हे सा-याच देशात घडले आहे. सा-या जुन्या धर्मंपंथातील देव हे मानवीच होते आणि ते आपापल्या समाजा पुरतेच मर्यादित होते. परमेश्वराचे रूप वैश्विक असू शकते हा खूप उशिरा आलेला विचार आहे. म्हणूनच आपल्या ऋग्वेदात जशी इन्द्र आणि कृष्णाची घनघोर लढाई दिसते तशाच जुन्या करारात जोहोवाचे शत्रू म्हणजेच इस्त्रायलचे शत्रू. त्यातील प्रत्येक देवाने आपल्या लोकांसाठी आपल्या शत्रू विरूध्द केलेल्या लढाया दिसतात. महंमदाने तलवार हातात घेतली ती सुध्दा फक्त आपल्या लोकांसाठीच. धर्माजवळ समाजातील आपल्या धर्माच्या गटाला एकात्म करण्याची प्रचंड ताकद आहे. त्याच बरोबर दुस-या गटाशी शत्रूत्व, वैर सतत ठेवण्याचे समर्थनही आहे. त्यामुळेच विविध धर्म अस्तित्वात असलेले राष्ट्र कोणत्याही एका धर्माच्या नावाने एकात्म करता येणे फार अवघड आहे. त्यांच्यात लढाया होतील परंतु निर्णायक विजय कोणाचाच होणार नाही. त्यातून राष्ट्र तेवढे खिळखिळे होईल. यासाठीच राष्ट्रीय विचार करतांना धर्माच्या कवचाबाहेर येऊन तो विचार करावा लागेल आणि धर्माजवळ आपल्या अनुयायांना एकात्म ठेवणारी शक्ती किंवा दुस-या धर्माच्या अनुयायाबद्दल प्रचंड व्देष असण्याच्या कारणाच्या मुळाशी त्या त्या धर्म गटाचे सामाजिक आर्थिक हितसंबंध असतात याकडे दुर्लक्ष होऊ नये.
देवाप्रमाणे भुतांनी सुध्दा या धर्माच्या क्षेत्रात फार नंगानाच गातलेला आहे. आपल्या देशात अद्यापही धमलाभासाठी किंवा दुस-याचे वाईट होण्यासाठी माणसांना बळी देण्याची उदाहरणे घडत असतात. आजही आपल्या समाजात या घडणा-या घटना म्हणजे आपल्या रूढी-परंपरांते शिल्लक राहिलेले अवशेष आहेत. बायबलात सुध्दा ‘ चेटकीणीला जिवंत ठेवू नये’ अशी आज्ञा आहे. इ. स. १४८४ साली पोप आठवा इनोसन्ट याने यासाठी एक आज्ञापत्र काढले आणि गुन्हेगारांना शासन करण्याकरता आपल्या धर्म विचारिणी सभेच्या दोन अधिका-याची नेमणूक केली. या गृहस्थांनी १४८९ साली ‘स्त्री गुन्हेगारावर घणाघात’ या नावाचा एक ग्रंथ प्रसिध्द केला. हा ग्रंथ विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत प्रमाण म्हणून मानला जात होता. या ग्रंथात म्हटले की स्त्रियांची अंत:करणे मूलत:च दुष्ट असल्यामुळे चेटुकाचे प्रकार पुरूषापेक्षा स्त्रियांच्याच हातून घडणे अधिक स्वाभाविक आहे. त्यांनी केलेल्या स्त्रियांना विचारावयाच्या प्रश्नांची एक यादी केली आणि या स्त्रियांच्याकडून त्यांना हवी ती उत्तरे येईपर्यत त्यांचा प्रचंड छळ केला. त्याच्यासाठी एक खास पीडन यंत्रच तयार केले. या जाचाला कंटाळून संशयित प्रत्येक चेटकीण या अधिका-यांना अपेक्षित असलेली उत्तरे देऊ लागली आणी ज्यांनी चेटकीण कबुली दिली त्यांना जाळून मारण्यात आले. या जाळल्या गेलेल्या असंख्य स्त्रियांची आकडेवारी बट्राँड रसेल यांनी दिली आहे. ती अंगावर शहारे आणणारी आहे. इ. स. १४५० ते १५५० या कालावधित एकट्या जर्मनीत एक लाख स्त्रियांना जिवंत जाळले. हे सा-याच ख्रिस्ती जगात घडले आणि धर्म त्याचा आधार होता. यापेक्षाही संघटीत धर्माने नीतीच्या नावाखाली माणसांचा जो अनन्वित छळ केला तो भयानक आहे.