- आणि महाराष्ट्र शेत जमीन धारणा विधेयकांतील कमाल मर्यादा विदर्भांतील काँग्रेस आमदारांच्या सल्ल्यानेच निश्चित झालेली आहे, ही गोष्ट कोणता काँग्रेस कार्यकर्ता नाकारू शकेल ? किंबहुना, विरोधी पक्षाच्या मताचा आदर करीत असतांनाहि पक्षसंघटनेला आणि पक्षांतील कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावयाचें, हें यशवंतरावांच्या राजकीय व्यवहाराचें महत्त्वाचें सूत्र आहे, असें म्हटलें तरी चालेल. 'विदर्भांतील विदर्भवादी काँग्रेस कार्यकर्त्याना यशवंतरावांनी जवळ केलें आणि संयुक्त महाराष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना बाजूला फेकलें, ' असा आरोप वारंवार केला जात असल्याने विदर्भांतील एका ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याने मला सांगितले, "मी स्वत: संयुक्त महाराष्ट्रवादी होतों आणि आहें. यशवंतराव विदर्भवादी कार्यकर्त्यांना जवळ घेतात याचें मला वैषम्य वाटत नाही आणि त्यांत यशवंतरावांची चूक होते आहे, असेंहि वाटत नाही. आज विदर्भवादी कार्यकर्त्यांना दूर केलें तर पक्ष विस्कळित होईल, ही वस्तुस्थिती आहे. अशा स्थितींत यशवंतरावांनी जें धोरण स्वीकारलें आहे तेंच योग्य आहे. पक्षसंघटना टिकली पाहिजे यासाठी ज्या माणसाने द्विभाषिक पत्करून स्वत:वर जनतेचा क्षोभ ओढवून घेतला, त्या माणसाने नागपूर प्रांतांतील काँग्रेस संघटना जिवंत राहावी यासाठी विदर्भवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना जवळ करावें, यांत नवल नाही. म्हणून याबाबत कोणी स्वत:चा गोंधळ करून घेऊं नये." या गोष्टीला आज वर्ष होऊन गेलें आहे; आणि दरम्यान 'यशवंतरावांचेंच धोरण होतें' असा निर्वाळा काळाने दिला आहे !
राजकीय क्षेत्राच्या बाहेर पडल्याबरोबर यशवंतरावांविषयी नेहमी ऐकू येणारी तक्रार म्हणजे, 'राजकारणामध्ये यशवंतरावांचा फार वेळ जातो आणि त्यामुळे शासनापुढील औद्योगिक शैक्षणिक, सामाजिक समस्यांचा पूर्ण विचार करून योग्य निर्णय ते घेऊं शकत नाहीत.' राजकीय समस्यांकडे यशवंतराव जितकें लक्ष पुरवितात तितकें लक्ष ते इतरहि क्षेत्रांतील समस्यांकडे पुरवूं शकले तर 'महाराष्ट्राच्या जीवनाचा सर्वांगीण कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही' असा विश्वास अनेक क्षेत्रांतील जाणकार व्यक्तींनी खाजगी बैठकीमध्ये बोलून दाखविला आहे. असें विश्वासाचें वातावरण तयार झाल्यामुळे मजुरांना, शिक्षकांना, महापालिकेच्या कामगारांना, आयुर्वेंद विद्यार्थ्यांना किंवा नागपरच्या संतप्त विणकरांनादेखील 'आमचें म्हणणें चव्हाणांनी ऐकावे आणि त्यांनीच आमचा प्रश्न सोडवावा' अशी मागणी करावीशी वाटते. २४ डिसेंबर १९६० रोजीं नागपुरांत, मुख्य मंत्र्यांच्या कार्यालयांत, ३०० निमंत्रित विणकरांची अभूतपूर्व सभा झाली. या सभेंत संतप्त आवेशांतील भाषणेंच विणकरांमधून अधिक झालीं. पण याहि सभेंत, गोळीबार चौरस्त्यावर राहणारा एक जुना काँग्रेस कार्यकर्ता असें बोलवून गेला की, "मी विणकरांचे प्रश्न सोडवितों, असें म्हणणारा मुख्यमंत्री आम्हांला प्रत्यक्ष भेटतो आहे." – आणि विणकरांच्यासाठी शैक्षणिकसंस्था उभारण्याचें कार्य जलदगतीने पूर्ण झाले तर 'आमच्या विणकर समाजांत मुळापासून बदल होईल आणि आमच्यांतील असंतोषाचा निचरा होईल' असें अगदी अलीकडेच एका प्रमुख विणकर पुढा-याने माझेजवळ कळकळीने सांगितले.
'यशवंतराव हे महाराष्ट्राचे मारेकरी आहेत' अशा शब्दांत यशवंतरावांची संभावना करणारे अवघ्या दोन वर्षांत 'यशवंतराव हे अत्यंत दूरदृष्टीचे मुत्सद्दी आहेत,' असा गौरव आता करूं लागले आहेत. 'द्विभाषिक पत्करून चव्हाणांनी महाराष्ट्र काँग्रेस धुळीस मिळविली' असा आरोप करणारे काँग्रेसजन आता 'यशवंतरावांनी महाराष्ट्र काँग्रेसची रसातळाला गेलेली प्रतिष्ठा पुनश्च मिळविली' असा निर्वाळा देऊं लागले आहेत. 'यशवंतरावांना स्वत:चे वेगळें अस्तित्व नाही. कोणाचें तरी बोट धरून चालण्याशिवाय त्यांना गति नाही' असा कयास बांधणारे आता 'यशवंतरावांनी भारताच्या राजकारणांत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे' अशी मान्यता देऊं लागले आहेत. इतकेंच नव्हे, तर पूर्वीच्या या सर्व टीकाकारांना आता अगदी मनापासून असें वाटतें की, 'यशवंतरावांच्या हातीं महाराष्ट्राचे भवितव्य जेवढें सुरक्षित आहे तेवढें इतर कोणाच्या हातीं राहूं शकेल की नाही हा एक प्रश्नच आहे.'