यशवंतराव स्वत: आपल्या सार्वजनिक, राजकीय कार्यात मग्न असले तरीही त्यांनी अनेक प्रसंगी अनेकांच्या विनंतीवरून लेख लिहिले. लिखित भाषणे केली, उत्स्फूर्त व्याख्याने दिली आणि कित्येकदा आपल्या मनातल्या विचारांना लेखरूपाने शब्दांच्या माध्यमातून अभिव्यक्ती दिली. यातूनच त्यांच्याकडून जाणीवपूर्वक मांडणी झालेले भाषणांचे संग्रहही प्रकाशित झाले. त्यामध्ये 'युगांतर' व 'भूमिका' या भाषण संग्रहांचे उल्लेख करावे लागतील. तसेच आपल्या अनेक वर्षांचे लेखन आणि त्यामधून आपल्या ॠणानुबंधाची माहिती देणारा एक संग्रह स्वत:च संस्कारित करून 'ॠणानुबंध' या नावाने प्रकाशित केला.

यशवंतरावांच्या राजकीय कर्तृत्वाचा, यशस्वी नेतृत्वगुणाचा, प्रशासकीय कौशल्याचा, अभ्यासपूर्ण विचारांचा आणि अविचल निष्ठांचा जसा भाग होता; तसाच त्यांच्या संयमी, संस्कारित प्रसंगोचित आणि लालित्यपूर्ण आविष्कारनिपुणतेचाही फार मोठा भाग होता. लोकांना आकर्षित करील अशी वक्तृत्वशैली होतीच, पण त्याचबरोबर त्यांच्या भाषणातील आशयात अभिजात, साहित्यिक, रसिक आणि लाघवी दृष्टी विलोभनीय असे.

'ॠणानुबंध' आणि 'कृष्णाकाठ खंड-पहिला' या दोन पुस्तकांतून त्यांच्याविषयी बरेच काही त्यांच्याच शब्दांत वाचावयाला मिळते. ही पुस्तके वाचत असताना आपण कोणातरी साहित्यिकाचे लेखन वाचतो आहोत असाच भास होत राहतो. एखाद्या गंभीर समस्येचे विश्लेषणही ते किती सहज, साध्या परंतु रोचक दृष्टांतांनी करतात ते पाहिले म्हणजे त्यांच्या अंतरातल्या साहित्यिकाची ओळख व्हायला उशीर लागत नाही. 'श्रीखंडाच्या जेवणातही हिरव्या मिरचीची चटणी लागतेच, तरच त्या जेवणाला रुची येते आणि सुखाचे श्रीखंड पोटभर खाता येते! पण त्यावेळी माझ्या पानात काहीच नव्हते. मोकळया ताटावर बसून भूक भागविण्याची आईची कला मला अवगत नव्हती.' नियतीचा हात या लेखात यशवंतराव आपल्या गरिबीचं, अजाणपणाचं आणि मातेच्या चिंतेचं वर्णन करता-करतानाच जीवनभाष्यही करून जातात. या चतुराईला(कुशलतेला) साहित्यिकाचा पिंडच हवा.

१९७५ मध्ये कर्‍हाडला साहित्य संमेलन झाले. तो आणीबाणीचा काळ. त्यामुळे राजकारणी आणि साहित्यिक माणसातली नाती दुरावली होती. मनं दुरावली होती. कराडला हे संमेलन भरत असल्यानं अनिवार्यपणे यशवंतरावांना स्वागताध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलं. सरकारी माणसाला स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची ती वेळ नव्हती. धिक्कारण्याची होती. म्हणून काही मंडळींनी त्यांच्या निवडीला विरोधही केला. त्यावेळी यशवंतरावांनी अत्यंत समर्पक शब्दांत सर्वांना आवाहन करून आपले शहाणपण आणि कार्यकुशल व्यवहारीपण याची आपल्या भाषणातून सर्वांना जाणीव करून दिली. 'एक स्त्रीच आपल्या संमेलनाची अध्यक्ष आहे (दुर्गाबाई भागवत) आणि एक स्त्री भारताच्या पंतप्रधान आहेत (इंदिरा गांधी). इतरही अनेक क्षेत्रात स्त्रियांना मानाचे स्थान मिळालेले आहे.' अशा खुमासदार उल्लेखांनी भाषण रंगवत नेले. 'मी साहित्य समीक्षक नाही, एक रसिक मराठी भाषिक साहित्यप्रेमी आहे. साहित्यप्रेमी हाही आजच्या लोकशाही युगात एक नम्र समीक्षकच असतो आणि त्या दृष्टीनं काही विषयांना मी स्पर्श करणार आहे.' या प्रकारच्या विजनशील, नम्र पण ठाशीव भूमिकेने त्यांनी आपली उपस्थिती दाखविली. याच भाषणात त्यांनी लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त करून साहित्याच्या उद्दिष्टांची चर्चा केली. 'प्रादेशिक लोकभाषा याच ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत' अशी मराठी भाषेची तरफदारी यादृष्टीने दलित समाजातून आलेल्या नव्या मराठी साहित्यिकांनी जे जे साहित्य निर्माण केले आहे ती मराठीतील एक मोलाची भर आहे' अशा शब्दात साहित्यातल्या नव्या प्रवाहाची सुजनता शिफारस काळाचं भान ठेवून साहित्य वाचणारा रसिक ही भूमिका स्पष्ट करणारे अनेक संदर्भ त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

