साहित्य, संस्कृती यांच्या वृद्धीसाठी, संवर्धनासाठी काम करणारी विद्वानांची उच्चाधिकार यंत्रणा निर्माण करून त्यांचा ज्ञानाचा, साहित्याचा, विचारांचा उपयोग करून काम करण्याची प्रवाही योजना सिद्ध व्हावी या हेतूने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यशवंतराव चव्हाणांनी स्थापन केले. त्या मंडळाचे २० डिसेंबर १९६० मध्ये नागपूर येथे रीतसर उदघाटनही त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणतात - ''मी जेव्हा साहित्य म्हणतो तेव्हा ललित साहित्य म्हणतो असे नव्हे, किंवा ललित साहित्य हेच तेवढे साहित्य असाही याचा अर्थ नाही. ललित शब्द म्हणजे साहित्य अशी माझी कल्पना नाही. साहित्य म्हणजे सामान्य जनतेचे हित करण्याचे साहित्य अशी साधीसुधी व्याख्या मी करतो. या व्याख्येत शास्त्रांचाही अभ्यास गृहीत धरावा लागतो. आज ही गोष्ट कोणीही नाकारू शकणार नाही, की मराठी भाषेमध्ये अमृताशी समान अक्षर लिहिणार्‍या महान पंडितांना आम्ही शिरोधार्य मानतो. असे आम्ही कितीही तरी संशोधनासाठी इंग्रजी भाषेचा पाठपुरावा करणे आम्हाला आवश्यक होते. तेव्हा इतर भाषांमध्ये जे ज्ञानभांडार असेल, जे विचार असतील ते मराठी भाषेत खेचून आणण्याचा आम्हाला प्रयत्‍न करावा लागणार आहे. सरतेशेवटी ही नवी संस्था एकसारखी वाढत राहो, साहित्यिकांच्या या महान यात्रेत संस्कृतीचा स्वाधीन साहित्याचा जरीपटका खांद्यावर घेऊन ही संस्था यशश्रीच्या सतत आघाडीवर राहो, अशी सदिच्छा व्यक्त करतात.

श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या कारकीर्दीत मराठवाडा विभागाकरिता वेगळे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील कला-क्रीडागुणांना उत्तेजन देण्यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात आली. दक्षिण महाराष्ट्रासाठी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

सैनिकी शिक्षण क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण यांचे चिरंजीवी कार्य म्हणजे सातारा येथे सैनिक स्कूलची निर्मिती करून दि. २३ जून १९६१ रोजी संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांच्या हस्ते सैनिकी स्कूलचे उदघाटन त्यांनी केले. त्यांच्या कारकीर्दीत औरंगाबाद व कर्‍हाड येथे इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ अस्तित्वात आले. मराठी विश्वकोशाचे प्रचंड कार्यही त्यांच्याच प्रेरणेने, पुढाकाराने सुरू करण्यात आले.

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या गोष्टीवर त्यांचा दृढ विश्वास होता. शिक्षण हे शेवटी राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय विकासाचे प्रभावी माध्यम ठरले पाहिजे, यासाठी ते प्रयत्‍नशील होते. साहित्य हे सामर्थ्य आहे. व्यक्तीच्या जीवनाप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनात जी आव्हाने येतात ती झेलण्याचे सामर्थ्य आहे. जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला येते तेव्हा राष्ट्र मोठे होते. हे सामर्थ्य शस्त्राने प्राप्त होत नाही. हे सामर्थ्य विचारातून, संस्कारातून येते. हे विचारसंस्कार देण्याचे काम भाषेमार्फत, साहित्यामार्फत घडते. म्हणून  साहित्याचे मोल जास्त आहे, असे श्री.चव्हाण एके ठिकाणी म्हणतात. यशवंतराव चव्हाण यांचे अभिजात ग्रंथप्रेम, त्यांचा विपुल ग्रंथसंग्रह, चौफेर वाचन, सुजाण रसिकता इत्यादी सर्व तसे अपूर्वाईचे. खंत एवढीच की, या प्रतिभावंत चंद्राचे उदंड चांदणे बरसले ते मुख्यत: समाजकारण, राजकारण या प्रदेशावर. जर हा चंद्र पौर्णिमेच्या पूर्ण प्रकाशात शारदेच्या दरबारात फुलला असता तर हे सह्याद्रिचे वारे युगांतर घडवत, ॠणानुबंध जोडत, कृष्णाकाठ उजळत सागरतीरावरून यमुनाकाठच्या दिशेने झेपावत असतानाच अकस्मात चंद्राला खळे पडले अन् कृष्णाकाठीच एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला! सह्याद्रिच दुभंगला, शब्दही मुके व्हावे असा हा वियोग. प्रबोधनाची गंगोत्री नियतीच्या आघाताने अबोल झाली. जनसामान्याची रसिकता फुलवणारा कृष्णाकाठ मूक झाला. आता उरल्या फक्त पवित्र स्मृती.