धर्म आणि देव
प्राथमिक समाजातील विविध टोळ्यांच्या आणि गणांच्या धर्मांचा अभ्यास केलेले अभ्यासक आपल्याला असे सांगतात की त्या प्रत्येकांचे देवही वेगवेगळे होते. आपल्या देशात देवाच्या, परमेश्वराच्या संकल्पनेबद्दल फार हळवी मने आहेत. देवाचा आणि त्यावरील श्रध्देचा माणसाच्या मनात झालेला आहे. जीवनाच्या आणि विश्वाच्या अनाकलनीयतेतून त्यांची निर्मिती झालेली आहे. देवाला माणसाने जन्म दिला. त्याची वेगवेगळी रूपे कल्पिली. त्याला वेगवेगळ्या पध्दतीने सजविले आणि त्याच्याच पुढे शरणागती पत्करली. कशासाठीं ? तर जीवनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखाचे जीवन जगता यावे यासाठी. परंतु तरीही माणसांना सुखाचे जीवन जगत आले का ? सामान्य माणसांना सुख लाभले का ? या प्रश्नांची उत्तरे धर्माची निर्मिती कशी झाली हे समजल्यावाचून मिळणार नाही. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा कार्ल मार्क्सने प्रयत्न केलेला आहे. मार्क्सने रोख ठोक सांगून टाकले की
“ धर्माची निर्मिती माणूस करतो. धर्म माणसाला निर्माण करीत नाही. ज्या माणसाला अद्याप स्वत:चा शोध लागलेला नाही किंवा जो माणूस स्वत:ला पुन्हा हरवून बसलेला आहे. अशा माणसाची धर्म ही स्वयंजाणीव किंवा आत्मभाव असतो. परंतु माणूस काही या जगाच्या बाहेर अमूर्त रूपात अस्तित्वात असत नाही. माणूस माणसांच्याच जगात राहतो. हे जग म्हणजे समाज आणि राज्यसत्ता यांनी बनलेले असते. हा समाज आणि ही राज्यसत्ताच धर्माला जन्म देते हा धर्म म्हणजे जगाविषयीची उफराटी जाणीव असते. कारण हा समाज आणि ही राज्यसत्ताच उफराटी असते. अशा या धर्माचे सार, त्याचे तर्कशास्त्र, त्याचे अध्यात्म, त्याचा उत्साह, त्याचे नैतिक अधिष्ठान आणि गांभीर्य, त्याचे सार्वत्रिक दिलाशाचे स्त्रोत आणि समर्थन हे सर्व म्हणजे या उफराट्या जगाचा सामान्य सिध्दांत आहे. हा धर्म म्हणजे मानवी सारतत्वाची काल्पनिक जाणीव आहे. कारण या मानवी सारतत्वाला या समाजात आणि राज्यात खरे अस्तित्व नसते.” मार्क्स म्हणून आत्मशोधाची आणि आपल्या हरवलेल्या माणूसपणाची आपल्याला सतत आठवण करून देतो. हा आत्मशोध आपल्याला घेता येऊ शकतो आणि हरवलेले माणूसपण पुन्हा प्राप्त होवू शकते असा विश्वास मार्क्स आपल्याला देतो. त्यासाठी तर तो क्रांतीची, जग बदलण्याची, जगाची पुनर्रचना करण्याची भाषा करतो.
मार्क्सवर आजवर आपल्या मराठी तथाकथित विचारवंतांनी फार अन्याय केलेला आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे ’ हे एक सुटे वाक्य घेऊन आणि जनतेच्या धार्मिक भावनेच्या आस-याने जनतेच्या मनात त्याच्याबद्दल एक अनामिक तेढ निर्माण करून ठेवलेली आहे. परंतु मार्क्सला काय म्हणायचे आहे हे नीट समजावून घेणे आज आपल्याला फार जरूरीचे झालेले आहे. त्याला नीट समजावून घेतले नाही तर आज विविध धर्माच्या मूलतत्ववाद्या विरूध्द तुम्हाला वैचारिक आणि व्यावहारिक लढा करता येणार नाही. मार्क्स आपल्याला “धर्माविरूध्द लढा हा प्रत्यक्षपणे धर्म ज्या जगाचा अध्यात्मिक सुगंध आहे त्या उफराट्या जगाविरूध्दचाच लढा आहे” असे सांगतो.