व्याख्यानमाला-१९९५-९६-५९

एक उदाहरण म्हणून, त्या खेडेगावातून त्यांच्या मनांत रुजलेला एक विचार सांगतो. १९५२ साली ‘हिंदी लोकशाहीचे भवितव्य’ या विषयी पुण्याच्या वसंत व्याख्यान मालेत यशवंतराव चव्हाण म्हणाले की, “गरीब मनात नव्या आकांक्षा उत्पन्न करून त्यांना कार्यप्रवण करण्यास प्रवृत्त करण्याऐवजी त्यांच्यात असंतोषाच पसरविण्याचा प्रयत्न झाला तर रात्री त्यांचे लक्ष त्या श्रीमंतांच्या तिजोरीकडे जाईल इतकेच. खरा प्रश्न कायमच राहील. पैसा हा पुंजीपतीच्य किंवा सरकारच्या तिजोरीत नसून तो आकाशातील ढगात आहे. त्या ढगातून खाली पडणा-या जलधारांत आहे. त्या पाण्याच्या प्रवाहारूपी नदीत आहे. नदीच्या दोन्ही काठास असणा-या काळ्या जमिनीत आहे. त्याच जमिनीतील खनिज संपत्तीत आहे, त्याच खनिज संपत्तीद्वारा निर्माण होणा-या वैज्ञानिक यंत्रसामुग्रीत आहे, इतकेच नव्हे तर त्या सर्वांना एका सूत्रात बांधणा-या मानवाच्या मनगटात आहे. असे जर ह्या गरीब जनतेला पटवून देऊन सृजन-शक्ती निर्माण करून कार्यप्रवण केले तर आपले सर्व प्रश्न सुटतील व त्या सुटण्यातच भारतीय लोकशहीचे भवितव्य सामावलेले आहे.”

सहा-सात वाक्ये, पण त्यांत कितीतरी विचार सामावलेले आहेत. त्यांना हे विचार कुठून सुचले? साहजिकच ज्या गावांत त्यांचा जन्म झाला व ज्या कराडात त्यांचे शिक्षण झाले तिथे. माणूस मोठा झाला की, तो मोठा कां व कसा झाला यांचे गुपित लोक शोधत असतात. काही व्यक्ती जन्मतःच मोठ्या असतात. इंग्रजीत म्हटले आहे की, ‘Some men are born great, some men are made great.’ यशवंतराव त्या मोठ्या व्यक्तींपैकी आहेत की, जे आपणहून मोठे झाले. आपल्या प्रयत्नांनी व आपल्या परिश्रमाने, प्रत्येक अनुभवांचे विश्लेषण करून त्यांनी आपल्या विचाराची बैठक पक्की बसवली. माझ्या मते त्यांच्या मोठेपणाचा जर उगम शोधावयाचा असेल तर तो उगम या दहा-बारा ओळीत आहे.

हे मी ह्यासाठी उद्धृत करीत आहे की आज माणसे, व विशेषतः राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, अगोदर मंत्री होण्यासाठी धडपड करतात व नंतर विचार करण्यास लागतात की आपण काय करावयाचे आहे. यशवंतराव चव्हाण व त्यावेळचे पुढारी असे होते की जनसेवा करत करता आपल्याला जर सत्ता मिळाली तर त्या सत्तेचा उपयोग आपण कसा व कोणत्या दृष्टीने करू याचा विचार त्यांच्या मनात परिपक्वहोता व ह्याच जडणघडणींमुळे यशवंतरावजीसारखे नेते फक्त आजचे नेते म्हणून रहात नाही, तर उद्याचे नेते म्हणून ते व त्यांच्या स्मृति अखंडपणे जागृत राहतात. अशा नेत्यांना, राजकीय नेत्यांना, इंग्रजीमध्ये स्टेटसमन, व्यवहारकुशल, राजनीतिज्ञ, मुत्सद्दी म्हणून म्हणतात. असे नेते फक्त आजचा विचार करत नाहीत. तर उद्याचाही विचार करतात.

यशवंतराव मोठे झाले ते स्वतःच्या मौलिक विचारांच्या आधारावर. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मानवाच्या मनगटात जगात परिवर्तन करण्याची शक्ति आहे. परंतु ते कसे करायवयाचे? कोणत्या त-हेने करावयाचे ह्यासाठी विचार व विचारांनी ठरवलेली दिशा महत्वाची आहे. त्यांच्या विचारांचे व त्यांनी दिलेल्या दृष्टीचे प्रतीक आज आपण महाराष्ट्राच्या स्वरूपात पहात आहोत. १९४६ चा महाराष्ट्र, १९५६ चा महाराष्ट्र, १९६६ चा महाराष्ट्र, १९७६ चा महाराष्ट्र – आपण जर ४० वर्षाचा काळ घेतला तर एक आमूलाग्र फरक झालेला दिसतो व तो दिसतो सामाजिक क्षेत्रात. मी काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा आर्थिक विकासाच्या संबंधी बोलत नाही. ज्यांनी १९४६ चा महाराष्ट्र बघितला आहे त्यांना त्या महाराष्ट्राची आज कल्पना येणार नाही. यशवंतरावांनी तो महाराष्ट्र काही क्रांती न करता, आपल्या विचारांनी आणि आपल्या आचरणानी कसा बदलला, तसेच बहुजन न करता, आपल्या विचरांनी आणि आपल्या आचरणानी कसा बदलला, तसेच बहुजन समाजाला सत्ता स्थानी आणण्यासाठी त्यांनी किती खुबीने महाराष्ट्राचे परिवर्तन घडवून आणले याचा इतिहास लिहावा लागेल. कारण तो सामाजिक परिवर्तनाचा इतिहास आहे. पी. डी. साहेबांना आठवत असेल की त्यावेळी बरेच नेते होते. बरेच जहाल नेते होते. आता मी नावे घेत नाही. पण त्यांचे विचार होते की आपण क्रांती केली पाहिजे. क्रांती करून समाजामध्ये परिवर्तन केले पाहिजे. पण, यशवंतरावांनी क्रांतीची भाषा केली नाही. त्यांच्या मनाची बैठक इतकी पक्की झाली होती की, त्यांनी ठरविले की सत्ता घ्यायची, सत्तेमधून परिवर्तन घडवून आणायचे व सत्तेचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी करावयाचा. त्यांनी असे परिवर्तन, अशा त-हेने घडवून आणले की लोकांना कळले सुद्धा नाही.