उलट पीछेहाटच झाली !
ही गोष्ट खरी आहे की, पाश्चात्य विचारांच्या प्रभावाने साक्षेपी बुद्धिवादाचें लोण प्रथम महाराष्ट्रांत आलें. पण यांत अपमान अथवा शरम वाटण्यासारखें असें काय आहे? आपण एका परकीय सत्तेचे गुलाम झालों ही राजकीय घटना शरम वाटण्यासारखी आहे खास. परंतु ही राजकीय घटना तरी आपल्या वैचारिक व सामाजिक दुर्बलतेमुळेच घडून आली ना. याचाच दुसरा अर्थ असा की, ज्यांनी या देशावर राज्य स्थापित केलें, ते केवळ शास्त्रांच्या बाबतींत आघाडीवर होते असें नाही. शास्त्रें आणि नवीं ज्ञानें याहि क्षेत्रांत ते आघाडीवर होते. तेव्हा जर आपणांस ही परिस्थिति बदलावयाची असेल तर आपली सामाजिक व वैचारिक दुर्बलता आपण प्रथम नष्ट केली पाहिजे हा यावरून निघणारा एक निष्कर्ष अगदीं उघड आहे. ही दुर्बलता नष्ट करण्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांकडून जें घेण्यासारखें असेल तें घेण्याइतपत आपण मनाचा मोकळेपणा दाखवावयास हवा होता. राजकीय पारतंत्र्य आणि आर्थिक शोषण याला विरोध करीत असतांनाच आधुनिक ज्ञानविज्ञान आणि विज्ञान यांना विरोध करण्याचें कारण नाही हा विवेक आपण बाळगावयास हवा होता. कारण कोणतीहि घटना मिश्र स्वरुपाची असते. ती सर्वस्वी वाईट नसते अथवा सर्वस्वी चांगली नसते. इंग्रजी राज्य हें परमेश्वरी वरदान होय ही भूमिका जितकी अतिरेकी, तितकीच हें सैतानाचें राज्य ही भूमिका अतिरेकी होय. या राज्याचें राजकी स्वरुप आणि त्या राज्यानें नकळत आणलेली विचारधारा यांची गल्लत करणें हें कांही बुद्धिवादाचे लक्षण नाही. परंतु परकीय सत्ता वाईट म्हणजे तिचें सारें कांही वाईट या अतिरेकाने आम्हांस पछाडलें आणि महाराष्ट्रांत साक्षेपी बुद्धिवादाची पीछेहाट होत गेली.
यानंतर महाराष्ट्रांत 'समर्थनवादा' चें युग सुरू झालें. जें जें आपलें तें तें चांगले अशा बुद्धीची धारणा या समर्थनवादांत होती. याला आंधळा बुद्धिवाद असेंहि म्हणतां येईल. या समर्थनवादांत अनेक विचारप्रवाहांचे मिश्रण झाल्याचें आढळून येईल. प्राचीन इतिहासाच्या संशोधनवादाची जागा त्या इतिहासाच्या उदात्तीकरणाने घेतली. आपली प्राचीन वर्णाश्रम-व्यवस्था पाश्चात्यांच्या समाजव्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ आहे, आपला अध्यात्मवाद पाश्चात्यांपेक्षा फारच उच्च प्रतीचा आहे, आपण पूर्वी वैभवसंपन्न होतो आणि आपणास कोणाकडून कांही शिकण्यासारखें नाही, ही इतिहासाच्या उदात्तीकरणामागील भूमिका. प्रि. गोळे यांचे 'ब्राह्मण आणि विद्या' हे या भूमिकेचें अतिरेकी टोक म्हणून त्या काळी या समर्थनवाद्यांनीहि त्यावर टिका केली असली तरी समर्थनवादाच्या भूमिकेंतूनच ही अतिरेकी भूमिका तार्किक दृष्ट्या निघत होती. पाश्चात्य तत्त्वज्ञान जेथ संपतें तेथे गीतेच्या तत्त्वज्ञानास सुरुवात होते असें आपण एकदा मानलें की 'चातुवर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागश:' हें देखील मानावें लागतें. त्या चातुर्वर्ण्याचा पुढचा भाग म्हणजे ब्राह्मण आणि त्यांची विद्या हा होय.
दोन विरोदी निष्कर्ष
या समर्थनपर बुद्धिवादांत कार्यकारणभावाचा विपर्यासहि झाला होता. सामाजिक अवनतीचे राजकीय अवनति हें कार्य. राजकीय अवनति एकदा सुरू झाल्यानंतर सामाजिक अवनतीला आणखी वेग चढतो हें परस्परावलंबित्व मान्य करूनहि, सामाजिक व राजकीय अवनतीमधील हें कार्यकारणभावाचें नातें विसरतां कामा नये. पण पूर्वी आम्ही व आमच्या समाज पूर्णावस्थेंत होता येथून विचारास सुरुवात झाली की राजकीय अवनतीमुळेच ही सारी दुरवस्था प्राप्त झाली आहे असं मानणें भाग पडतें. 'घोडा बिघडतो कशाने, भाकरी करपते कशाने आणि पान नासतें कशाने? तर न फिरवल्याने ' हे दृष्टांत याच विपर्यासाचे सूचक होत. या विपर्यासामुळे लोकमानसांत भ्रम आणि खोट्या आशा निर्माण होतात. जर राजकीय पारतंत्र्य हेंच आमच्या सर्व दु:खांचे मूळ तर तें पारतंत्र्य नष्ट होतांक्षणी सर्व दु:खांचा नाश होऊन सुखाचें साम्राज्य सर्वत्र नांदेल ही भ्रमजन्य आशा मनांत स्वाभाविक निर्माण होते. वस्तुस्थितीने त्या भ्रमाला निरास झाल्यावर, त्यापासून निर्माण होणारें वैफल्य व निराशा समाजावर वाईट परिणाम घडवीत असतात. सध्या आपल्या सार्वजनिक जीवनांत आंदोलने आणि उठाव, संप आणि सत्याग्रह यांची जी वावटळ निर्माण झाली आहे तिचें मूळ या भ्रमनिरासांत सांपडेल. क्लायमॅक्स आणि अॅन्टीक्लायमॅक्स यांचे परिणाम नाटकांत ठीक वाटले तरी जीवनांत ते भयंकर उलथापालथ करूं शकतात. इंग्रजी राज्य परवडलें पण हा भ्रष्टाचार नको, आता एक पोलादी पुरूष हवा, अशा अनेक वैचारिक विकृति या भ्रमनिरासांतून निर्माण होतात. त्याचे पडसाद आपल्या कानांवर पडत आहेत.