राजकीय जीवना चलच्चित्रपट
एक वार्ताहर
आजच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कालच्या मुरारजीभाईंच्या मंत्रिमंडळांतील एक पार्लमेंटरी सेक्रेटरी श्री. यशवंतराव चव्हाण यांना मी प्रथम केव्हा व कशासाठी भेटलों तें आता मला निश्चित आठवत नाही. कदाचित् विधान सभेंत त्यांना मी प्रथम पाहिलें असेल, कदाचित् मुरारजीभाईंबरोबर ते एखाद्या प्रेस कॉन्फरन्सला हजर राहिले असतील ! त्या वेळीलक्ष वेधून घेण्यासारखे त्यांच्यांत कांही नसावें म्हणून त्या वेळची मला आठवण नसावी.
आजचे डेप्युटी मिनिस्टर व त्यावेळचे पार्लमेंटरी सेक्रेटरी यांत बराच फरक आहे. त्यावेळीं पार्लमेंटरी सेक्रेटरीला विशेष असे अधिकार नसत. श्री. चव्हाण यांच्याबरोबर श्री. नानासाहेब कुंटे व श्री. पी. के. सावंत हेहि पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. त्यांनी आपापलें खातें त्यावेळींहि गाजविल्याचें आठवतें. सिध-पंजाबमधून येणा-या निर्वासितांना मुंबई शहरांत स्थायिक होऊं द्यावयाचें नाही हें धोरण पुढे रेटतांना श्री. सावंत यांना निर्वासितांच्या निदर्शनांनाहि तोंड द्यावें लागलें होतें. श्री. नानासाहेब कुंटे यांच्याकडे अँकोमोडेशन कंट्रोल खातें होते. त्यासंबंधी बोलावयासच नको. सारांश, शासनांत श्री. सावंत व श्री. कुंटे त्यावेळी श्री. चव्हाण यांच्या बरेच पुढे होते.
संघटना क्षेत्रांतहि असाच प्रकार होता. १९४६-५२ या काळांत महाराष्ट्रांतील एकूण राजकीय जीवन अगदी घुसळून निघत होतें. समाजवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे काँग्रेस संघटनेला पडलेल्या खिंडाराचें श्री. जेघे-मोरे यांच्या नेतृत्वाखाली बहुजनसमाजवादी गट बाहेर गेल्यामुळे अगदी भगदाडच झालें होतें. संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली होती व संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न डोकें वर काढीत होता. अशा वेळी महाराष्ट्र काँग्रेसचें नेतृत्व कोणाकडे असावें हा ज्येष्ठ नेत्यांपुढे एक प्रश्न होता. यावेळी संघटना क्षेत्रांत श्री. भाऊसाहेब हिरे हळूहळू पुढे येते होते व त्यांनी जनमनावर चांगलाच पगडा बसविला होता. याहि क्षेत्रात चव्हाणांच्या पुढे हिरे होते. अशा रीतीने स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रांत या चौघांचे एक नवें नेतृत्व उदयास येत होतें. हे चोघेहि चाळिशीच्या आंत होते, कर्तबगार होते. मात्र या चौघंत सर्वांत जास्त मोठी संधि चव्हाणांसमोर उभी होती. गृहखात्याचे ते पार्लमेंटरीं सेक्रेटरी होते व महाराष्ट्र काँग्रेसचें नेतृत्व त्यांच्याकडे चालून येत होते.
श्री. चव्हाण यांनी अशा वेळी महाराष्ट्र काँग्रेसचें पुढारीपण नाकारलें. त्या वेळीं श्री. चव्हाण यांच्यावर याबद्दल टीका करणा-या अनेकांत मीहि होतों. यापुढच्या काळांततर त्यांच्यावर टीका करण्याचे अनेक प्रसंग माझ्यावर आले. माझ्याप्रमाणे अनेकांनी खाजगी तशीच जाहीर टीका त्यांच्यावर केलीहि होती. श्री. चव्हाण यांनी कोणत्याहि टीकेस कधीहि उत्तर दिलें नाही. पुढे संयुक्क महाराष्ट्राची चळवळ ऐन भरांत आली असतां महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांनी काढलेले उद्गार मनन करण्यासारखे आहेत. ते म्हणाले होते: "संयुक्त महाराष्ट्राच्या संबंधांत सर्वात बदनाम व सर्वात जास्त गैरसमज झालेला मीच आहे." त्यावेळच्या घडामोडींकडे आता बारा वर्षांनी मागे वळून पाहतां चव्हाणांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल असेच गैरसमज निर्माण झाले असावेत, असं वाटतें.
त्याकाळी लोकप्रियतेच्या लाटेवर आरुढ होण्यासाठी सुवर्णसंधि त्यांनी कां घालविली? त्यांना आत्मविश्वास नव्हता असें कांही म्हणतात. मला आता वाटतें, एकदम उड्या मारुन पाय-या चढणें त्यांच्या स्वभावांतच नाही. एकएक पायरी अगदी विचार करून वर चढावयाचा त्यांचा स्वभाव आहे. याचें प्रत्यंतर त्यानंतरच्या घडामोडींनी आलें. त्या काळी शासनावर व संघटनेवर पकड कशी बसवावी याची ते तयारी करीत असावेत. यानंतरच्या काळांत श्री. हिरे लोकप्रियतेच्या लाटेवर आरुढ झाले व तेथून पुढे दृष्टिआड झाले. पण श्री. चव्हाण यांनी परिस्थिति ओळखून, परिस्थितीशीं जुळतें घेऊन, मोठ्या मुत्सद्देगिरीने एकएक पायरी चढत ते आज संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व एकमेवाद्वितीय नेते बनले आहेत.
१९५२ ते १९५७ हा महाराष्ट्राच्या इतिहासांतील सर्वांत कठीण कालखंड. याच काळांत संयुक्त महाराष्ट्राबाबत चव्हाणांनी तडजोड केली असा फारच मोठा गैरसमज महाराष्ट्रांत पसरला आहे. त्या वेळच्या दोन घटना मला अद्यापहि चांगल्या आठवतात. श्री. चव्हाण यांच्या धावपळीच्या जीवनांतील या दोन लहानशा घटना त्यांच्या कदाचित स्मरणांतहि नसतील. पण या घटनांनी त्यांच्याबद्दलचे माझे गैरसमज दर झाले म्हणून त्यांनी मला चांगली आठवण आहे.