व्याख्यानमाला-१९९५-९६-४१

आम्ही त्या जिल्हा नियोजन आराखड्यांत इ. स. २००१ साली जिल्ह्याची लोकसंख्या किती होईल याचे अंदाज बांधले. प्रत्येक गांव, पंचक्रोशी, विभाग, तालुका व जिल्हा अशी खालून वर प्रादेशिक स्तररचना केली. प्रत्येक पातळीवरील उपलब्ध जमीन, पाणी, प्राणी, वनस्पती, हवा, सूर्यप्रकाश अशा उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा अब्यास केला. जिल्ह्यांत, महाराष्ट्रात व देशांत विकासाची जी साधनसामुग्री, भांडवल इ. उपलब्ध होऊ शकते त्याचे अंदाज बांधले, विज्ञान, तंत्रज्ञान वापरण्याची प्रचलित पातळीही विचारांत घेतली. आणि दोन हजार सालापर्यंत किती लोकसंख्येला नीटपणे, “बसवता” येईल याचे आराखडे, गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत आखले. माणसे “बसवायची” म्हणजे त्यांच्या निर्वाहाची, कामाधामाची नीट व्यवस्था करायची. आणि त्यांचे जीवनमान वाढत जाईल अशी दिशा काढून द्यायची.

आमच्या अभ्यास कालांत आम्हाला तीनचार गोष्टी दिसून आल्या. सांगली जिल्ह्यातून आपल्या गावांत, भागात जगता येत नाही. म्हणून दरवर्षी सात ते साडे सात हजार कुटुंबे उठतात, देशोधडीला लागतात. सर्व उद्योग, व्यापर व नोकरी क्षेत्रांत कामकरी लोकसंख्येच्या फक्त २५% लोक काम करतात. उरलेले ७५% कामकरी लोक शेतीवर जगतात असे दाखवले जाते, पण सेतीत काम किती याचा कसलाही अभ्यास झालेला नाही. काही ढोबळ आडाखे आखून शेतीतील कामाचा आम्ही अंदाज घ्यायचा प्रयत्न केला तर आढळले की, जी ७५% कामकरी संख्या शेतीवर दाखवली आहे, त्यापैकी निम्म्या लोकसंख्येला शेतीत काम नाही. ज्या ३७.५% लोकांना काम आहे. त्यापैकी १७% लोकांना फक्त हंगामी काम आहे. या शिवाय देशाच्या नियोजनांत कामकरी लोकसंख्या किती हे ठरवताना, घरकाम करणा-या सुमारे १७% कामकरी महिला हिशोभातच धरलेल्या नाहीत. शहरातील नोकरी व्यवसाय करणा-या फक्त ८% महिला कामकरी संख्येत धरलेल्या आहेत. म्हणजे त्या १७% महिलांचा बोजाही शेतीवरच आहे. ज्या उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्रांत उपलब्ध भांडवलाच्या ७०% भांडवल गुंतवले जाते ते फक्त २५% लोकांची जबाबदारी घेते आणि ज्या शेतीक्षेत्रांत फक्त ३०% च्या आसपास भांडवल गुंतवले जाते त्या शेतीवर ७५% लोकांचा बोजा ठेवलेला आहे.

ग्रामीण गरीबांच्या प्रश्नांची चेष्टा विकासाचे नियोजन आणखी ऐका पद्धते करते. प्रत्येक जिल्ह्यात अनेक बँका आणि त्यांच्या आता शेकडो शाखा आहेत. त्यात जिल्ह्यातील लोक ठेवी ठेवतात. असे दिसते आहे की, ग्रामीण भागांतील लोक जेवढ्या ठेवी बँकांत ठेवतात, तेवढेही भांडवल गरीब ग्रामीण भागांत वा त्त्या जिल्ह्यात गुंतवले जात नाही. म्हणजे गरीबांचा पैसा पुन्हा शहरात उद्योगधंद्यात नेला जातो. आणि घोषणा भाषणे गरीबी हटावाच्या चालतात.

