आमदाराचा लेखी राजीनामा सभापतीकडे येतांच तो परिस्थितीनुसार मंजूर करण्याची तरतूद असतेच. पण शंकरराव देव किंवा हिरे यांपैकी कुणालाच कुंटे यांचा सल्ला मान्य झाला नाही. यशवंतराव चव्हाण यांनी यापुढच्या काळांत काँग्रेस वर्किंग कमिटीचा जो आदेश असेल तोच मी पाळीन, प्रदेश काँग्रेसच्या कांही जणांच्या मतांप्रमाणे आपणांस वागतां येणार नाही, असं स्पष्टच बजावलं. हिरे यांच्या हातांत ११६ राजीनामे जरी आले होते, तरी चव्हाणांना पाठिंबा देणा-यांचे राजीनामे त्यांमध्ये नव्हते. मुंबईंतल्या काँग्रेस आमदारांपैकीहि दहा जणांनी राजीनामे दिलेले नव्हते, आणि जरी चव्हाणांना पाठिबां देणारांचे व अन्य राजीनामे आले असते, तरी त्यांची संख्या १५० पर्यंतच पोंचणार होती. याचा अर्थ संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारांचीच संख्या यापेक्षा अधिक ठरणार होती. राजीनामे देणें म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेण्यासारखंच होतं. तरी पण यशवंतराव चव्हाण यांनी आपली निष्ठा वर्किंग कमिटीशीं राहील असं सांगतांच, प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी तेंच भांडवल केलं आणि चव्हाणांची ही भूमिका विश्वासघातकी आहे असं ते एकमेकांना सांगू लागले.
शंकारराव देव यांनी त्या वेळीं पांच दिवसांचं उपोषण आरंभलं होतं. चव्हाणांच्या भूमिकेबद्दल बोलतांना त्यांचा तोल सुटला आणि ते चव्हणांबद्दल तुच्छतेनं बोलूं लागले. देव यांच्या तुच्छतापूर्वक बोलण्याचा मथितार्थ देवगिरीकरांकडून चव्हाणांना समजतांच त्यांना तें अपमानकारक वाटलं आणि यापुढच्या कोणत्याहि चर्चेच्या वेळीं देव यांना बोलवायचं नाही, असा त्यांनी निर्णयच केला. शंकरराव देव यांच्यासारख्या पौढ आणि अनुभवी नेत्यानं त्या वेळीं तोल राखला असता, तर पुढच्या काळांतहि त्यांना चव्हाणांशी अर्थपूर्ण संवाद सुरु ठेवतां येणं शक्य होतं, पण त्यांनी स्वतःला सावरलं नाही आणि त्याचाच परिणाम पुढे फलटणच्या सभेंत यशवंतरावांनी देव यांच्या नेतृत्वाविरुद्ध उघड उघड निशाण फडकवण्यांत झाला.
कुंटे यांच्या सूचनेप्रमाणे हिरे व देव यांनी ११६ आमदारांचे राजीनामे सभापतींकडे पोंचवले असते, तर त्यांतून कदाचित वेगळं चित्र निर्माण झालंहि असतं. एक तर लोकांमध्ये त्याची एक वेगळी प्रतिक्रिया उमटली असती आणि राजीनामे देण्यासाठी जे कच खात होते किंवा महाराष्ट्राला विरोध करायचा म्हणून बाजूला रहात होते, त्यांच्यावरहि लोकांनी प्रचंड दबाव आणून, त्यांनाहि राजीनामे देण्यास भाग पाडलं असतं. मोरारजींचाहि नक्षा त्यामुळे कांहीसा उतरला असता. पक्षाचा बहुमताचा पाठिंबा असल्याचं दर्शवून ते जें बोलत होते आणि कृति करत राहिले होते तीहि थांबली असती. मोरारजीचं बहुमत संपलं असतं, तर वर्किंग कमिटीलामग लोकेच्छेचा आदर करुन राष्ट्रपतींची राजवट महाराष्ट्रांत निर्माण करावी लागली असती किंवा सार्वत्रिक निवडणूकीचा निर्णय तरी करावा लागला असता, परंतु हें सर्व घडायचं तर देव आणि हिरे यांनी त्यांच्याकडे आलेले ११६ राजीनामे योग्य ठिकाणीं फाटवण्याचं धाडस दाखवण्याची जरुरी होती, परंतु त्यांनी हे राजीनामे सभापतींकडेहि पाठवले नाहीत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या ताब्यांतहि दिले नाहीत.
काँग्रेस अध्यक्षांचा अधिकृतलेखी आदेश नसल्यामुळे केवळ भावनेच्या आहारी जाऊन राजीनामे देणं याच्याशीं चव्हाण सहमत नव्हते. कुंटे यांची सूचना दबाव निर्माण करण्यासाठी कितीहि उपयुक्त ठरणारी असली, तरी काँग्रेसमध्ये फूट निर्माण होऊं नये या मताचेच लोक अधिक असल्यामुळे, वर्किंग कमिटीचा आदेश पाळणारा एक गट आणि सदसद्रिवेकबुद्धीप्रमाणे राजीनामे देणा-यांचा दुसरा गट, असं चित्र काँग्रेस पक्षांत मात्र यामुळे निर्माण झालं.
शंकरराव देव यांनी २६ नोव्हेंबरला आपलं पांच दिवसांचं उपोषण समाप्त केल्यानंतर २९ नोव्हेबरला हिरे यांच्सह ते दिल्लीस रवाना झाले. पं.पंत यांच्याशीं नव्यानं चर्चा करण्यासाठी म्हणून ते गेले होते. मागे महाराष्ट्रांत आता आपल्या नेतृत्वावरच बाँब पडणार आहे याची त्यांना कल्पना नसावी. देव हे दिल्लींत असतांनाच, महाराष्ट्र काँग्रेस अंतर्गत मतभेदाचा फलटणच्या सभेंत स्फोट झाला. १ डिसेंबरला फलटणला नाईक निबांळकरांच्या मनमोहन राजवाड्यांत सातारा जिल्हा काँग्रेसच्यातर्फे एक सभा आयोजित करण्यांत आली होती.चव्हाण, नाईक-निंबाळकर आणि तपासे हे तीनहि मंत्री सभेला उपस्थित होते. मोरारजी देसाई यांनी त्रिराज्य योजना सादर केली तेव्हा राजीनामे कां दिले नाहीत, हें कार्यकर्त्यांना समजावून सांगणं हा या सभेचा हेतु होता. या सभेंत यशवंतरावांनी त्या संदर्भांत शंकरराव देव यांच्या नेतृत्वावरच जोराचा हल्ला चढवला. देवगिरीकर आणि भाऊसाहेब हिरे यांना याची कल्पना होतीच. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत माझा मार्ग आता वेगळा राहील याची जाणीव चव्हाण यांनी हिरे यांना अगोदरच द्ली होती.संयुक्त महाराष्ट्रची चळवळ संप, मोर्चे, उपोषण या मार्गानं पुढे नेण्याचा कांही विरोधकांचा डाव असून काँग्रेसला या मार्गानं जातां येणार नाही, हे आपलं मत चव्हाण यांनी शंकरराव देव यांनाहि या सभेपूर् सहा दिवस अगोदर कळवलं होतं.