श्रेष्ठ दर्जाच्या अस्सल साहित्यिकाच्या हातात शोभावी, अशीच ती आहे.’ त्यांच्या लिखाणाचा आस्वाद जेव्हा, जेव्हा मी घेतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात येते की, यशवंतरावांच्या रूपाने महाराष्ट्राला आणि भारताला एक पहिल्या दर्जाचा नेता मिळाला खरा., परंतु त्यांच्यावर पडलेल्या नेतेपणाच्या ओझ्यामुळे त्यांच्या ठिकाणी जो श्रेष्ठ साहित्यिक आहे, त्याचे पूर्ण कर्तृत्व प्रगट होत नाही ही खेदाची गोष्ट मानावी लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी साहित्य, संस्कृती यांच्या वृद्धीसाठी, संवर्धनासाठी काम करणारी विद्वानांची उच्चाधिकार यंत्रणा निर्माण करून त्यांच्या ज्ञानाचा, साहित्याचा, विचारांचा उपयोग करून काम करण्याची प्रवाही योजना सिद्ध व्हावी या हेतूने 'महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ' स्थापन केले. त्यांच्याच कारकीर्दीत मराठवाडा विभागाकरता वेगळे विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
त्याचप्रमाणे मराठवाडयातील कला, क्रीडागुणांना उत्तेजन देण्यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात आली. दक्षिण महाराष्ट्रासाठी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, विश्वकोशाचे प्रचंड कार्यही प्रेरणेने व पुढाकाराने सुरू करण्यात आले. १९५८ च्या सुमारास झालेली नाट्य परिषद, याशिवाय नाटकांच्या पुस्तकांना तसेच विविध विषयांवरील उत्कृष्ट पुस्तकांना बक्षिसे, हौसी कलावंतांचा नाट्य महोत्सव, खुल्या नाटयगृहाची निर्मिती, विपन्नावस्थेतील कलावंतांना शासनातर्फे आर्थिक सहाय्य, संगीत, नृत्य, नाटयशाळांना अनुदान, तमाशांना पारितोषिके या गोष्टी महाराष्ट्रामध्ये त्यांनी सर्वप्रथम सुरू करून प्रशासकीय गुणाबरोबर आपल्या रसिक कलाप्रेमी वृत्तीचा परिचय जनतेला करून दिला. लोककलांना शहरी रसिकांनी अंगीकारावे, तमाशा हा ग्रामीण कलाप्रकार ग्रामीण लोकरंजनासाठीच न राहता तो लोकप्रबोधनाचे माध्यम व्हावे यासाठी पुणे येथील हीरा बागेत आयोजित केलेल्या राज्यस्तरावरील पहिल्या तमाशा परिषदेचे उदघाटक म्हणून ते उपस्थित होते. १९७५ साली कर्हाडला 'महाराष्ट्र वाङ्मय मंडळ' स्थापन करून प्रतिवर्षी एका उत्कट वाङ्मयप्रकाराला रूपये ५००१- 'कर्हाड पुरस्कार' प्रदान करण्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.
साहित्य आणि संस्कृती यांचा एक अतूट संबंध असतो. यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत, लोकशाही जीवनाचे मूलभूत मर्म समजलेले, संवेदनशील व मानवतावादी मन लाभलेले संपन्न आणि समर्थ असे होते. करुणेचा वारसा त्यांना आपल्या आईकडून लाभला. कविमनाचाही तेथूनच लाभला. साहित्यिक यादृष्टीने कालच्या समीक्षकांनी त्यांचे मूल्यमापन केले आहे. आजचे करीत आहेत, उद्याचेही करतील. साहित्यिक म्हणून त्यांच्याकडून कितपत कसदार निर्मिती झाली यापेक्षाही मराठी साहित्याच्या समृध्दीसाठी त्यांच्याकडून झालेले कार्य महत्त्वाचे आहे. साहित्य निर्मितीसाठी त्यांनी दिलेली प्रेरणा महत्त्वाची आहे. यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री या नात्याने मराठी साहित्य आणि संस्कृती यासाठी त्यांच्या कारकीर्दीत जे प्रचंड कार्य केले त्याची नोंदही येथे करावी लागेल.