भाग १ विधानसभेतील भाषणे-१०२

२९

डॉ. बिधन चंद्र रॉय व श्री. पुरुषोत्तमदास टंडन यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव* (२ जुलै १९६२)
-------------------------------------------------------------

मा. यशवंतराव चव्हाण यांनी डॉ.बी.सी.रॉय व श्री. पुरुषोत्तमदास टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव मांडून त्यांत या दोघांनी केलेल्या मौलिक राष्ट्रसेवेबद्दल गौरवोद्‍गार काढले.
------------------------------------------------------------------------
(*Maharashtra Legislative Assembly Debates, Vol.VII, Part II (Inside No.7), 17th July 1962. Pp. 828 to 829.)

अध्यक्ष महाराज, आज सभागृहाचे कामकाज पुढे सुरू करण्यापूर्वी सभागृहासमोर मी एक सूचना मांडत आहे. आज सारा भारत देश अत्यंत दुःखी झालेला आहे. आपल्या देशातील दोन पहिल्या प्रतीची नररत्ने डॉ. बिधनचंद्र रॉय आणि श्री. पुरुषोत्तमदास टंडन यांचे काल झालेले आकस्मिक निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी झालेली आहे.

डॉक्टर बिधनचंद्र रॉय यांचा तर योगायोग असा की, कालच त्यांचा ८१वा वाढदिवस होता आणि त्यांचा हा वाढदिवस सर्व कलकत्ताभर साजरा होत असताना त्यांचा मृत्यू झाला. ही मोठी अनपेक्षित घटना होय. डॉक्टर बिधनचंद्र रॉय यांचे ८१ वर्षांचे जीवन कर्तृत्वाने भरलेले असे आहे. ते वैद्यकीय धंद्यात अत्यंत कुशल आणि तज्ज्ञ असे डॉक्टर होते. त्यांनी बंगालमध्येच नव्हे तर अखिल भारतात ह्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची अशी कामगिरी केलेली आहे. वैद्यकशास्त्रात संशोधनाची आणि त्यांच्या संवर्धनाची अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या कामातही त्यांचा संबंध होता. ह्या सर्व कामापेक्षा अध्यक्ष महाराज, गेल्या ५० वर्षांत हिंदुस्थानात ज्या निरनिराळया राजकीय चळवळी झाल्या, त्यात त्यांनी अत्यंत मोलाची अशी कामगिरी केलेली आहे. ह्या देशात ज्या राजकीय चळवळी झालेल्या आहेत त्यांच्याशी डॉक्टर बिधनचंद्र रॉय यांचा फार निकटचा संबंध राहिलेला आहे. चित्तरंजनदास आणि महात्मा गांधी यांनी ज्या चळवळी केल्या, त्यात डॉक्टर रॉय यांनी फार मोलाची कामगिरी केलेली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गेली १५-१६ वर्षे ते बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. परंतु त्यांच्याकडे आपल्याला केवळ बंगालचे मुख्यमंत्री म्हणून पाहता येणार नाही. आपल्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा फार निकटचा संबंध आलेला आहे. त्यांच्या कामाचे स्वरूप अखिल भारतीय होते. त्यामुळे केवळ बंगालचाच नव्हे तर सार्‍या राष्ट्राचा एक मोठा पुढारी हरपला अशी सर्व जनतेची भावना असून त्यांची जागा आता कशी भरून निघेल असे जनतेला वाटणे स्वाभाविक आहे.

दुसरे श्री. पुरुषोत्तमदास टंडन, ज्यांनी आपले सबंध जीवन डेडिकेटेड लाइफ किंवा ज्याला त्यागमय जीवन म्हणता येईल असे घालविले आहे. त्यांनी आपले सबंध जीवन देशासाठी समर्पित केले होते. गेल्या तीन चार वर्षांपासून ते राजकारणापासून अगदी अलिप्त राहिले होते. त्यांनी अलाहाबाद म्युनिसिपालिटीत अध्यक्ष म्हणून काम केलेले होते आणि लाला लजपतरायांच्या वेळेपासून ते देशासाठी काम करीत आलेले आहेत. सन १९३० सालच्या करविरोधी आंदोलनात त्यांनी महत्त्वाचा भाग घेतलेला होता. नंतर ते भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. श्री.पुरुषोत्तमदास टंडन हे गेली दोन-तीन वर्षे आजारी होते. त्यांनी सन १९२१ साली वकिली सोडली आणि १९२१ पासून शेवटपर्यंत ते हिंदुस्थानच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करीत राहिले. सन १९२१ नंतर ते कित्येक वर्षे उत्तर प्रदेश विधानसभेत सदस्य म्हणून राहिले आणि कित्येक वर्षे उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. त्याचप्रमाणे हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यांनी सतत ८० वर्षे देशाचे जे अमोल असे काम केले त्या त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आला.

ह्या दोन भारत-रत्‍नांबद्दल आमच्या मनात अत्यंत आदराची भावना आहे आणि म्हणून या सभागृहात त्यांना श्रध्दांजली वाहण्यात यावी आणि आपली ही श्रध्दांजली त्यांच्या कुटुंबियांकडे पाठविण्यात यावी. या दोन थोर नेत्यांच्या आकस्मिक निधनामुळे आम्हांला अपार असे दुःख झालेले आहे आणि आमच्या मनात त्यांच्याविषयी वसत असलेल्या आदराच्या भावनेचे प्रतीक म्हणून आता आपण या सभागृहाचे आजचे कामकाज तहकुब करावे अशी माझी विनंती आहे.
---------------------------------------------------------------
On 2nd July 1962, Shri Y.B.Chavan, Chief Minister, made a condolatory reference to the deaths of Dr.B.C.Roy and Shri Purushottamdas Tandon. He eulogised their services to nation and said that India was fortunate enough to give birth to such geniuses and dedicated persons.