व्याख्यानमाला-१९८७-२ (39)

इतिहासलेखन ज्यावेळी अशा अभिनिवेशी दृष्टीकोणातून लिहिलेजाते त्यावेळी तो वाचणारा माणूस शहाणा बनण्या ऐवजी पागल बनत असतो. असे होण्याचे कारण इतिहासकारांनी आपल्या लेखनाला कधी धर्मसंस्थेला केन्द्र मानून तर कधी राजघराण्यांच्या राजवटीला केंद्र मानून इतिहासलेखन केलेले आहे. त्याचा परिणाम हे इतिहासलेकन मानवी समाजाच्या फार थोड्या वर्तुळाभोवती फिरतांना दिसते आहे. धर्मसंस्था आणि राजघराण्यांच्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन जेव्हा मानवी विकासाचा तपशिल इतिहासात दडून बसलेल्या घटनांच्या सहाय्याने लिहिला जाईल त्यावेळी तो एका धर्माचा, एका घराण्याचा इतिहास रहाणार नाही आणि तो लिहितांना मानवी दृष्टी लाभेल. आपण इतिहासाचा विचार माणूस आणि त्याच्या सामाजिक संबंधाच्या संदर्भात करीतच नाही. त्यामुळे तर आपल्या इतिहासलेखनात चुकीचे कालखंड पाडण्याची प्रथा निर्माण झालेली आहे. आपल्याला इतिहासात हिंदुकालखंड, मुस्लीम कालखंड दिसतो. तो आपल्या असंख्य वाचकांना आवडतो कारण त्यांचे हिंदु मन हिंदुकालखंडात रमते, मुस्लीम मन मुस्लीम कालखंडात रमते आणि आधुनिक मन ब्रिटिश कालखंडात रमते. आपण या प्रकारचा कप्पेबंद इतिहास मान्य केला म्हणून आपण व्यापक दृष्टीने इतिहासाकडे पाहिले नाही. असा व्यापक इतिहास लिहिता येणे शक्य आहे का ? इतिहास माणसाला पागल बनविण्याऐवजी शहाणा बनवू शकेल ? या प्रस्नांची उत्तरे होकारार्थी आहेत. ती देण्यापूर्वि भारताच्या इतिहासाचे लेखन कोणी कसे केले ते पहिल्यांदा बघावे लागेल आणि मग हा हिंदूंचा इतिहात, हा मुसलमान किंवा शिखांचा इतिहास, हा अस्पृश्य किंवा भटक्यांचा इतिहास, या ऐवजी हा मनुष्य जातीचा इतिहास आहे. त्यामुळे तो माझा इतिहास नसून आपल्या सर्वांचा तो आहे अशी भावना, असे शहाणपण देणारे इतिहास लेखन कसे करता येईल याचा विचार करावा लागेल.
 
आज आपल्या समोर मला यापेक्षा अधिक बोलायचे होते. परंतु आज मी या व्याख्यानात आपल्याला एवढेच सांगितले आहे की, इतिहास लेखन करणारी माणसे ही माणसेच असल्यामुळे त्यांचा इतिहास लेखन हा शेवटचा शब्द मानण्याचे काही कारण नाही. हे इतिहास लेखन अभिनिवेशी का होते आणि ते समाजाच्या फार छोट्या वर्तुळापुरतेच मर्यादित कसे आहे ते वाचून हाच जणू संपूर्ण समाजाचा इतिहास होता असा गैरसमज करून घेता कामा नये. इतिहास लेखनाबद्दल आपली जिज्ञासा अधिक जागृत व्हावी म्हणून काही प्रश्न तसेच निरूत्तरीत ठेवले आहेत. ज्यावेळी माझा ‘ धर्म आणि इतिहास लेखन ’ हा ग्रंथ प्रकाशित होईल आणि तो लवकरच होईल असे वाटते त्यावेळी या प्रश्नांची विस्ताराने त्यात चर्चा केलेली आपणास बघावयास मिळेल.

आपल्या नगराध्यक्षांनी या व्याख्यानमालेचे निमंत्रण दिले, आपले ग्रंथपाल विठ्ठलराव पाटील हे मला या ठिकाणी घेऊन आले आणि आपण दोन दिवस एवढ्या संख्येने येऊन ही व्याख्याने शांतपणे ऐकलीत याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे.

। जय हिंद ।