दिल्लीचा नूर कांही वेगळा आहे. येथे मोगल साम्राज्याची शान आहे. ब्रिटिश राजवटीचे वैभव आहे. खानदानी उर्दूची अदब आहे. आणि या सर्व संस्कृतींत रस घेणा-या पण त्याच वेळीं लोकशाहीच्या परंपरा आत्मसात् करणा-या नेहरुंच्या सुसंस्कृत राजवटीचाहि येथे पाया घातला गेला आहे. त्या राजवटींत कोणालाहि परकें वाटण्याचे कारण नाही आणि आकसाने कोणाला वेगळें लेखलें जाण्याची तर तेथे मुळीच भीति नाही. त्या राजवटीबद्दल कोणाला प्रेम वाटो न वाटो. तिच्या धोरणाची दिशा कोणाला आवडो न आवडो. पण एवढें मात्र खरें की, कोणीहि नि:शंकपणें त्या राजवटीबद्दल आपले विचार मांडूं शकतो. आणि तें मत राजवटीला मान्य नाही म्हणून कोणाच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर येथे सहसा घाला घातला जात नाही. दुर्दैवाने या राजधआनींत आपल्याला मानाचें नव्हे, कसलेंच स्थान राहिलें नाही अशी एक भावना आजवर महाराष्ट्राच्या अंत:करणांत घर करून राहिली होती. ती भावना निर्माण होण्याला कांही सबळ, दुर्बल कारणें घडलींहि असतील. पण त्या भावनेमुळें महाराष्ट्रांत दिल्लीबद्दल एक प्रकारचा कडवटपणा निर्माण झाला खरा. त्याची प्रतिक्रिया या ना त्या कारणामुळे राजधानीतहि उमटली आणि महाराष्ट्रांत घडणा-या कृतींची चिकित्सा करतांना थोडीफार विकृत भावना थोरामोठ्यांच्या अंत:करणांतहि प्रगट होत असलेली आढळून येऊं लागली. मग महाराष्ट्राच्या इतिहासांतील कांही अनिष्ट घडामोडी, गांधीवादी राजकारणाच्या वाहत्या प्रवाहाला अडथळा आणणारें महाराष्ट्रांतील कांही नेत्यांचे वर्तन, आणि अलीकडील काळांत राज्यपुनर्रचनेच्या वेळीं महाराष्ट्राने दाखविलेला आग्रहीपणा या सर्वांवर कांही वेगळाच प्रकाशझोप टाकला जाऊं लागला आणि सर्वसाधारणपणे येथे अशी एक भावना प्रचलित होऊं लागली की, "महाराष्ट्रांत समजूतदारपणा असा राहिलेलाच नाही; भारतीय जीवनाशीं हे लोक समरस होऊं शकत नाहीत."
त्या भावनेला धक्का देण्याचें कार्य यशवंतराव चव्हाण यांनी गेल्या दोनतीन वर्षांत केलें. अत्यंत यशस्वीपणे केलें. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांची ही सर्वांत महत्त्वाची कामगिरी होय. ही कामगिरी भारताच्या दृष्टीनेहि महत्त्वाची ठरेल काय, हें सांगणें आज तरी कठीण आहे. पण दिल्लीच्या राजकीय जीवनांत वावरतांना अनेक परप्रांतीय लोकांशी ज्या वेळीं माझी भेट होते त्यावेळी वारंवार एकच उद्गार माझ्या कानीं येतो. तो म्हणजे "आदर्श मुख्य मंत्री म्हणून कोणाकडे बोट दाखवावें लागेल तर तें महाराष्ट्राच्या यशवंतराव चव्हाणांकडेच होय. "
उभ्या महाराष्ट्राला आनंद देणारे हे उद्गार मी नेहमी ऐकतों. आणि त्याच वेळी माझ्या कांनी अशोक मेहता यांनी कळकळीने काढलेले उद्गार गुणगुणूं लागतात : "पंडितजी आणखी सात वर्षे कार्यक्षम राहिले तर त्यांचा वारसदार कोण या प्रश्नाचे उत्तर मी नि:शंकपणे देईन यशवंतराव चव्हाण !"
"महाराष्ट हा या भारताचा एक भाग आहे. आपली भारतनिष्ठा आणि महाराष्ट्रनिष्ठा या पूरक बनल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या भआवनेंत वहात जातांना राष्ट्रनिष्ठेला तिळमात्र धक्का लागतां कामा नये. इतकेंच नव्हे तर या दोन निष्ठांमध्ये तरतम असा विचार कधीं वेळ आलीच तर राष्ट्रनिष्ठेला प्राधान्य दिलें गेलें पाहिजे; हें माझ्या विचारांचें सूत्र पूर्वी होतें तें आजहि कायम आहे."
- श्री. चव्हाण ( सांगली येथील भाषणांत ६.१.१९६०)