केंद्रामध्ये संरक्षण, गृह व अर्थमंत्री म्हणून त्यांनी समर्थपणे कारभार केला. अखेर विदेशमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पाश्चिमात्य, पौर्वात्य राष्ट्रांच्या यात्रा त्यांनी केल्या. एक तर्हेची संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा त्यांना घडली. सरोवरे, उद्याने, जंगले यांच्यात विहार केला. निरनिराळया राष्ट्रांचे विकासाचे कार्यक्रम अमलात आलेले प्रत्यक्ष पाहिले. याचे मोठया रसिकतेने मार्मिक वर्णन त्यांनी आपल्या विविध लेखांतून व लेखसंग्रहांतून केलेल आहे. ते प्रत्यक्ष प्रशासनाच्या व्यापात नसते तर मराठीतील प्रवासवर्णनाच्या क्षेत्रात त्यांनी अभिजात यात्रा वर्णनांची भर घातली असती. त्यांच्या या यात्रावर्णनावरून त्यांचे मराठी शब्दकलेवरील प्रभुत्व प्रत्ययास येते. प्रत्यक्ष अनुभव आणि त्यांना तात्त्विक चिंतनाची जोड अशा तर्हेने सुबक लेखन करण्यात त्यांचा हातखंडा होता. रशियाला गेले तेव्हा व्होल्गा नदीच्या काठावरच्या शहराने त्यांना असेच उल्हसित केले. एका रेस्टॉरंटमधील भोजनासाठी ते गेले होते. तिथे एका वाद्यवृंदाने गायलेल्या गीताचे सूरच त्यांना प्रथम आवडले. शब्द कळले नाहीत. मग त्यांनी तिथल्या माणसाकडे चौकशी केली आणि त्या गीतात व्होल्गा नदीचे वर्णन आहे असे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा त्या गीताचे इंग्रजी भाषांतर त्यांनी ताबडतोब आपल्या डायरीत उतरून घेतले. पुढे जेव्हा जेव्हा त्यांना 'नदीकाठचे गाव' हा विचार आठवे तेव्हा डायरी काढून ते व्होल्गा गीत वाचीत. शब्दावरच त्यांचे प्रेम होते. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील नाना प्रकारची पुस्तके त्यांच्याकडे होती आणि त्यात नित्यनवीन भर पडत होती. राजकीय, आर्थिक, संरक्षणविषयक, सामाजिक, धार्मिक चरित्रे, आत्मचरित्रे, संदर्भोपयोगी, त्याचबरोबर गाजलेल्या उत्तमोत्तम ललितकृतीही त्यात होत्या. मराठीतील अनेक नवी पुस्तके त्यांना लेखक - प्रकाशकाकडून भेट मिळालेली आहेत. भारतात व परदेशात कोठेही गेले तरी ग्रंथ त्यांनी विकत घेतलेले आहेत. भारतात व परदेशात कोठेही गेले तरी यशवंतराव कटाक्षाने एक गोष्ट करीत. तिथल्या ऐतिहासिक स्थळांना द्यायवयाच्या भेटीच्या यादीत नाटयगृह आणि ग्रंथालय यांचा समावेश असेल याची खबरदारी घेत - नाटयगृहात शक्यतो नाटक बघत आणि ग्रंथालयात ग्रंथ पाहात व ग्रंथ खरेदी करत. ज्या ग्रंथाबद्दल ऐकले वा वाचले असेल त्याची चौकशी करीत. अहोरात्र देशाच्या कठीण प्रश्नांची चिंता वाहताना या माणसाने हे साहित्यप्रेम कसे टिकवले असेल, त्यासाठी किती त्रास घेतला असेल याची कल्पनाही करता येत नाही.