याच ठिकाणी मला यशवंतरावजींच्या उदंड ग्रंथाभ्यासाची आणि साहित्याच्या विविध प्रकारांच्या ग्रंथसंग्रहाच्या छंदाची आठवण होते. नुकतीच वेणूताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टमध्ये संग्रहित केलेली यशवंतरावांची ग्रंथसंपदा पाहण्याची संधी लाभली., पण त्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून काम करण्याचे श्रेयही मिळाले. त्या ग्रंथांच्या ग्रंथालयशास्त्राप्रमाणे नोंदी करताना असे आढळून आले की, त्यांचे वाचन केवळ मराठी किंवा इतर भारतीय भाषांतील ग्रंथापुरतेच सीमित नव्हते., तर इंग्रजीसह इतर प्रमुख भाषांतील किंवा इतर भाषांतील इंग्रजीत अनुवादित झालेले ग्रंथ मला त्या संग्रहात आढळले. केवळ साहित्यावरच नव्हे तर विविध ज्ञानशाखांतील ग्रंथ त्यांच्या संग्रही आहेत. त्यामध्ये काही त्यांनी मुद्दाम खरेदी केलेले व काही भेटीदाखल आलेले ग्रंथ आहेत. त्यांचे ग्रंथप्रेम केवळ महाराष्ट्रातील साहित्यिकांनाच नव्हे, तर इतर प्रांतातील प्रमुख साहित्यकारांना माहीत असल्यामुळे अनेक नामवंत साहित्यिकांनी त्यांना आपले ग्रंथ भेट म्हणून दिलेले आढळते. पण एवढयानेच त्यांनी ग्रंथाभ्यासाची आस्था दिसून येते असे नाही.
कारण आजच्या काळात कोणाही उच्चपदस्थ व्यक्तीच्या संग्रही बर्यापैकी ग्रंथसंग्रह असतो., परंतु यशवंतरावजींचे वैशिष्ट्य हे की, त्यापैकी बहुतेक पुस्तके त्यांनी हाताळली आहेत. त्यावर त्यांनी टिपणे काढलेली आहेत. प्रसिद्ध साहित्यिकापासून अगदी नवोदित साहित्यिकापर्यंत सर्वांना आपले आभिप्राय स्वत:च्या हस्ताक्षरात त्यांनी कळविले आहेत. ही गोष्ट त्यांच्यासारख्या अनेक व्यापात असलेल्या व्यक्तीला, साहित्याविषयीचे नित्यचिंतन आणि आस्था यामुळेच शक्य होते. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, अरुण साधू यासारख्या वेगवेगळया प्रवृत्तीच्या साहित्यिकांवर त्यांनी आपले स्पष्ट अभिप्राय नोंदलेले आढळतात. उदा. 'सिंहासन' 'मुंबई दिनांक' यासारख्या कादंबर्या माझ्या मनाची मुळीच पकड घेऊ शकल्या नाहीत हे जितक्या परखडपणे नोंदवितात, तसेच भालचंद्र नेमाडयांच्या 'कोसला', 'जरिला', 'झूल' यासारख्या कादंबर्या, अनिल अवचटांची 'माणसे' यासारखा लेखसंग्रह, लक्ष्मण माने यांचे 'उपरा' सारखे आत्मकथन वाचून आपण अस्वस्थ झाल्याची नोंद यशवंतराव करतात. 'विदेशदर्शन' या पत्ररूप प्रवासवर्णनात देशोदेशीच्या प्रवासामध्ये आढळलेल्या नवीन ग्रंथांचा, नाटयप्रयोगांचा, संगीत-नृत्य वगैरे विषयांचा वा कार्यक्रमांचा उल्लेख वर्णनाच्या ओघात सहज आलेला दिसतो. यावरून साहित्य संस्कृती व कला याविषयीच्या ग्रंथसंग्रहाचा भाग हा त्यांच्या पुरता प्रदर्शनाचा भाग नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ताजे राखणार्या व जीवनरस देणार्या एका आंतरिक ऊर्मीचाच भाग आहे, असे म्हणावेसे वाटते.
साहित्यात इतका रस, तर प्रत्यक्ष साहित्यिकांच्या भेटीतही तितकीच आत्मीयता. महाराष्ट्रात दौर्यावर आल्यावर सरकारी कार्यक्रमातून वेळात वेळ काढून आपल्या साहित्यिक मित्रांच्या खाजगी भेटी ते आवर्जून घेत. कोल्हापुरात खांडेकर, पुण्यात ना. सी. फडके, ग. दि. माडगूळकर, मुंबईत तर त्यांच्या भेटीसाठी उत्सुक अनेकजण असत. माडगूळकरांच्या भेटीत त्यांच्याकडून 'जोगिया' ऐकत तशीच महानोरांकडून त्यांची 'मळ्यावरची कविता'. बैठकीतील काव्यानंद हा अत्तराच्या कुपीसारखा मी माझ्या स्मरणात जपून ठेवला आहे.' असे यशवंतरावांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे. हेच प्रेम त्यांनी अनेक मराठी नाटककारांवर व कलावंतांवर केले. कलावंतांची तरल संवेदनक्षमता, सर्जनशील नवनवोन्मेषशाली प्रतिभा, शब्दशक्तीच्या समर्थ किमयेच्या क्षमतेचे परिपूर्ण भान, वाङ्मयात प्रवीण आणि उदंड व्यासंग, साहित्याबद्दलची चोखंदळ जाण आणि साहित्य व समाज यांच्यातील एकमेकांच्या नात्याचे यथार्थ भान, चौरस अनुभवसंपन्नता आणि आस्वादक समीक्षाबुध्दी इत्यादी दुर्मिळ गुणांचा समूह यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात होता. साहित्य क्षेत्रात ते प्रंचड मोठी साहित्यिक कामगिरी करू शकले असते., पण राजकारणात उभी हयात गेल्यामुळे हे ते करू शकले नाहीत. प्रा. ना. सी. फडके यांच्या लेखनाबद्दल असे म्हणतात, ‘भावनेने ओथंबलेले, प्रभावी भाषेने नटलेले लेखन जी लेखणी करू शकते ती साधीसुधी लेखणी नाही.