अस्मितेचे प्रतीक

मुंबईचे शिवनेर दैनिकाचे संपादक आपल्या अग्रलेखात लिहितात, भारताच्या राजकारणात यशवंतरावांनी स्वत:चे असे एक स्थान निर्माण केलेले होते. हे स्थान त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्वातून निर्माण झालेले होते. त्यांनी मराठी अस्मितेला नव्या स्वरूपात घडविले. उलट राजकीय वादळांना तोंड देतच त्यांनी मार्गक्रमण केले. वादळाशी घेतलेल्या झुंजीमधून त्यांचे नेतृत्व आणि महाराष्ट्राचा इतिहास घडून राहिला. १९५५ सालापासून पुढची पाच वर्षे हा यशवंतरावांच्या कर्तबगारीचा अत्यंत कसोटीचा काळ होता. त्या काळाच्या कसोटीला यशवंतरावांचे नेतृत्व उतरले आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा भाग्योदय झाला.

यशवंतराव ध्येयदृष्टीचे, संघटनेला सांभाळणारे, मृदु अंत:करणाचे सदगृहस्थ होते.

आचार्य अत्रे आपल्या दै. ‘मराठा’ मध्ये यशवंतरावांचे अभिनंदन करतात.

आम्ही श्री.यशवंतराव चव्हाणांचे आज अभिनंदन करतो. परवाच्या दिवशी पुण्याला शनिवारवाडयापुढे भारतरत्‍न महर्षी कर्वे यांच्या अध्यक्षेखाली भरलेल्या महाराष्ट्र राज्य महोत्सवाच्या विराट सभेत ''कोणा एका व्यक्तीच्या वा पक्षाच्या प्रयत्‍नांनी हा महाराष्ट्र आलेला नाही. अनेक वर्षांचे हे स्वप्न साकार होण्यास जनतेचेच कर्तृत्व कारणी लागलेले आहे. या प्रयत्‍नांत ज्यांनी बलिदान केले, त्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना मी मानाचा मुजरा करतो'' असे भावपूर्ण उदगार काढून यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. याबद्दल यशवंतराव चव्हाण ह्यांचे आम्ही अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. यशवंतरावांच्यावर आम्ही अतिशय कठोर टीका केली आहे., कारण संयुक्त महाराष्ट्राच्या झगडयाला त्यांनी विरोध केला होता. ह्या झगडयाच्या विराट स्वरूपाचे आणि महाराष्ट्रीय जनतेच्या भावनांचे त्यावेळी त्यांना सम्यक आकलन झाले नाही. 'साडेतीन कोटी मराठी जनतेपेक्षा पंडित नेहरू मोठे आहेत' असे त्यांनी उदगार काढून महाराष्ट्राचा अपमान केला असे आम्हाला वाटले. म्हणून त्यावेळी त्यांच्यावर आम्ही कडाडून हल्ला केला. त्यानंतर द्विभाषिक राज्य यशस्वी करून दाखविण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. एवढेच नव्हे, तर द्विभाषिक राज्य हे 'यावश्चंद्र दिवाकरो' मोडणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे बोलून संयुक्त महाराष्ट्रवाद्यांना त्यांनी आव्हान दिले. पण पूर्वीच्या त्यांच्या या सर्व प्रतिज्ञा, आव्हाने आणि वल्गना काळाने फोल ठरविल्या. सोडेतीन कोटी मराठी जनतेच्या इच्छेपुढे सरतेशेवटी त्यांना मान वाकवावी लागली आणि द्विभाषिक राज्य मोडून त्यांचे दोन तुकडे करावे लागले. आम्ही असे विचारतो की, महाराष्ट्राच्या भावनेचा आणि प्राणाचा गेली साडेचार वर्षे काँग्रेसश्रेष्ठींनी जो हा खेळखंडोबा केला तो त्यांना वाचवता आला नसता काय? काही जरुरी होती का ह्या सर्व उठाठेवीची? भारतातल्या तेरा भाषिकांना जेव्हा भाषावार राज्ये देऊन टाकली त्याच वेळी मुंबईसह महाराष्ट्र राज्य जर निर्माण झाले असते तर महाराष्ट्राचे केवढे कल्याण झाले असते आणि काँग्रेसलाही महाराष्ट्राचे केवढे धन्यवाद मिळविता आले असते., पण कोणतीही गोष्ट योग्य वेळी करायची नाही आणि लोकांना शिव्याशाप दिले म्हणजे मग मात्र मुठीत धरून ती शेवटी अळेबळे करायची, ही काँग्रेसला जणू काही सवयच लागून राहिली आहे. आता संयुक्त महाराष्ट्राच्या झगड्यात ज्यांचे बलिदान झाले  त्या हुतात्म्यांना अनादराची भाषा वापरण्याचे काँग्रेसवाल्यांना काही कारण होते का?

