व्याख्यानमाला-१९९५-९६-६४

यशवंतरावांच्या विचारामध्ये चौथा स्तंभ होता नियोजनाचा. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी ज्या नियोजनाच्या दिशा आखल्या त्याविषयी या प्रसंगी विशेष काही बोलण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही.

आज मी यशवंतरावांच्या शासनातील कार्याविषयी जरुर बोलणार आहे. कारण त्या क्षेत्रात फार जवळून त्यांना बघण्याची व त्यांच्या बरोबर कार्य करण्याची संधी मला मिळाली. १९४६ ते १९५६ या दहा वर्षात त्यांनी निरनिराळ्या मंत्रीपदावर काम केले. शासन म्हणजे काय व शासनाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी कसा करून घेता येईल याची काही तत्वे त्यांनी आपल्या मनात बांधली होती. मला आठवतंय की द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व जिल्ह्याधिका-यांची एक बैठक बोलावली आणि त्यात त्यांनी पहिल्यांदा “लोकांचे समाधान हे लोकशाही कारभाराचे उद्दिष्ट असले पाहिजे.” हे तत्व स्पष्टपणे सर्व अधिका-यांसमोर मांडले. त्यांनी पुढे हे स्पष्ट केले की सरकारी यंत्रणेमध्ये राहून जे काम करतात ते जसे सार्वजनिक सेवक (पब्लीक सर्व्हन्ट) असतात, तसेच लोकांचे बरोबर सार्वजनिक क्षेत्रात, सरकारी यंत्रणेच्या बाहेर जे काम करतात तेही लोकांचे बरोबर सार्वजनिक क्षेत्रात, सरकारी यंत्रणेच्या बाहेर जे काम करतात तेही सार्वजनिक सेवक असतात, आणि तेव्हा दोन्ही सार्वजनिक सेवकांची उद्दिष्टे एक असली पाहिजेत.

त्यांनी आमच्या समोर आणखी एक विचार आपल्या भाषाशैलीत मांडला. ते म्हणाले, “कोणत्याही बाबतीत नाही म्हणावयाचे माझ्या जीवावर येते, हो म्हणता आले तर बरे, असी माझी कळकळीची इच्छा असते. कारण नाहीचे हो करून देण्यासाठी हे राज्य निर्माण झाले आहे.”

त्यांच्या शब्दांचा तरुण अधिका-यांवर फार मोठा परिणाम झाला. एक नवीन दृष्टी मिळाली. आपण शासनात काम करत असताना, आपण काही केवळ सरकारी नोकर किंवा शासकीय चाकर म्हणून काम करावयाचे नाही, तर ज्या लोकांचे हे राज्य आहे त्या जनतेसाठी आपण झटले पाहिजे, ह्या विचाराचा आमच्या मनावर ठोस परिणाम झाला.

स्वत: माझ्याबद्दल बोलावयाचे झाले तर १९५७ साली ऑक्टोबर महिन्यामध्ये माझी केवळ चार-साडेचार वर्षाची नोकरी झाली होती. तेव्हा मला कोल्हापूरला कलेक्टर म्हणून पाठविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालूच होती. कोल्हापूर त्या चळवळीचे एक प्रमुख स्थान होते व कोल्हापूरात एक अननुभवी अधिका-याला पाठवू नये म्हणून मुख्य सचिव व वरिष्ठ अधिका-यांनी गळ घातली. पण यशवंतरावांना कोल्हापूरची माणसे व कोल्हापूरची माती याची जाणीव होती व त्यांनी ठामपणे सांगितले, 'कोल्हापूरला तरुण जिल्हाधिकारी आवश्यक आहे.' मला हे सर्व नंतर कळले. परंतु यशवंतरावांनी घेतलेला निर्णय अचूक होता हे मात्र मी म्हणू शकेन. कारण पुढील साडेतीन वर्षे मी कोल्हापूरात काढली. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले आणि आज जी कोल्हापूरची प्रगती झालेली दिसत आहे, त्या पायाभरणीत आपणही सहभागी झालो या विचाराने विशेष आनंद मिळतो. मी हे एवढ्यासाठीच सांगत आहे की यशवंतरावांनी ज्या काही कसोट्या म्हणून आम्हा तरुण अधिका-यांसमोर मांडल्या, त्या कसोट्या अशा होत्या : लोकांचे समाधान, लोकांचा विश्वास, कार्यक्षम कारभार व निरपेक्ष कारभार. यामुळे या तत्त्वांचा तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न मी केला व आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पक्षाचे राजकारण सोडून सर्व लोक कामास लागले व त्या तीन-साडेतीन वर्षामध्ये संबंध जिल्ह्याचा जणू काही कायापालाट झाला. याचे सर्व श्रेय यशवंतरावांच्या चतुराईला दिले पाहिजे. कारण आपल्या हातात असलेल्या शासनाचा केव्हा व कसा उपयोग करावा यामध्ये राजकीय नेत्याचे यश आणि अपयश अवलंबून असते. या विषयी यशवंतरावजी सांगत की, 'जी साधने दिली आहेत, त्या साधनांनी संपादन करुन काही साधणे शक्य नाही. या साधनांचा कशाप्रकारे उपयोग केल्यास ही साधने जास्तीत जास्त उपयुक्त व परिणामकारक ठरतील हे ज्यांच्या हातात साधने आहेत त्यांनीच ठरवावयाचे असते.' अशा साधनांचा उपयोग करण्यात यशवंतरावजी कुशल होते. या विषयी आपणास दोन आठवणी उदाहरणे म्हणून सांगाव्या असे वाटते म्हणून सांगतो.