यशवंत विचार
जनाबाईच्या मदतीला तू धावून गेलास; आणि तुझी मनापासून भक्ती करणा-या तुझ्या सगळया भक्तांच्या मदतीलाही तू धावून गेलास. तशीच तुझी भक्ती करणा-या आणि महाराष्ट्राच्या झोपडीत राहणा-या गरीब शेतक-याने आज तुझी चंद्रभागा अडविली आहे. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी विठ्ठला, तू त्यांच्या शेतीत जा. तू आता पंढपूरच्या मंदिरात राहू नकोस! विठ्ठलाला मी ही मनोभावे प्रार्थना केली आहे. तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकनाथाची आठवण करून मी ही प्रार्थना केली आहे. पण कृपा करून आपण हे मात्र लक्षात ठेवा की, निव्वळ प्रार्थनेने हे सर्व घडणार नाही. त्याकरिता तुम्हाला कष्टाची गंगा उपसावी लागणार आहे. त्यासाठी जिद्दीने काम करण्याचा आपण निश्चय करूया.