व्याख्यानमाला-१९९५-९६-६०

यी माणसाच्या थोरपणाचे एक उदाहरण सांगतो. ज्यावेळी दिल्लीला नेहरूंनी त्यांना बोलाविले त्या वेळची गोष्ट आहे. १० नोव्हेंबरला मी त्यांच्याबरोबर दिल्लीला प्लेनने गेलो. दोघेही शेजारी बसलो होतो. नेहरूंनी फोन करू त्यांना संरक्षण मंत्री म्हणून बोलाविले होते. तेव्हा साहजिकच त्यांच्या नंतर कोण? हा प्रश्न उपस्थित झाला होता. मी त्यांना विचराले तेव्हा ते म्हणाले, ‘राजकीय प्रक्रीया सुरू झाली आहे. पण अजून कोणीही स. गो. बर्वे, मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे.’ मी एवढेच म्हणालो की, ‘सर, गो. बर्वे, मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे.’ मी एवढेच म्हणालो की, ‘सर, आपण म्हणता ते बरोबर आहे, पण खरोखर आपल्याला वाटते का. बर्वे तुमच्या नंतर मुख्यमंत्री होऊ शकतात?’ यशवंतराव म्हणाले, ‘होय, मी आणखी दोन वर्षे असतो तर, माझी खात्री आहे मी बर्वेना मुख्यमंत्री केले असते.’ मला ते पटले नाही म्हणून मी त्यांना विचारले, ‘ब्राह्मण वर्गाचे प्रतिनिधी म्हणून लोक बर्वेकडे पहाणार नाहीत कां? त्यासाठी महाराष्ट्र आज तयार आहे कां?’ ते म्हणाले, ‘तू म्हणतोस ते बरोबर आहे. परंतु शेवटी मी जे प्रयत्न महाराष्ट्रात केले आहेत ते कशासाठी? सामाजिक विषमता आणि निरनिराळ्या समाजमधील असलेले परस्पर अविश्वासाचे संबंध विसरून जाऊन, आपण मराठी माणूस एक आहोत व महाराष्ट्र हा आपला धर्म राहिला पाहिजे, त्या दृष्टीने माझी खरोखर इच्छा आहे की, पूर्वीचे सगळे विसरून जाऊन, मराठा-ब्राह्मण वाद विसरून जाऊन, जो मनुष्य चांगल्या त-हेने राज्य करू शकेल त्याची निवड मुख्यमंत्री म्हणून केली पाहिजे.’ मी थोडक्यात हे संभाषण यशवंतरावांनी दृष्टी आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे उदाहरण म्हणून आज सांगत आहे.

आता दुस-या एक पैलूचे उदाहरण देणार आहे. यशवंतराव द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे १५ ऑगस्ट १९५७ ला, स्वातंत्र्य दिनाचे पहिले भाषण झाले. त्यात ते म्हणाले, “आपल्याला मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग करून आपणाला दारिद्र्य, रोग आणि अज्ञान या पासून मुक्त व्हावयाचे आहे आणि इतर मूलभूत स्वातंत्र्ये प्राप्त करावयाची आहेत. या सर्वांच्या प्राप्तीनंतर आजच्या आपल्या राजकीय स्वातंत्र्याला खराखुरा अर्थ येईल. स्वातंत्र्याचे खरे फळ म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा गटाचा अल्पस्वल्प लाभ न्हे, तर संबंध समाजाचे जास्तीत जास्त कल्याण होय.”

यावरून स्पष्ट होते की राज्याच्या मुख्यमंत्री होण्याअगोदर आपल्या सत्तेचा उपयोग कसा करावयाचा हे यशवंतरावांनी ठरविले होते. याचा प्रत्यय मला त्यांनी पुढे भूषित केलेल्या पदात दिसून आला. त्यामुळेच यशवंतराव कालचे किंवा आजचे नेते म्हणून राहिले नाहीत, तर ते उद्याचे नेते म्हणून गणले गेले. शेवटी माणूस जातो, पण त्याचे विचार राहतात. त्याचप्रमाणे यशवंतरावांचे विचार व त्यांची स्मृति महाराष्ट्रात अखंड राहील.

यशवंतरावांच्या विषयी शंतनुराव किर्लोस्करांनी कित्येक वर्षापूर्वी जे लिहिलं ते किती मार्मिक आणि योग्य आहे, म्हणून मी वाचून दाखवतो. त्यांनी लिहिलेः ‘त्यांच्या (यशवंतरावांच्या) यशाचं मर्म त्यांच्या मनाच्या घडणीत आणि व्यक्तिगत विचारसरणीत आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत अतिरेकी भूमिका घेऊन अनेक गट निर्माण होतात, तसे ते होणं आवश्यक आहे असंही मानलं जातं. मला वाटतं यशवंतराव चव्हाम अतिरेकी भूमिका शक्य तो टाळतात. आताच्या क्षणाला बरोबर किंवा चूक काय वाटते ह्या बरोबरच नजिकच्या आणि दूरच्या भविष्यकाळी आजच्या घटनांचे काय प्रतिसाद उमटतील ह्याचा विचार करून ते आपली भूमिका ठरवितात आणि अतिरेक टाळतात असा माझा समज आहे.’ माझ्या मते हे वर्णन योग्य व मार्मिक आहे.

यशवंतरावांची राजकीय नीति काही पक्क्या स्तंभावर आधारित होती आणि त्यातील तीन प्रमुख स्तंभ म्हणजे लोकशाही, समाजवाद व नियोजन.