यशवंतरावांनी त्यांतल्या त्यांत जवळचा असा विशाल द्विभाषिकाचा पर्याय स्वीकारण्यास अनमान केला नाही. केवळ तत्वाचा अट्टाहास म्हणून व्यवहार्यतेकडे त्यांनी डोळेझाक केली नाही. मुंबई राज्याचा कारभार पशासनाचे दृष्टीने चांगला चालला होता तरीहि लोकशाही पद्धतीमध्ये अभिप्रेत असलेले भावनात्मक ऐक्य द्विभाषिकांत साधेलसे दिसत नाही, अशी खात्री झाल्याबरोबर यशवंतरावांनी द्विभाषिकाचा फेरविचार सुरु करण्यास चालना दिली. नेहरुंच्या प्रतापगडभेटीचे वेळचा संयुक्त महाराष्ट्र समितीचा मोर्चा हा यशवंतरावांच्या विचारास चालना देणारा ठरला असावा. वास्तववादी दृष्टिकोनामुळे त्यांनी महाराष्ट्रीय मनावर संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाची पकड किती पक्की बसली आहे ते जाणले. व्यावहारीक भूमिकेमुळे राज्यपुर्नरचनेचा प्रश्न त्यांनी प्रतिष्ठेचा केला नाही. उलट लोकशाही मार्गावरील निष्ठेमुळे लोकांचे समाधान करण्याचा लोकशाहीवादी मार्ग पत्करण्याची तत्परता त्यांनी दाखविली.

अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती अनुकूल वातावरणामध्ये होण्यास यशवंतरावांचे नेतृत्व बर्‍याच अंशी कारणीभूत झाले आहे.