व्याख्यानमाला-१९९५-९६-७२

भारताचे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर घटना समितीची स्थापना झाली. घटना समितीत भारताची भविष्यातील जी राज्यपद्धती असावी ती लोकशाही राज्यपद्धती असावी हे आपण स्वीकारलं. हे इतिहासात पूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा इतिहासातला एक उज्वल कालखंड मी मानतो. ते राजे होते, जनमताचा त्यांनी वाव दिला. पण त्यांच्या मतावर काही घडत होतं असं नाही. पण घटनेत आपण म्हणालो - "We the people of India" आम्ही जे भारताचे नागरिक आहोत ते आम्ही स्वत:ला आपलं भविष्य ठरविण्याची सनद ही स्वत:लाच देतो आहोत हे प्रथमच घडलं. हे एकाएकी घडलं नाही. घटना समिती अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, घटनासमितीचे ड्राफ्टींग कमिटीने चेअरमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच या वादविवादात पंडित नेहरू व इतर अनेक देशभक्त होते. या वाद विवादात त्यांच्या जीवनातील अनेक अनुभवांचा आविष्कार झालेला दिसतो. तरीही हे एका दिवशी ठरलेलं नाही. स्वातंत्र्य संग्रामात भारतीय जनतेच्या मनावरती लोकशाहीचा संस्कार घडला. भविष्यामध्ये भारताचं जीवन उज्वल करायचं असेल तर लोकशाहीच्याच मार्गाने गेलं पाहिजे. म्हणून आपण लोकशाही राज्य पद्धती स्वीकारली आहे. ही काही देशभक्तांनी किंवा मूठभर लोकांनी स्वीकारली नाही तर सर्व जनता त्यात सहभागी झालेली आहे.

न्या. रानडे हे पहिल्या देशभक्तांपैकी पहिले थोर विचारवंत होत. त्यांनी "ब्रिटीश राजवटीशी जो संबंध आला तो दैव संकेत होतो." असे उद्गार काढले आहेत. मी विद्यार्थी असताना हे वाक्य वाचलं तेव्हा मला ते बोचलं, खटकलं आणि मला वाटलं की, आम्ही परतंत्र झालो यात कुठला आहे दैवी संकेत? पण पुढे न्या. रानडेंचे साहित्य वाचलं तेव्हा समजलं की, आपल्या मनाला पारतंत्र्य आल्यामुळे जेवढ्या वेदना झाल्या तितक्याच वेदना न्या. रानडेंच्या मनालाही झाल्या होत्या. परंतु भारत हा मध्ययुगीन काळात वावरत असताना आधुनिक ज्ञान आणि विज्ञान याच्याशी जो संपर्क आला तो ब्रिटीश राजवटीमुळं आला. हे अमान्य करण्याचं कारण नव्हतं आणि याला उद्देशून न्या. रानडे यांनी दैवी संकेत म्हटलं होते. न्यायाच्या बाबतीत, न्यायासनासमोर सर्वजण समान आहेत. जातपात, धर्म, गरीबश्रीमत, उच्च पदस्थ, खालच्या पातळीचा असा विचार न करता, न्यायासनासमोर सर्वजण समान आहेत ही कल्पना ब्रिटीश राजवट आल्यामुळेच आली. आपल्याकडे पूर्वी ती नव्हती. आपल्या जाती व्यवस्थेमध्ये ब्राह्मणाच्या हातून गुन्हा झाला तर त्याला होणारी शिक्षा आणि तोच तर अतिशूद्राच्या हातून झाला तर त्याला होणारी शिक्षा यात फरक असे. ब्रिटीश इथे आल्यामुळे आपला पाश्चात्य जगतातील विचारांशी संबंध आला. पहिल्या देशभक्तांच्या पिढीवर 'मिल आणि स्पेन्सर' या थोर विचारवंतांचा किती परिणाम झालेला होता हे आपण जाणतो. मिलची 'लिबर्टी' आणि 'सबजक्शन ऑफ विमेन' ही पुस्तकं आणि सोशॉलॉजीवरचे स्पेन्सरचे विचार या संबंधी लोकमान्य टिळक (दुस-या पिढीतले देशभक्त) यांनी लिहिलेलं आपण वाचलंत तर या विचारामुळं त्या पिढीवर कसा सुसंस्कार घडलेला होता ते समजून येते. न्या. रानडे, दादासाहेब नौरोजी यांचा इथे उल्लेख करावयास हवा. दादाभाई नौरोजी इंग्ल्ंडमध्ये जाऊन पार्लमेंटमध्ये निवडून आले होते. त्यांनी लोकशाहीवर केवळ तात्विक विचार केलेला नव्हता. लोकशाहीची जी जन्मभूमी आपण मानतो त्या देशात ते निवडून आले होते. हा आपला वारसा आपणाला विसरुन चालणार नाही. महात्मा फुलेंच्या साहित्यातून आपणाला असं दिसून येते की, राजकीय दृष्ट्या समानता प्रस्थापित झाली पाहिजे. पण त्याला सामाजिक समता असेल तरच अर्थ प्राप्त होईल. जोतिराव फुलेंच्यावरती 'पेन'या विचारवंताचा परिणाम झाला होता. सामाजिक समतेशिवाय राजकीय लोकशाहीला खरा आश्य प्राप्त होणारनाही हे त्यांनी बरोबर जाणलं होतं. राज्यशास्त्रीय परिभाषेत त्यांनी हे मांडलेले नाही. पण त्यांचं लेखन आज जरी वाचलं तरी त्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आढळून येईल. अशी पहिल्या पिढीची वाटचाल होती.