आमचे राष्ट्रीय गीत “वंदेमातरम्” हे आहे. सुजालाम्, सुफलाम्, सस्य शामलाम् अशी माझी मातृभूमी, तिला मी वंदन करतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाण्याचा प्रश्न आम्ही कसा सोडवला? महाराष्ट्रातील ८८% जमीन अजून कोरडवाहू आहे. त्या भूमीने “सुजलाम्, सुफलाम्” हे गीत अजून किती वर्षे ऐकायचे? पन्नास वर्षात आम्ही फक्त १२% शेती बागईत केली. नद्यातून वहाणारे आमच्या वाटणीचे पाणी, वाटणी होऊन २५ वर्षे होत आली तरी, आम्ही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीत पाण्याचा प्रश्न अति महत्वाचा आहे. परंतु प्रश्नाची हाताळणी अतिगलथानपणे चालली आहे. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, उद्योगधंद्याचे पाणी, जनावरांचे, पशुपक्षांचे पाणी, पाटाचे पाणी, लिफ्टचे पाणी, कॅनॉलचे पाणी, पावासाचे पाणी, भूगर्भातील पाणी अशी सारी त्या प्रश्नाची चिरफाड करून टाकली आहे. पाण्याचा गैरवापर, पाण्याचे प्रदूषण या गोष्टींचे काही नियोजन नाही. साकल्याने त्याचा विचार नाही. पाणी अडवा, पाणी जिरवा अशी घोषणा मुख्यमंत्री वसंतदादांनी केली, पण त्या दृष्टीने गावोगांव काम काय झाले? महाराष्ट्राचे वाळवंट होण्याचा धोका तज्ञ बोलू लागले आहेत.

पाण्याचा पुरवठा आकाशांतून होतो, पावसाच्या पाण्यावरच नद्यानाले, विहिरी, कॅनॉल यातील पाणी अवलंबून आहे. भूगर्भातील पाणीही पावसावरच अवलंबून आहे. तो पाऊस महाराष्ट्रात पुरेसे पाणी पुरवतो. दुष्काळी तालुके म्हणून ज्या ८७ तालुक्यांची नोंद आहे तिथेही दहा पंधरा इंचापर्यंत पाऊस पडतोच. प्रचंड पावसाची कोकण, सह्याद्री आणि विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे, आणि पुरेशा पावसाचा इतर सर्व महाराष्ट्र, यात सरासरी १५ ते १५० इंचापर्यंत पाऊस पडतो. महाराष्ट्रावर निसर्ग नाराज नाही. आधुनिक ज्ञान-विज्ञान ग्रहण करण्याइतकी बुद्धीमत्ताही महाराष्ट्राजवळ आहे. कमी आहे एका गोष्टीची. परलोकातून उतरून, भोगवादाच्या नरकांत धावत जावून न पडता, इहवादांत आत्मविश्वासाने उबे राहण्याची. सुखी, सफल जीवनाच्या आवश्यक गरजा कोणत्या? तेवढ्याच निवडून त्या सहजसुलभ नैसर्गिक पद्धतीने भागविण्याची, स्वतःच्या अशा गरजा इतकीच, इतर सर्वांच्या आवश्यक गरजांची काळजी करणा-या एकात्म भावाची. मातृभूमीचा विकास होण्यासाठी, मातृभूमी सुजल सुफल सस्यश्यामल होण्यासाठी, मनोभूमीतून परलोकवाद आणि उपभोगवाद यांची हरळी मुळासकट खणून काढण्याची. देशाचे राष्ट्रगीत “जन गण मन अधिनायक जय हे” हे आहे. मानामनातील हा अधिनायक जागा झाल्याशिवाय, चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत त्या जनगण मनांत निर्माण झाल्याशिवाय त्या अधिनायकाचा जय विजय होणार नाही. सत्यशोधक सत्याग्रही मराठाच नव महाराष्ट्र निर्मितीचे आव्हान पेलू शकेल.