" भारतीय लोकशाहीची वाटचाल"
प्रथम मी यशवंतरावजींच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जायला मिळालं. काही ठिकाणी विचार मांडण्याचा आवेश तर काही ठिकाणी बौद्धिक द्व्द्व असतं. त्याचा आनंद वेगळाच असतो. पण ज्याच्याबरोबर आपण स्वातंत्र्य लढ्यात वाटचाल केली. त्या थोरल्या भावासारख्या ज्येष्ठ स्नेह्याला वंदन करण्याची संधी आज मिळते आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला आहे. त्यामुळे यात सहभागी होण्यामध्ये मनाला साफल्य वाटत. माझी भावना इथे गुंतलेली आहे. आम्ही सर्व मित्रांनी स्वातंत्र्य चळवळीत सर्वस्वपणाला लावलं, कोणी थोडं काम केलं असेल पण आमचं सर्वांचं एक कुटुंब होतं. आमच्यावर समान वैचारिक संस्कार झाला होता. यशवंतरावांनी स्वत:च्या ग्रंथामध्ये १९३२ सालच्या अनुभवात ते लिहितात. 'तुरुंग हे एक विद्यापीठ आहे.' आणि तोच अनुभव मला १९४२ साली आला. १९३२ ला आचार्य भागवतांनी व्याख्याने देऊन वैचारिक संस्कारबरोबच साहित्याचा रसास्वाद कसा घ्यावा हे त्यांना सांगितलं. १९४२ ला ज्या वार्डात मी होतो तिथं आचार्य भागवत, आचार्य जावडेकर, क-हाडची सर्व ज्येष्ठ मंडळी गणपतरावजी आळतेकर वगैरे होते. त्यावेळी आचार्य भागवतांची भारतीय तत्वज्ञान व जगातील तत्वज्ञानावरची अशी जवळ जवळ ६० व्याख्याने मला ऐकायला मिळाली. तिथंच आचार्य जावडेकरांनी गांधीजीच्यावर दिलेली व्याख्याने मी कधीच विसरू शकणार नाही. जावडेकर गांधीच्यावर बोलत असताना आमच्या आवारात सानेगुरुजीही होते. साने गुरुजींनी १९३२ साली तुरुंगात असताना विनोबाजींची गीताप्रवचने लिहून घेतली. त्यामुळे हे पुस्तक अमर झाले. त्याचप्रमाणे जावडेकरांची तीन व्याख्याने साने गुरुजींनी लिहून घेतली आणि पुढं ती पुण्याच्या कोकाट्यांनी प्रसिद्ध केली. त्याला आचार्य जावडेकरांनी लिहिलेली प्रस्तावना अपुरी, थोडी आहे. ते म्हणाले, यातील शब्द, विचार माझे पण ऐकून भाषेचाच प्रसाद परंतु त्याला वेगळा स्पर्श झालेला आहे. तो सर्व सानेगुरुजीचा हे म्हणणारे आचार्य जावडेकर मोठे आणि ते लिहून ते प्रसिद्ध करणारे साने गुरुजीही मोठे. आमच्या पिढीला हे भाग्य लाभलं. वीर वामनराव जोशी यांच्या एका नाटकांत म्हटलेलं होतं. "देशभक्ता प्रासाद बंदीशाला" हे थोर देशभक्त आम्ही जवळून पाहिलेल होते, आणि त्यांच्या समवेत राहायला मिळालं, त्यामुळे माझ्या आयुष्याची जडण-घडण झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या पिढीला जसं संघर्षातून जावं लागलं, त्यानंतरही स्वातंत्र्याला ५० वर्षे झाली तरी ती खडतर वाटचाल सुरू आहे. यामध्येही आपला कस लागलेला आहे. काहीजण तिथंच पडलेले असतील. काहीजण मुख्य रस्त्यापासून बाजूला गेले असतील. पण काहीजण निर्धारानं तिथं टिकून राहिले असतील. आणि याचं श्रेय कुणाला? ते नंतर ठरवू.
भारतीय लोकशाहीची वाटचाल या विषयावर प्रथम मी ऐतिहासिक आढावा घेऊन ९१ सालपर्यंत येणार आहे. आणि नंतर गेल्या ५ वर्षातील आज आपणापुढे असणारी आव्हानं आणि भारतीय लोकशाहीचं भवितव्य अशी विषय मांडणी करुन मी बोलणार आहे. नुसतं ऐतिहासिक, तात्विक, प्राध्यापकीय विवेचन करावं अशी माझी भूमिका नाही. मी धकाधकीच्या राजकारणापासून दूर झालेलो असलो, तरी या प्रत्यक्ष राजकारणामध्ये लोकशाहीची जी प्रक्रिया आहे, त्यात सहभागी होतांना तो आनंद लाभतो त्यासाठी मी माझी नोकरी देखील सोडून दिलेली होती. मी तटस्थपणे बाजूला उभा राहिलेलो नाही. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत काम करीत असतांना मनाला येणारी धुंदी मिळणारा आनंद आणि अपयशाच्या वेळी मनाला वाटणारी खंत अशा वेगवेगळ्या अवस्थांतून मी गेलेलो आहे. म्हणून माझं विवेचन हे विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न आहे. त्याप्रमाणे लोकशाहीच्या चळवळीत या वाटचालात आम्हाला ठेचा कशा लागल्या, नवीन शिकलो कसं, सत्यशोधन कसं झालं हे मांडण्याचा हा प्रयत्न आहे.