संस्थात्मक धर्म
आपले महाभारत आपल्याला सांगते की,
न राज्यं न च राजा..सीत न दण्ड्यो नच दण्डिक:|
धर्मेणैव प्रजा:सर्वा रक्षन्ति स्म परस्परम् ||
याचा अर्थ राज्य नव्हते. आणि राजाही नव्हता, अपराधी नव्हता आणी त्याला शिक्षा करणारेही कोणी नव्हते. सर्वच समूह परस्पराचे रक्षण धर्माने करीत होता. धर्म हीच त्यांना समुहजीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे नियम देणारी शक्ती होती. धर्म आणि नीती नियमांचा उगम माणसाच्या या समूहजीवन जगण्याच्या आवश्यकतेत आहे. म्हणूनच धर्माविरूध्द एवढी प्रचार मोहीम झाली तरी ते चिवटपणे अस्तित्वात आहेत. मानवाच्या मनात धर्मभक्तीला एक शाश्वत स्थान निर्माण झाले ते समुहजीवन जगण्याच्या आवश्यकतेतून. ही समूहजीवन जगण्याची आवश्यकता आपण धर्माऐवजी कोणत्या साधनाने पुरी करणार आहोत. यावरच धर्माचे भवितव्य अवलंबून आहे.
भारतात धर्माचा उद्य कसा झाला हे शोधायचे म्हणजे भारतात आर्य कसे आले, त्यांचे इथल्या दास आणि दस्यु किंवा पणी या मूळच्या रहिवाशांशी संघर्ष कसे उडाले. त्यात आर्यांचा विजय होवून इथले मूळचे रहिवाशी आणि आर्या या दोहोंनी मिळून समाज स्थिर करण्यासाठी कसे प्रयत्न केले याचा तपशील शोधणे होय. हा तपशील व्याख्यानातून आपल्याला सांगणे अशक्य आहे. भारतीय समाजात ज्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या त्यांच्यात सामंजस्य निर्माण करून समाज सुस्थिर करण्यासाठी चातुर्वर्ण्य पध्दती, आश्रमधर्म, विवाहसंस्था इ. ज्या गोष्टी तयार केल्या त्या सर्वांना मिळून ‘धर्म’ म्हणतात. यालाच पुढे वैदिक धर्म म्हणू लागले आणि तोच सनातन धर्म ठरला. हिंदू धर्म तर अगदी अलिकडचा शब्द आहे. आज आपल्यापैकी अनेकांना ‘ हिंदू ’ या शब्दाने नवे चैतन्य आणले आहे परंतु हा शब्दच आपल्याला परकीय आक्रमकांची देन आहे. आपण सिंधूनदीच्या काठी राहणारे म्हणून परकीय लोक आपल्याला ‘ सिंधूलोक ’ म्हणत परंतु त्यांचा ‘स’ या शब्दाचा उच्चार ‘ह’ होत असे. युरोपीय भाषात ‘स’ चा उच्चार ‘ह’ होतो. त्यामुळे आपणास ‘सिंधूलोक’ ऐवजी ‘हिंदूलोक’ म्हणू लागले आणि तेंव्हा पासून आपण स्वत:लाही हिंदू म्हणवून घेऊ लागलो.
वास्तविक पाहता प्राथमिक अवस्थेतील धर्म म्हणजे चोदनालक्षणोऽर्थो धर्म :| या जैमिनीने सांगितलेल्या सूत्राप्रमाणे होते. हा धर्म समाजाने दिलेल्या आज्ञा पाळणे एवढ्यापुरताच मर्यादित होता. कणादाने धर्मासंबंधी
यतोऽभ्युद्यनि: श्रेयससिध्दि: स धर्म:|
असे म्हणलेले असले तरी कणादांनी सुध्दा उच्चतर सुखाची प्राप्ती ज्यापासून होईल तेच कर्म धर्म्य ठरविलेले आहे.