इतिहासाचे एक पान.. १२

  १
---------

सूर्यास्ताची वेळ. अजून कडूसं पडलं नव्हतं. सागरोबाच्या शिखरावर सूर्याचीं किरणं रेंगाळत होतीं. सागरोबाच्या मंदिरांतली घंटा मधून मधून घणाघत होती. शिरस्त्याप्रमाणे सायंकाळच्या दर्शनासाठी सागरोबाच्या-शंभुमहादेवाच्या मंदिरांत लोक यायचे.

' ॐ नम: शिवाय' चा नाद अशा वेळीं मंदिराच्या गाभा-यांतून द-याखो-यांत पसरुं लागायचा. त्या लहरी मग गावापर्यंत पोंचत. गावाच्या पलीकडे झुळझुळणारा 'सोनहिरा' ओलांडून त्या लहरी पलीकडे जात. रानांत चरायला गेलेलीं जनावरं सोनहिराच्या वाळवंटांत हुंदडत असायचीं. गुराख्याच्या हातांतल्या काठीवरील घुंगरांचा आवाज ऐकला की मग वाळवंट सोडून गावांतल्या गोठ्याकडे जातांना रस्त्यावर त्यांची गर्दी होऊं लागे. अशाच एका संध्याकाळी 'यशवंत' या बालकाचा देवराष्ट्र येथे जन्म झाला - १२ मार्च १९१४ या दिवशीं !

देवराष्ट्र हें पौराणिक काळांतलं ऋषि-मुनींचं गाव. सोनहिराच्या परिसरांत, सागरोबाच्या सान्निध्यांत असलेलं एक पवित्र स्थान. खानापूर तालुक्यांतलं हें गाव. गावच्या वायव्येस दोन मैलांवर महादेवाची मंदिरं. सर्वांत जुनं मंदिर समुद्रेश्वर-महादेवाचं. टेकड्यांमध्ये ऋषि-मुनींच्या गुहा. मंदिरालगतच, पिछाडीस समुद्रेश्वर नांवाचं तीर्थकुंड. यांतलं पाणी गुणाकारी. सोरटी-सोमनाथाचा आणि समुद्रेश्वर-मंदिराचा संबंध पूर्वजांनी जोडलेला आहे. हिंगणदेवराजानं इथल्या गुहा बांधल्या असं इतिहास सांगतो. म्हसूणें किंवा हिंगणखाडींत याच राजानं विहिरी बांधल्या. राजाचं नांव गावाला देण्याची प्रथा जुनी. जवळच्या खेड्याला असंच 'हिंगणगड' नांव मिळालं. या राजाची राजधानी कौंडिण्यपूर. पंतप्रतिनिधीचं 'कुंडल' तें हेंच.

देवराष्ट्र हें आजचं खेडेगाव. पण शके २७२ च्या सुमारास दक्षिणा-पंथांतील - देवराष्ट्र - हा देश होता. शकपूर्व तिस-या शतकापासून शकोत्तर तेराव्या शतकापर्यंतच्या सोळाशे वर्षांतले शिलालेख, ताम्रपट उपलब्ध आहेत. नाणीं सापडली आहेत. त्यांत देवराष्ट्र या देशाचा उल्लेख आहे. शके २७२ च्या (सन ३५० ) अलाहाबाद येथील समुद्रगुप्ताच्या शिलालेखांतहि देवराष्ट्र देशाचा उल्लेख आहे. दक्षिण-पंथातले अनेक राजे समुद्रगुप्तानं जिंकले. या देशांच्या नामावळींत देवराष्ट्र देशाचं नांव नमूद आहे. नागपूर तें म्हैसूरपर्यंतच्या आजच्या प्रदेशांत मधेच हें देवराष्ट्र होतं. कुंडलच्या पूर्वेला दोन-तीन मैलांवर तेंच देवराष्ट्र गाव आज उभं आहे. पूर्वीच्या राजधानीचं हेंच शहर. सातारा ते कोल्हापूर आणि अरबी समुद्र तें पंढरपूर या भागावर त्या वेळीं पसरलेलं हें राज्य. शके २७२ मध्ये तिथे कुबेरराजा राज्य करीत होता. त्याच्या आश्रयानं या राज्यांत जे ब्राह्मण रहात ते देवराष्ट्र-देवराष्ट्रीय-देवरुखे ब्राह्मण. इतिहासाचार्य राजवाडे यांचाच तसा शोध आहे. शके २३० ते ४४० या काळांत महाराष्ट्रांत अनेक लहानमोठी राज्यं आणि राजे उदयाला आले. देवराष्ट्राचं राज्य हें त्यांपैकीच. शके ४७८ मध्ये ते चालुक्याच्या अंकित झालं अन् पुढे थोड्याच काळांत नष्टहि झालं. आता उरलं आहे तें एक लहानसं खेडं. सागरोंबा-समुदेश्वर, समुद्रेश्वर तीर्थकुंड, सोनहिरा हीं ठिकाणं होतीं तिथेच आहेत. राज्यांचं, राजांचं, बहरलेलं झाड वठून गेलं. मूळ कायम राहिलं.