यशवंतराव या रीतीने खासदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच, ८३ सालात वेणुताईंचे निधन झाले. यशवंतरावांच्या भावना कोणत्या असतील याची कल्पना येण्यासाठी, त्यांनी वेणुताईंना लिहिलेल्या एका पत्राचा दाखला दिला पाहिजे. यशवंतराव १९७४ साली कौलालंपूर इथे असताना त्यांना वाचायला आणलेले पुस्तक उघडले. त्यांनी सावकाशीने आवडते पुस्तक वाचावे म्हणून नेले होते. या पुस्तकाचा लेखक एक ब्रिटिश विचारवंत होता. ४०-५० वर्षे संसार केलेल्या आपल्या पत्नीला त्याने हे पुस्तक अर्पण केले होते. त्याची अर्पणपत्रिका ही त्याने पत्नीचे नाव बदलून एका फ्रेंच लेखकाने लिहिलेली अर्पणपत्रिका होती. त्या लेखकाच्या भावना याच आपल्याही आहेत हे यशवंतरावांनी वेणुताईंना लिहिले होते. अर्पणपत्रिका अशी : ‘तुझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे. तुझ्या उदार अंत:करणामध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे.’ असे मनोमीलन झालेली पत्नी निधन पावल्यावर यशवंतराव पूर्णत: खचले. त्यांच्या मनाची सारी उभारीच संपली आणि वर्ष संपते तोच, यशवंतरावांचे २५ नोव्हेंबर १९८४ रोजी निधन झाले.
यशवंतरावांच्या निधनास पंचवीस वर्षे झाली असल्यामुळे, त्यांच्या राजकीय व व्यक्तिगत जीवनाचा आढावा काहीशा वस्तुनिष्ठतेने घेणे शक्य आहे. एक व्यक्ति म्हणून पाहिले तर त्यांचा पहिला काळ हा आर्थिक अडचणींचा होता. त्यातही ते स्वातंत्र्य आंदोलनात सामील झाले आणि मग स्वातंत्र्य आल्यानंतर एका मागोमाग एक अशा जाबाबदारीच्या पदांवर काम करून, त्यांनी आपल्या अंगची कर्तबगारी दाखवून दिली. पण आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांत त्यांना अनुकूल असे फासे पडले नाहीत. विविध महत्त्वाच्या खात्यांची मंत्रिपदे भूषविलेल्या यशवंतरावांवर एक खासदार म्हणून वावरण्याची वेळ आली. त्यातच पत्नीवियोगाचे दु:ख वाट्याला आले. ही एक शोकान्तिका म्हटली पाहिजे. नाटक, कादंबरी, चित्रपट यांतील शोकान्तिका अनेकदा सुखान्तिकेपेक्षाही लोकप्रिय होतात आणि लोक पुन्हा पुन्हा त्या वाचतात वा पाहताता. पण ही शोकान्तिका मात्र वारंवार आठवावी अशी नाही.
ज्यांनी यशवंतरावांचे व्यक्तित्व व कर्तृत्व पाहिले त्यांना ते आठवत राहते आणि सध्याची देशाची व महाराष्ट्राची अवस्था पहिल्यानंतर तर ही आठवण अधिक तीव्र होते. नवे विचार व अनुभव घेण्याची यशवंतरावांची वृत्ती पाहिल्यापासून अखेरपर्यंत होती. स्वातंत्र्य आंदोलनात असताना त्यांनी त्या काळातल्या नामवंतांचे विचार ऐकले आणि कारावास हे एक विद्यापीठ मानले. देश स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नांमुळे अखिल भारताचा विचार करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली आणि महाराष्ट्राची उन्नती ही देशाच्या उन्नतीचा भाग असल्याची भावना कायम मनात ठसली. तथापि राजकीय स्वातंत्र्यास आर्थिक व सामाजिक आशय असला पाहिजे याचे महत्त्व महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे यांच्यापासून ते समाजवादी पंथ व रॉय यांच्यापर्यंतच्या शिकवणुकीने मनावर बिंबले. वैचारिक बैठक, अधिकारपदाच्या काळात पुढे येणा-या समस्या हाताळताना उपयोगी पडली. नंतरच्या काळातील परदेश-प्रवास हाही त्यांना अधिक व्यापक दृष्टी देण्यास कारणीभूत झाला.
यशवंतरावांच्या कारकिर्दीचा विचार करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नेहरू काय, की यशवंतराव काय, यांनी या देशात क्रांती करण्याचा वसा घेतला नव्हता. संसदीय लोकशाहीच्या मार्गाने परिवर्तन घडवून आणण्याचे जितके प्रयत्न करता येतील तितके करावे, ही त्यांची धारणा होती. आपला अनेक दृष्टीने विभागलेला समाज आणि त्यातील बहुसंख्य लोकांची विपन्नावस्था, निरक्षरांची संख्या अधिक, यामुळे काही बंधने आली व येतात. आपण कायद्याचे राज्य स्वीकारले असून न्यायालय हाही एक घटक अंमलबजावणीच्या बाबातीत लक्षात घ्यावा लागतो. या अशा बंधनांच्या व निर्बंधांच्या चौकटीत राहून आपल्या नेत्यांनी, त्या काळात आपली जबाबदारी सांभाळली. तेव्हा त्यांनी सर्व प्रश्न कां सोडवले नाहीत, हा प्रश्न निरर्थक ठरतो. नेहरू काय, की यशवंतराव काय, याच्याबाबतीत एक समान घटक होता. तो हा, की अगदी सामन्य लोकांना ते अधिकाधिक प्रामाणिकपणे प्रयत्न करून अधिकांचे अधिक कल्याण साधू पाहत असल्याची मनोमन खात्री होती. अर्थात नेहरूंच्या बाबतीत ती अखिल भारतीय तर यशवंतरावांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या पातळीवर. म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना व यशवंतरावांचे नेतृत्व, यामुळे काही तरी नवे घडत असल्याची भावना तयार झाली आणि विश्वासाचे, उभारीचे एक वातावरण निर्माण झाले.