भाग १ विधानसभेतील भाषणे-९९

२८

कोल्हापूर दत्तक विधान* (२८ जून १९६२)
-------------------------------------------------------
या विषयावरील विरोधी पक्षाच्या कपात सूचनेला उत्तर देताना या बाबतीत कोल्हापूरकर छत्रपतींचा मान राखला जाईल असे केंद्र शासनाच्या गृह मंत्र्याना कळविले असल्याचे मा.चव्हाण यांनी सांगितले.
----------------------------------------------------------------------
* Maharashtra Legislative Assembly Debates, Vol. VII, Part II (Inside No. 15), 28th June 1962, pp. 770 to 773.)

माझे सन्माननीय मित्र श्री. कारखानीस ५४ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यटिॉांनी कोल्हापूरच्या दत्तक विधानासंबंधीच्या प्रश्नाचा येथे उल्लेख केला आहे. गेल्या काही दिवसात कोल्हापूरच्या दत्तक विधानाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर होऊन बसला आहे व त्यामुळे माझे मनसुध्दा चिंताक्रांत झाले आहे. या प्रश्नाच्या बाबतीत कोणत्या कसोटया सरकारने आपल्यापुढे ठेवल्या आहेत याची माहिती या सन्माननीय सभागृहाला असणे जरूर आहे. सन्माननीय सभासद श्री.कारखानीस असे म्हणाले की, कोल्हापूरच्या राजघराण्यासंबंधी एक आदराची भावना महाराष्ट्रात आहे. मी त्यांना हे सांगू इच्छितो की, हीच भावना माझ्या मनातसुध्दा आहे. या भावनेशी सुसंगत राहून मी या प्रश्नाचा विचार केला आहे. एखाद्या राजघराण्यात जर कौटुंबिक मतभेद निर्माण झाले तर त्याबाबतीत कोणती बाजू घ्यावी ही कठीण समस्या आहे. त्यामुळे अशा प्रश्नांच्या बाबतीत विचार करून निर्णय घेणे ही अत्यंत कठीण व जबाबदारीची गोष्ट होऊन बसते. लक्षावधी लोकांना राजघराण्यासंबंधी आदर वाटतो त्या राजघराण्याचे प्रश्न हे त्या घराण्याच्या लौकिकाला साजेल अशा पद्धतीनेच सुटले पाहिजेत. त्यामध्ये मतभेद, पक्षभेद, आंदोलन आणि उपवास यांचा अंतर्भाव होता कामा नये अशी आमची इच्छा आहे. ही गोष्ट खरी आहे की या प्रश्नासंबंधी हिंदुस्थानचे नामदार गृह मंत्री यांनी मला फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेला एक डी.ओ.लिहून माझे मत विचारले होते. त्यावेळी मी त्या डी.ओ.लेटरला तातडीने उत्तर देऊ शकलो नाही कारण त्या वेळी आपण सर्वच आपआपल्या कामात गुंतलो होतो. त्यानंतर मी त्यांना एप्रिलच्या २३ तारखेला उत्तर दिले. म्हणजे जवळ जवळ दोन महिन्यांनी मी त्यांना उत्तर पाठविले. त्यात मी जे मत प्रदर्शित केले ते या सन्माननीय सभागृहाला कळावे म्हणून मी माझे उत्तरच संपूर्णपणे वाचून दाखवितोः

"My dear Lal Bahadurji ५५ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) -
Kindly refer to your letter of 28th February regarding the request made by the Maharaja of Kolhapur for adoption of his daughter's son. As far as merits of choice between Kumar Rajwardhan and Kumar Dhulipsinghrao are concerned, it is hardly possible or necessary for me to express any views."

हे मी अगदी पहिल्या प्रथमच स्पष्ट केले. त्यानंतर मी  आणखी एक वाक्य घातले ते असे की

personally I feel that this is a matter in Which His Highaness’s Wishes should be respected.”

दत्तक विधानाचा प्रश्न हा शेवटी दत्तक घेणारा आणि दत्तक देणारा यांच्या इच्छेवरच अवलंबून राहतो. अ‍ॅडॉप्शनच्या कायद्याप्रमाणे हे मटेरियल आहे. अर्थात अशा वेळी संबंधित व्यक्तींनी लोकमताकडे दुर्लक्ष करावे असे मी म्हणणार नाही. सौ. पद्मा राजे यांच्यासंबंधी माझ्या मनात सदिच्छा आहे. आपल्या देशात जी अनेक राजघराणी आहेत त्यांची प्रतिष्ठा आपण राखली पाहिजे. त्यांचे परस्परांशी संबंध सलोख्याचे राहिले पाहिजेत. त्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने योग्य तो सल्ला देणे माझे कर्तव्य आहे असे मी समजत आलो आहे. सौ. पद्मा राजे यांचे जीवन सुखाचे राहावे यासाठी मी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. मी काही वचन दिले होते व ते मी मोडले आहे असा माझ्यावर आरोप करण्यात येतो. याबाबतीत मी वादविवाद करू इच्छित नाही. परंतु जे प्रत्यक्ष घडले आहे ते अगदी मनमोकळेपणाने मी आपल्यापुढे मांडू इच्छितो. विजयमाला देवी या मला १९५९ च्या एप्रिल किंवा मे महिन्यात भेटल्या होत्या.

माझे ऑपरेशन झालेले असल्यामुळे त्या मला भेटावयास आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे व माझे साधारणतः १० ते १५ मिनिटे बोलणे झाले. परंतु त्यावेळी त्यांचे व माझे जे बोलणे झाले त्याचे रेकॉर्ड काही मी ठेवलेले नाही. मी आपल्यापाशी सर्वच मोकळेपणाने बोलावयाचे ठरविले आहे आणि म्हणून त्यावेळी जे काही बोलणे झाले ते सर्वच तपशीलवार सांगणे योग्य नसले तरी त्यातील महत्त्वाचा भाग मी सांगत आहे. त्यावेळी माझ्या पत्‍नी माझ्यापाशी होत्या. त्याप्रसंगी आमचे जे काही बोलणे झाले ते मला आठवत आहे परंतु त्याबद्दल खात्री करून घ्यावी म्हणून त्यावेळी आमचे काय बोलणे झाले याबद्दल माझ्या पत्‍नीलासुध्दा मी विचारले आहे. त्यावेळी पद्मा राजे यांच्यासंबंधी चिंता व्यक्त करण्यात आली. त्यांना भेटू देत नाहीत असाही उल्लेख करण्यात आला.