व्याख्यानमाला-१९९५-९६-३८

तुम्ही कोणतेही खाजगी औद्योगिक घराणे काढा. त्याची स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काय अवस्था होती आमि आज काय आहे? दोन तीन कोटीची उलाढाल करणारी घराणी आता शेकडो नव्हे हजारो कोटीची उलाढाल करताना दिसताहेत. तोंडाने समाजवाद बोलायचा, गरिबी हटाव म्हणायचे, प्रत्यक्षात श्रीमंत अधिक श्रीमंत कसे होतील तेच पहायचे, तोंडात म. गांधी, कार्ल मार्क्स, व्यवहारांत मेकॉले आणि मनू यांचे पट्टशिष्यच, सर्वच शिक्षितांनी मनांतून निर्णय घेतला होता, इंग्लंड सारखं व्हायचं, युरोपासारखा समाज निर्माण करायचा, अमेरिकेप्रमाणे सुधारायचं. जो रस्ता, जी धोरणे, जो कार्यक्रम आम्हाला युरोपीय जीवनाकडे नेईल तेच अंमलात आणायचे. सारा समाज, सर्व लोक त्या पातळीवर नाही नेता आले तरी, सत्ता संपत्तीच्या ठाण्याजवळच्या लोकांनी तरी, विलायती जगणे, विलायती वस्त्या, विलायती कुटुंबव्यवस्थाही मांडायचा प्रयत्न करायचाच. पाश्चात्यांचा तो चकचकीत, समर्थ, संभावीत, शिस्तबद्ध चेहरा आम्हाला भुरळ पाडीत होता. आणि त्या चेह-याला आम्ही भुलून गेलो होतो. प्रेयसीसाठी आपल्या आईचं काळीज आणून देणा-या प्रियकरासारखी आमच्या तथाकथित शिक्षितांची मनःस्थिती झाली आहे.

विलायती विकासाचं मॉडेलस, शहरी संघटित औद्योगिक समाजरचनेचं युरोप अमेरिकेतील मॉडेल उभे करायला काय काय लागतं? ते भांडवल कसं, कोठून आणि किती काळांत उभे करता येतं? विज्ञान तंत्रज्ञानावर केवढा अधिकार प्राप्त व्हावा लागतो? औद्योगिकरणासाठी लागणारा कच्चा माल, श्रम आणि मुख्यतः उत्पादित वस्तू खपवण्यासाठी हक्काची बाजारपेठ कशी कुठे मिळविता येते? आणि हे सर्व युरोपनं ज्या रीतीने केलं ती रीती, तेवढा काळ आपल्याला झेपेल, मिळे का? युरोपनं गेली तीन चारशे वर्षे जग जिंकून भांडवल गोळा केले, जिंकून घेतलेल्या देशाची हक्काची बाजारपेठ केली. वसाहतवादी आर्थिक पिळवणूक केली. मातीमोलानं कच्चा माल, श्रम वापरले आणि गिरण्यातून प्रचंड उत्पादन करून, तो माल मन मानेल त्या किंमतीत त्या हक्काच्या बाजारपेठेत खपवला. ते लोक इहवादी, उद्योगी, धाडसी, अभ्यासू आहेत. त्यांनी अनेक शोध लावले. वाफ, वीज, अणू अशी शक्ती शोधून हातात घेतली. यंत्रतंत्रे जुळवली. युरोपमधील लोकसंख्येचा भार हलका केला. आम्ही यापैकी काहीच न करता युरोपसारकं होण्याचा निर्णय घेतो, याला काय म्हणावे? आमच्या शिक्षिताना, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण करणा-या नेत्यांना, विचारवंताना, पाश्चात्य संस्कृतीच्या मानसिक गुलामीतून काही मुक्त होता येत नाही.

युरोपनं सारं जग जिंकून, प्रचंड व्यापारउदीम करून, अनेक शोध लावून, गेल्या तीन चारशे वर्षाच्या कालावधीत जेवढे भांडवल उबे केले, ज्या मातीमोलानं हवा तेवढा कच्चा माला आणि श्रम वसाहतीमधून मिळवला आणि कारखानदारीतून पक्का माल तयार करून मन मानेल त्या दराने पुन्हा वसाहतीच्या हक्काच्या बाजरपेठांतून विकला. तशी संधी, तेवढा काळ आपल्या देशाला यापुढे मिळणार आहे काय? हे शक्यच नाही. युरोपला संधी मिळाली, प्रचंड उद्योग केला, म्हणून उद्योगाच्या घरी रिद्धसिद्धी त्यांच्याकडे पाणी भरते आहे. आम्ही ब्रह्मानंदी टाळी लावून, असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशा समजूतीत पिढ्यांन पिढ्या भजन करीत बसली. त्यामुळे भोजनाला महाग व्हायची पाळी आली. आमच्या घरी साडेसातीचा खराटा फिरायला लागला.

हे सर्व स्पष्ट असूनही आमच्या शिक्षितांनी युरोपीय मॉडेलचा नाद सोडला नाही, सारा देश युरोप्रमाणे करता येत नाही ना? मग आपलाच असंघटीत, अशिक्षित ग्रामीण भाग वसाहतीप्रमाणे शोषून घेऊया, असे निर्णय घेतले गेले, आधुनिकीकरण म्हणजे पाश्चातीकरण आणि सर्व देशांत ते अंमलात येत नाही, तर मग शहरापुरते आणू या. आमची नगरे आणि महानगरे जी उभी रहात आहेत ती युरोपीयन शहरी, औद्योगिक संघटित समाजरचनेची भ्रष्ट नक्कल आहे. त्यासाठी आमचाच ग्रामीण भाग आम्ही वसाहतीसारखा वापरीत आहोत. पूर्वी जी वसाहतवादी अर्थव्यवस्था इंग्लंडच्या भरभराटीसाठी मांडली होती, ती तशीच स्वातंत्र्यानंतर आम्ही चालू ठेवली आहे. फरक एवढाच की, ती वासाहतवादी लुटालूट इंग्लंडला जायची, आता देशांतच शहरी भागाल पोहोचवली जात आहे.