या प्रकारे यशवंतराव विरोधी नेता म्हणून काम करत असताना, जनता सरकार व इंदिरा गांधी यांच्यातला तणाव वाढत होता. जनता सरकारने इंदिरा गांधींच्या विरुद्ध अनेकविध खटले न्यायालयात चालवण्याची तयारी केली होती व चौकश्या केल्या जात होत्या. यास त्या तोंड देत असल्यामुळे, त्यांनी संसदेच्या बाहेर जनता सरकारविरुद्ध उग्र विरोध करण्याचा पवित्रा घेतला. त्यांना असेही वाटू लागले की, यशवंतरावांनी तसाच तो लकसभेत घ्यावा. पण संसदेच्या पातळीवरील विरोधालाकाही मर्यादा असतात व असाव्यात अशी यशवंतरावांची धारणा होती. विरोधी नेता म्हणून त्यांनी केलेली भाषणे वाचली, तर कोणत्याही आधुनिक व प्रगत देशांतल्या संसदेत भाषणे होतात तशीच ती होती, हे कबूल करावे लागेल. शिवाय यशवंतराव म्हणत की, त्यांनी दीर्घ काळ राज्याच्या व नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळात काम केले होते आणि त्यामुळे देशापुढच्या अडचणींची त्यांना कल्पना होती. या स्थितीत केवळ विरोधी नेता झाल्याबरोबर हे विसरून, सरसकट विरोध करणे आपल्याला शक्य नाही व मानवतही नाही. ही त्यांची खरोखरीची संसदीय वृत्ती होती. हे सर्व लक्षात घेऊन जयंत लेले यांनी जेव्हा म्हटले की, तुमची वृत्ती व राजकीय क्षेत्रातील कार्यपद्धती पाहिल्यास, इंग्लंडसारख्या प्रगत संसदीय लोकशाहीत वावरणे अधिक सुलभ झाले असते. यशवंतरावांनी, ते बरोबर आहे असे उत्तर दिले होते.
काँग्रेस सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर पुन्हा ती अधिकारावर येईल की नाही, व आल्यास यशवंतरावांचे स्थान काय असेल, हे सर्व अनिश्चित झाले होते. जयंत लेले यांनी मग ज्या तीन पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळांत मंत्री म्हणून यशवंतरावांनी काम केले त्यांचे स्वभाव, कार्यपद्धती इत्यादी स्पष्ट करण्यास सांगितले असता, यशवंतरावांनी प्रथमच सांगून टाकले, की पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विचार ते केवळ पंतप्रधान म्हणून करत नसत. ते आपले नेते आहेत, इतकेच नव्हे, ते आपले दैवत आहे अशी त्यांची भावना होती. हे सांगून मग द्वैभाषिकाच्या मंत्रिमंडळासंबंधी माहिती देत असताना आपल्याला आलेला अनुभव यशवंतरावांनी निवेदन केला. यशवंतराव माहिती देत असताना नेहरूंचे लक्ष नसल्याचे त्यांना जाणवले. मग ते उठले व आपला आशीर्वाद असू दे, असे म्हणाले. तेव्हा माझा आशीर्वाद असा सहज मिळणार नाही, असे नेहरूंनी उत्तर दिले. त्याबद्दल यशवंतरावांना खंत वाटली. नंतर वर्षभरात नेहरू जेव्हा मुंबईत येत, तेव्हा विमानतळावरून राजभवनापर्यंत राज्यपाल श्रीप्रकाश यांच्यासमवेत नेहरूंचा प्रवास होई, हे यशवंतराव पाहत व ते स्वतः दुस-या मोटारीत बसत. तथापि वर्ष संपल्यावर नेहरू परदेश दौ-यावरून पहाटे चारच्या सुमारास परतले तेव्हा यशवंतराव स्वागतास हजर होते आणि राज्यापाल नव्हते. यामुळे नेहरूंबरोबर मोटारीतून जाण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. मोटारीत बसल्यावर नेहरूंनी विचारले, आज तुम्ही प्रथमच माझ्याबरोबर प्रवास करत आहात. तेव्हा राज्यपाल नेहमी असतात आणि तुमचाव त्यांचा जुना स्नेह असल्यामुळे त्यांच्याबरोबर तुम्ही जाणे योग्य असे आपण मानत होतो, असा खुलासा यशवंतरावांनी केला. मग नेहरू म्हणाले, ते खरे नाही. मग आपण वर्षापूर्वी काय म्हणालो ते आठवते काय? यशवंतरावांनी उत्तर दिले की ते विसरले नाहीत. तुम्ही जे बोललात ते आपण कसे विसरणार? यावर नेहरू म्हणाले आता ते विसरा. अनेकदा मला वाटत असे की मी आशीर्वाद कसा काय देणार? पण मी तुम्हांला माझा पाठिंबा दिला पाहिजे. हे सांगून यशवंतराव म्हणाले की, ही त्यांची पद्धती होती. यावरून त्यांचा स्वभाव समजू शकतो.
आपण दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून आलो तेव्हा दुर्दैवाने नेहरू शारीरिक व राजकीयदृष्ट्या दुर्बळ झाल्याचे यशवंतरावांना दिसले. नेहरू तेव्हा फारसे काही निर्णय घेत नसत. पहिल्यापासून मंत्रिमंडळ वा काँग्रेस कार्यकारिणीत नेहरू सर्वांना बोलायला सांगत आणि मग सर्वांच्या बोलण्याचा सारांश ते सांगत. हे सारांश सांगणे फार महत्त्वाचे असे. मग नेहरू अशा प्रकारे आपला निर्णय सांगत, की प्रत्येकाला आपण सहभागी होतो असे वाटत असे. यशवंतराव दिल्लीत आले तेव्हा काही वेळा नेहरूंच्या या वैशिष्ट्याचा प्रत्यय येत होता, पण अनेकदा ते आत्मचिंतनात गढलेले दिसत. तेव्हा मंत्रिमंडळातील त्यांच्या कार्यशैलीची इतरांशी तुलना करणे बरोबर होणार नाही. नेहरू सर्वांच्यापेक्षा वरच्या पातळीवर होते. त्यांच्या समोर वाद वा चर्चा करण्याची कोणाची हिम्मत होत नसे. पण तेच इतरांना बोलायला लावत.
लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यशैलीत नेहरूंची नजाकत नव्हती. तेही सहका-यांना त्यांची मते देण्यास सांगत. पण अनेकदा असे वाटत असे की, शास्त्री अगोदरच आपले मत बनवून आले आहेत. काही प्रश्न व्यापक असत व त्यांवर चर्चा होत होती. मात्र अनेक राजकीय व प्रशासकीय बाबतीत त्यांचे स्वतःचे मत बनलेले असे. यामुळे मंत्रिमंडळ निर्णय घेत असल्याचे जाणवत नव्हते. पण उत्तरप्रदेशामधील पेचप्रसंगाच्या बाबतीत त्यांचे ज्ञान पक्के असल्याचे दिसून आले तसेच काही कृती करायची असेल तर शास्त्रींच्याबरोबर आपण विश्वासाने जाऊ शकतो अशी आपली भावना होती, असे यशवंतरावांनी म्हटले आहे. शास्त्री त्यांच्या विशिष्ट वर्तुळातल्या लोकांच्या पलीकडे कोणाशी विश्वासाने बोलत नसत.