भाग १ विधानसभेतील भाषणे-९८

लोकशाहीच्या जीवनात सर्व प्रवृत्तीच्या माणसांना सांभाळून घेऊन काय करावे लागते हा अनुभव आपण प्रत्यक्ष घेत आहात. म्हणून आपण या सभागृहाचे एक सदस्य म्हणून काम करीत असला काय किंवा सभापतींच्या स्थानावर बसून काम करीत असला काय, आपण सर्वांना सांभाळून घेऊनच काम करीत राहाल, कारण ही वृत्ती आपल्या स्वभावातच आहे. मला वाटते की, सार्वजनिक जीवनात कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही पदावर मनुष्य काम करीत असो, तो जर ही मूलभूत गोष्ट विसरला नाही तर त्याला आपल्या कामात कधीही अपयश येणार नाही. अध्यक्ष महाराज, आपण कायद्याचा कधीही व्यवसाय केलेला नसला तरी आपणाला कायद्याचा व्यासंग आहे, परंतु कायद्याच्या प्रश्नावर चर्चा करताना जी सूक्ष्म आणि निस्पृह दृष्टी आपण ठेवलीत ती पाहिल्यानंतर ही दृष्टी कायद्याच्या व्यासंगामुळे निर्माण झालेली नसून ती आपल्या स्वभावातच असली पाहिजे असे वाटू लागते. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सभागृहात अनेक प्रकारचे बिकट प्रसंग निर्माण झाले होते. सुरुवातीसुरुवातीला आम्ही या प्रसंगातून कसे काय पार पडू याची चिंता निदान मी तरी माझ्या मनाशी करीत असे, इतरही करीत असत, परंतु कितीही बिकट प्रसंग आला तरी आपण डगमगून न जाता या सभागृहाचे नियम कुशलतेने आणि शांतपणे करीत होता हे पाहिल्यानंतर आमच्या सार्‍या चिंतांचे ओझे आपल्या शिरावर टाकून आम्ही सर्व निश्चिंत राहत असू. म्हणून या सभागृहाच्या शेवटच्या दिवशी बोलत असताना सेन्स ऑफ फुलफिलमेंट ज्याला म्हणता येईल, कृतार्थतेची भावना जिला म्हणता येईल, अशी भावना अनुभविण्याचे काहीसे क्षण मनात येऊन जात आहेत.

अध्यक्ष महाराज, हे सभागृह विसर्जित होऊन निवडणुकीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आल्यावर आपल्या जागी कोण बसेल, आम्ही ज्या जागी बसलो आहोत त्या जागी कोण बसेल हे काहीच सांगणे आता शक्य नाही. ते सारे भविष्य जनतेच्या हातात आहे. परंतु गेल्या पाच वर्षांत ज्या उज्ज्वल परंपरा आपण निर्माण केल्या आहेत, ज्या मर्यादा आपण घालून दिलेल्या आहेत त्या पुढे येणार्‍याना निश्चितपणे मार्गदर्शक ठरतील. माणसे येतील आणि जातील परंतु हे सभागृह तसेच कायम राहील. एखाद्या नदीच्या वहात्या पाण्याप्रमाणे ही संस्था आहे. ती कधीच बंद होणार नाही. याच भावनेने आपण काम करीत असतो आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळवीत असतो. आपल्याबद्दलचे प्रेम आणि आपण केलेल्या कार्याबद्दलचा गौरव व्यक्त करणे सभागृहाचे कर्तव्य आहे, आणि ते व्यक्त करण्याकरिताच आपल्या परवानगीने मी हा प्रस्ताव सभागृहासमोर प्रस्तुत केला आहे.
--------------------------------------------------------------------
On 8th  December 1961, Shri Y.B.Chavan, Chief Minister, moved a resolution in the House placing on record its high appreciation of the valuable services of the Hon. Shri S.L.Silam as its Speaker for the last five years who he said, had discharged the duties of his high office with zeal, ability and impartiality and firmness. The resolution was unanimously accepted by the House.