व्याख्यानमाला१९७३-१९

खेड्यापाड्यांतील सर्व थरांमध्ये राजकारणाबद्दल आज जी आस्था दिसून. येते ती इंग्रजांच्या अमदानीत निर्माण झालेली आहे. त्याच्या पूर्वी गावकी स्वयंपूर्ण असे. संकुचित गावगाड्यातच लोकांचे सारे जीवन सामावलेले असे. खेड्यातील अर्थव्यवस्था जातीवर आधारलेली होती. खेड्यात पारशी होते, मुसलमान होते. पण हिंदू धर्मातील इतर जातीप्रमाणे एक वेगळी जात म्हणून ते लोकात वावरत. गावकीचा सर्व व्यवहार रूढीने बंदिस्त होता. जातीजातीत तंटा उत्पन्न झाला की, पंचाचा निर्णय होई. तो सर्वाना मान्य करावा लागे. स्थितीशील समाजजीवनात या तंट्यामधून गावाचे जीवन उध्वस्त होत नसे. आता प्रत्येकाच्या मनात समृध्द जीवनाच्या आकांक्षा निर्माण झाल्या आहेत. देशाच्या संपत्तीत आपल्याला आपला न्याय्य वाटा मिळाला पाहिजे असे प्रत्येक गटाला वाटू लागले आहे. ज्याला वाढत्या आकांक्षाची क्रांती (Revolution of rising expectation) असे म्हणतात ती स्वागताई घटना आहे, पण तिच्यामधूनच सामाजिक जीवनात नवे ताण निर्माण होत आहेत. मध्ययुगातील अगदी धामधुमीचा काळ सोडला, तर खेड्यापाड्यामध्ये हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने राहात होते. पूर्वीच्या काळी हिंदुमुसलमान सर्सहा एकमेकांच्या कत्तली करीत असत. असे चित्र पुष्कळदा रंगविले जाते पण ते बरोबर नाही. कत्तली फार थोड्या लोकांच्या होत आणि त्यातही नेहमी हिंदु मुसलमान असेच तंटे होत असे नाही. मुसलमानी राजवटीत परदेशी आणि दक्षिणी असे राजकर्त्यातच दोन तट होते. त्यांच्या झगड्यातही ते एकमेकांच्या कत्तली करीत. हिंदु राजे हिंदूंच्या आणि मुसलमान राजे मुसलमानांच्याही कत्तली करीत. त्या काळातील सत्तासंघर्षात. नेहमीच कत्तली होत दिल्लीच्या तक्तासाठीसुध्दा अनेक मुसलमानांचे शिरच्छेद झालेले आहेत. मध्ययुगीन राजकारणच पाशवीबळावर पोसलेले होते. त्यात हिंदु-मुस्लीम कलह अजिबात नव्हता असे मला म्हणावयाचे नाही. पण तो किती होता आणि त्यात मध्ययुगीन विचारसरणीचा भाग किती होता हे आपण समजुन घेतले पाहिजे. जुन्या काळी हिंदू मुसलमानांचे तंटे असले, तरी त्यात आजच्या इतकी कटुता नव्हती. याचे कारण असे की खेड्यांत मुसलमानांची दोनचारच करे असावयाची. त्याना हे माहीत असे की दिल्लीत जरी मुसलमान राजा असला, तरी मला त्याचा उपयोग होणार नाही. माझ्यावर आपत्ती ओढवली तर माझा हिंदू शेजारीच धावून येईल आणि तसा तो धावून येतही असे. लीगचे राजकारण सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती मला आठवते. माझ्या एक आजी होत्या. त्यांचे इतके कडक सोवळे होते की घरात नातवंडानी शिवलेले ही त्यांना चालत नसे. पण एकादी मुसलमान बाई बाळंतपणात अडलीं, तर त्या त्यांच्या हाकेला धावुन जात. त्या जातीचा विचार करीत नसत. घरीं येऊन तेव्हा अंघोळ करीत. म्हणजे त्यांचे सोवळे माणुसकीच्या, गावातील सहकार्याच्या आड येत नसे. गावातले जीवन सर्वांच्याच सहकार्याने चाले. तेव्हा त्याकाळचे प्रश्न आणि आजचे प्रश्न यांची आपण गल्लत करू नये. इतिहास हा इतिहास म्हणूनच वाचला पाहिजे. इतिहासातील भांडणे आपण आज आपल्या जीवनात आणु नयेत. आजचे प्रश्न आजच्या पुरोगामी शक्तीचा विचार करूनच सोडविले पाहिजेत.

राष्ट्रीयत्वाची भावना आधुनिक काळात नव्याने निर्माण झाली असे आपण म्हणतो. ही कशी निर्माण झाली ? पूर्वीच्या काळी भारतात अनेक राज्ये होती. इंग्रजांनी भारताच्या ब-याचशा भागावर प्रथम आपली सत्ता स्थापित केली. त्यांनी दळणवळणाची साधने मोठ्याप्रमाणावर अस्तित्वात आणली. सर्वत्र एक नाणेपध्दती सुरू केली. व्यापारावरील अंतर्गत निर्बंध दूर केले. तेव्हा समान शासनपध्दती, समान गा-हाणी आणि समान गरजा यांमधून आपण सर्व एका राष्ट्राचे नागरिक आहोत ही कल्पना १८७० च्या सुमारास उद्यास आली. तिच्यामधुनच पुढे १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली. कॉंग्रेसची स्थापना हिंदूनी केली असा पुष्कळांचा समज आहे. पण ती निघाली युरोपियांच्या प्रेरणेने. अँलन आँक्टोव्हियन ह्यू म आणि सर विल्यम वेडरबर्न हे तिचे संस्थापक. तिचे पहिल्या वर्षीचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे ख्रिस्ती. दुस-या वर्षीचे दादाभाई नौरोजी हे पारशी, तिस-या अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी हे मुसलमान होते. राष्ट्रसभेच्या कामात भाग घेणारे लोक संख्येने फार थोडे होते. बहुसंख्य समाज त्याकाळी आपल्या संकुचित अस्मितेतच अडकलेला होता. पण इंग्रजी शिक्षणामधून राष्ट्रवादाची नवी भावना निर्माण झाली. या भावनेमधुन निरनिराळ्या धर्माचे व जातीचे सुशिक्षित लोक एकत्र आले.