स्वत: यशवंतरावांनी सुद्धा ११ ऑगस्ट १९५६ रोजी पुण्याच्या काँग्रेस भवनात भाषण करताना 'ज्यांनी मुंबईच्या रस्त्यात गोंधळ घातला, त्यांनीच द्विभाषिक आणले' अशा तर्‍हेचे हेटाळणीचे उदगार काढले होते. हुतात्म्यांबद्दल मराठी जनतेच्या मनात अतीव आदराची भावना आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याचे जन्मोत्सव जेथे जेथे जनतेने साजरे केले, तेथे तेथे हुतात्म्यांना पहिले अभिवादन करण्यात आले आहे. ह्या हुतात्म्यांच्या पुण्याईने महाराष्ट्र राज्य मिळाले असे मराठी जनतेला वाटते. ही नाजूक भावना मुंबईच्या काँग्रेस सरकारने ओळखायला नको होती का? मग हुतात्म्यांबद्दल आदर व्यक्त करण्याच्या कार्यक्रमाची जेथे कुठे सूचना आली, तेथे सरकारी अधिकार्‍यांनी त्यांच्यावर कटाक्षाने बहिष्कार का टाकावा? बरे, 'झाले गेले विसरा, आता पुढच्या कामाला लागा' असे यशवंतराव वारंवार म्हणतात. लोक विसरावयाला तयार होतील. पण 'यशवंतराव कुठे विसरावयाला तयार आहेत, त्यांनी हुतात्म्यांबद्दलची पूर्वीची आपली वृत्ती सोडून द्यावी व धारातीर्थावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करावे' असे आम्ही दोन-चार जाहीर भाषणात म्हणालो होतो. मराठी जनतेची हुतात्म्यांबद्दल ही भावना ओळखून अखेर पुण्याच्या सभेत यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली हे फार चांगले केले. ज्या अनंत गोलतकराचा मृत्यू चौपाटीवर पोलिसांच्या लाठीमाराने झाला असा कॉरोनरने स्वच्छ निर्णय दिला असता, आपणास तो अमान्य आहे, असे यशवंतरावांनी विधानसभेत पूर्वी उदगार काढले होते, त्या हुतात्मा अनंत गोलतकरासहित आता यशवंतरावांनी श्रध्दांजली अर्पण केली असे आम्ही समजतो, एवढे केल्यानंतर आता नव्या महाराष्ट्र राज्याची सूत्रे हाती घेताना यशवंतरावांनी आपल्या सर्व मंत्र्यांसह 'ल्फोराफाऊंटन' वर जाऊन (धारातीर्थ) हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली, तर मराठी जनतेच्या भावनेचा त्यांनी केवढा मोठा आदर केल्यासारखे होईल! त्यांनी आमच्या या विनंतीचा अवश्य विचार करावा. त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र राज्या' चे स्वप्न मराठी जनतेच्या कर्तृत्वाने साकार झाले हे यशवंतरावांनी पुण्याच्या भाषणात जे सांगितले त्यात त्यांनी पुढे बदल करू नये. नाही तर 'महाराष्ट्र राज्य' आपोआप झाले किंवा 'द्विभाषिक राज्य मोडले हा माझा व्यक्तिगत पराभव झाला' असे बोलण्याची त्यांना अधूनमधून हुक्की येते. त्यामुळे मराठी जनतेची मने निष्कारण शंकाकुल होतात. साडेतीन कोटी मराठी जनतेचे महाराष्ट्र राज्याबद्दलचे प्रत्येक मागणे काँग्रेस सरकारला हळूहळू कबूल करावेच लागेल, याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. मुंबई जशी काँग्रेसश्रेष्ठींना महाराष्ट्राला द्यावी लगली, त्याचप्रमाणे डांग-उंबरगाव-कारवार-बेळगाव ह्या मराठी भाषिकांच्या सीमाप्रदेशाचा समावेशही एक दिवस त्यांना महाराष्ट्रात करावा लागेल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून सीमाप्रदेशाचा लढा अधिक विकोपास जाऊन त्यामध्ये हौतात्म्य करण्याची पाळी मराठी जनतेवर न येईल अशी काँग्रेसश्रेष्ठींनी आणि यशवंतरावांनी सावधगिरी घ्यावी, अशी त्यांना आमची विनंती आहे. नव्या महाराष्ट्र सरकारची सूत्रे हाती घेण्यापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना यशवंतराव चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहावी हा साडेतीन कोटी मराठी जनतेचा फार मोठा विजय आहे, यात काही शंका नाही,