गांधींनी स्वातंत्र्याची एवढी चळवळ केली. पण शेवटीच्या काळात ते एकाकीच. राहिले. कॉंग्रेसने स्वातंत्र्यसंग्रामात त्यांचे नेतृत्व पत्करले. पण त्यांचा जीवनविषक दृष्टीकोन तिने कधीच मान्य केला नाही. आंदोलनाच्या काळात लोकांच्या उत्साहाला उधाण यावयाचे. पण ती लाट ओसरली की समाज आपल्या नेहमीच्या संथ गतीनेच वाटचाल तरीत राही.
भारतातील लोकांना आपला हिंदू धर्म व आध्यात्मिक परंपरा यांचा फार मोठा अभिमान आहे. पण आत्मपरिक्षण आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण यांचा आपल्याकडे अभावच आहे. युरोपातील विचारवंतांनी ख्रिस्ती धर्माचा बारकाईने अभ्यास करून आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड घालण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे. आपणही आता विज्ञानाच्या युगात आहोत आगगाडी, मोटार, मायक्रोफोन, विजेचे दिवे या वाचून चालत नाही. मात्र आपल्या आध्यात्मिक श्रेष्ठतेचा अजूनही आपल्या खोटा अहंकार आहे. आध्यात्मिक परंपरेचे गोडवे गात असताना धान्यासाठी परदेशावर अवलंबून राहण्याची आपणास शरम वाटत नाही. मिथ्याभिमानाची ही जुनी परंपरा बुध्दिवादाच्या भट्टीत घालून शुध्द करण्याची वेळ आता आलेली आहे. नवा सामर्थ्यवान एक संघ समाज निर्माण करावयाचा असेल तर परंपरेतील जीर्ण, हिणकस भाग टाकून देण्यावाचून गत्यंतर नाही.
आपल्या मनातील परंपराप्रियतेचा जातियवादी गटांनाच नेहमी फायदा मिळतो मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल याची साक्ष देतील. ‘वंदे मातरम्’ च्या प्रश्नावरून महापालिकेत चकमक उडाली. वंदेमातरम् आग्रह धरून आपले दशप्रेम सिध्द करण्याची कॉंग्रेस व समाजवाद्यांमध्ये अहमहमिका लागली. हे गीत न म्हणणे हा मुस्लीम लीगने तर धार्मिक प्रतिष्ठेचा प्रश्न करून ठेवला. परिणाम काय झाला ? डाव्या पक्षांना १४० पैकी इनमिन आठ अधिक चार जागा. फायदा मात्र जातीय पक्षांचा. मुस्लीम लीगच्या जागा दोन वरून सोळा गेल्या. जनसंघाचे सहाचे पंधरा झाले. शिवसेनेचे तेवढेच राहिले. म्हणजे मध्यंतरीच्या काळात या संघटनची लोकप्रियता कधी होऊनही तिचे संख्याबळ घटले नाही. कोणत्याही प्रश्नाला हिंदूमुस्लिम तेढीचे भावनात्मक रूप दिल्यास प्रतिगामी पक्षांचे फावणार हे उघड आहे. या अतिरेकीपणाला खतपाणी घालून आपण रक्तपात व गोळीबार यांना उत्तेजन देणार आहोत का ?
भारतीय घटनेनुसार जातिधर्मनिरपेक्ष समाज निर्माण करण्याची आपण प्रतिज्ञा केली पण स्वातंत्र्योत्तर काळात निवडणुकांच्या राजकारणात जातीय भावनेला खतपाणीच मिळाले. निवडणुकीसीठी उमेदवार उभा करताना प्रत्येक पक्ष जातीचा विचार करतो. इथे मांगांची वस्ती असेल, तर मांग उभा करा. आग-यांची असेल तर आगरी कार्यकर्त्याला तिकीट द्या. सत्ताधारी पक्ष हा विचार करतो मग विरोधी पक्ष तर दुबळेच आहेत. निवडणुक लढवायची तर तत्त्वनिष्ठेचा बडेजाव माजवणे त्यांना परवडत नाही. म्हणून तात्कालिक लाभहानीचा विचार करतात. अशा या दुष्ट चक्रात आपण सापडलो आहोत. आणि इतके करूनही डाव्या पक्षांना स्थैर्य नाही. फुटीरपणा चालूच आहे. मंत्रीमंडळे वारंवार गडगडत आहेत. केवळ विरोधी पक्षांचीच नव्हे तर कॉंग्रेसचीही. एक कोट काढून दुसरा घालावा इतक्या सहजपणे नामदार पक्ष बदलतात. त्यांच्यामध्ये ना ध्येयवाद ना तत्त्वनिष्ठा. या पक्षांच्या व्दारे समाजपरिर्वतन होईल अशी अशा कारायला जागा आहे कां ? सत्ताधारी सामान्यत: क्रांती करीत नाहीं. कुठेही पहा तो सत्तेला चिकटून राहातो. आणि संधीसाधू माणसे त्याच्याभोवती गोळा होतात. पण बहुसंख्य लोक ज्या पक्षाच्या बाजूला आहेत तो पक्ष काहीच करणार नाही ह्ही खरे नाही. लोकमताचा दबाव आला तर स्वत:चे अस्तित्व टिकवून धरण्यासाठीं तरी त्याला दोन पावले पुढे टाकावि लागतील. पण एवढा दबाव आणण्याचे कामही विरोधी पक्ष करू शकत नाहीत. कारण प्रत्येक विरोधी पक्षाची शकले झाली आहेत. कॉंग्रेस द्र. मु. क. हेही यापासून मुक्त राहु शकले नाहीत. कम्युनिस्ट कधी न फुटणारे पण त्याचेही तीन तुकडे झाले. म्हणजे हा नुसता एका पक्षाचा रोग नाही.