भांडवलशाहीतील सरकारातही शिरून अनेक सुधारणा घडवता येतात, अशी फेबियनांची धारणा होती. यामुळे सिडनी वेब हे तेव्हाच्या ब्रिटिश प्रशासनात अधिकारी म्हणून काम करत होते, त्यांनी नगरपालिकांच्या कारभारात सुधारणा करण्यास आरंभीच्या काळात प्राधान्य दिले. रक्तपात, हिंसक उठाव इत्यादी मार्गाचा अवलंब न करता उत्क्रांतिवादच प्रभावी ठरेल अशी शॉ याची खात्री होती. ते व सिडनी वेब यांनी क्रमाक्रमाने प्रगती हा अनिवार्य मार्ग असल्याचे मत दिले होते. तसेच गरिबांना न्याय देणे हे आपले उद्दिष्ट असून श्रीमंतांचा द्वेष हे नव्हे. हे फेबियनांनी स्पष्ट केले होते.
आयर्लंडच्या होम रूलच्या प्रश्नावरून सरकारचा निषेध करण्यासाठी लंडनमध्ये सभा होऊ लागल्या तेव्हा पोलिसप्रमुखांनी ट्रफाल्गार चौकात सभाबंदी जाहीर केली. ती मोडण्यासाठी हिंडमन यांनी स्थापन केलेल्या समाजवादी पक्षाने, १३ नोव्हेंबर १८८७ रोजी मोठा मोर्चा नेला. यास हिंसक वळण लागले. शॉ, अँनी बेझंट इत्यादी शांततेचे आवाहन करत होते, पण ते फोल ठरले आणि पोलिसांनी लाठीहल्ला केला. यानंतर हिंसक निदर्शने झाली नाहीत. लोकही त्यास तयार नव्हते. शॉ याने लिहिले की, कामगारांचा सशस्त्र उठाव घडवून सत्ता ताब्यात घेण्याचा मार्ग मार्क्सने प्रतिपादन केला असेल, पण अखेरीस मार्क्स इंग्लंडमध्ये परदेशीच राहिला. त्याला ब्रिटिश जनतेच्या स्वभावाची काही जाणीव नव्हती.
हे सगळे इथे सांगण्याचे कारण, पंडित नेहरूंची वैचारिक व मानसिक ठेवण कशी घडली होती ते स्पष्ट व्हावे. सरकारी सत्ता वापरून जितके लोककल्याण साधता येईल तितके साधावे; शांततामय निदर्शने रास्त असली तरी हिंसक वा सशस्त्र उठाव समर्थनीय नाही; क्रांतीऐवजी उत्क्रांती अधिक चिरस्थायी ठरते हे, नेहरू फेबियन पंथापासून शिकले आणि नेहरूंच्या विचारांच्या प्रभावामुळे यशवंतरावांची धारणा तशीच झालेली होती व त्यांची मनोवृत्तीही यास अनुकूल होती.
या दृष्टिकोणातून यशवंतराव देशातल्या परिस्थितीचा आणि विविध व्यक्तींचा विचार करत होते; त्याचबरोबर ते आत्मपरीक्षणही करत. आपल्या धोरणांचा व कृतीचा ते काहीशा अलिप्तपणे आढावा घेताना दिसतील. असे आत्मपरीक्षण करण्याची वृत्ती १९७२-७३ पासून अधिकच वाढली वा ती काही जणांशी बोलताना प्रगट होत असताना दिसत होती. या संदर्भात वेणुताईंना ४ मे १९७५ रोजी जमेकामधून लिहिलेले पत्र उल्लेखनीय असल्यामुळे, ते अधिक विस्ताराने देणे आवश्यक आहे. यशवंतराव लिहितात, ‘गेल्या दोन-तीन दिवसांत प्रश्नांनी काहूर केले आहे. याचा अर्थ ते प्रश्न काही दोन तीन दिवसांत निर्माण झालेले नाहीत. गेले अनेक महिने व काही वर्षे म्हटले तरी चालेल, हे प्रश्न जमून गेले आहेत-पुढल्या वर्षी तीस वर्षे होतील, मी पहिली निवडणूक जिंकून सरकारमध्ये आलो. अनेक अडचणी आल्या. परिश्रम करावे लागले. अनेकांचे आशीर्वाद मिळाले. लौकिक अर्थाने नावलौकिक मिळाला. सत्तेची अनेक स्थाने पाहिली. राज्यात व केंद्रात. सामान्य अर्थाने कुणालाही हेवा वाटावा अशी.
मीही अशा स्थानांची महत्त्वाकांक्षा धरली होती हे म्हणणे खरे नाही. किंवा त्यासाठी कुणाच्याही पाठीमागे लाचारीने गेलो नाही-टीकाकार स्वाभाविकच सत्तेच्या मागे लागले आहेत वगैरे म्हणणार, याची मला कल्पना आहे. मी त्यांच्याशी वाद घालायला जाणार नाही-जाणीवपूर्वक सत्तेचा उपयोग समाजाच्या परिवर्तनासाठी करावयाचा माझा प्रयत्न राहिला. नव्या विचारांना सामोरा गेलो. मुख्यतः दलितांबद्दल कणव ठेवून सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे, ही माझी प्रेरणा प्रथमपासूनची होती. माझ्या हातात संपूर्ण(?) सत्ता होती तेव्हा त्या सत्तेचा आग्रहाने व योजनापूर्ण दृष्टीने आणि वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टासाठी उपयोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.