हा कारभारी वा सुभेदार स्वायत्त खरा. पण त्याच्या स्वायत्ततेला लोक सत्तावादी घटनेच्या जशा मर्यादा पडलेल्या असतात त्याचप्रमाणे पक्षीय संघटनेच्या परंपरागत बंधनांनीहि ती जखडलेली असते. त्याशिवाय या देशांत अद्याप तरी केंद्रीय सत्ता व प्रदेश राज्ये हीं एका नाजुक पण अभंग अशा धाग्याने एकमेकांशी निगडित झालेलीं दिसून येतात. हा धागा म्हणजे अर्थातच पंडितजींचे अनमोल नेतृत्व होय. या नेतृत्वाचें वैशिष्टय असें आहे की, त्यांत अधिकाराची गरज भासत नाही. उलट तो अधिकार निर्व्याज प्रेमाचाच आविष्कार वाटतो. पंडितजींच्या अधिकाराची मर्यादाहि इतकी व्यापक आहे की, काँग्रेस संघटना असो, केंद्रीय मंत्रिमंडळ असो की कोणतेंही केंद्रीय खातें वा उपखातें असो, ते प्रत्येक ठिकाणीं केंद्रस्थानीं असतात व त्यांच्या मेहेरनजरेवरच सा-या राजकीय. सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचे भवितव्य अवलंबून असते. तसेंच व्यक्तीचेंहि .
प्रादेशिक मुख्य मंत्र्याचें कर्तृत्व आज तरी एकाच निकषावर घासून तपासलें जातें आणि तो निकष हा की, पंडितजींची सदिच्छा त्याने संपादन केली आहे काय ? व केली असल्यास ती किती प्रमाणांत ? कोणाला आश्चर्य वाटेल, पण पंडितजी तत्त्वत: लोकशाहीचे भोक्ते आहेत. मनाने व वृत्तीने लोकशाहीच्या परंपरा जनत करणारे आहेत. पण त्यांच्या हातीं मात्र सर्वकष सत्ता केंद्रित झालेली आहे व त्यांचा अधिकार सा-या नियोजनावर, सा-या राज्यकारभारावर आणि आपल्या अनुयायांच्या मनावर अनियंत्रितपणें चालतो. म्हणून 'तीन मूर्ती' च्या परिसरांत कोणा मुख्य मंत्र्याचा कितीसा संचार आहे व त्याचें तेथे किती वजन आहे यावरच त्याचे यश वा अपयश मानलें जातें.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांचा गेल्या दोन-तीन वर्षांत जो झपाट्याने उत्कर्ष झाला त्याचें एक मुख्य कारण असें सांगतां येईल की, त्यांनी पंडितजींचा विश्वास संपादन केला, त्यांचे मन मिळविले. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या नेतृत्वाचें जें दर्शन पंडितजींना झालें होतें. तें एक तर आग्रहीच नव्हे तर हेकेखोर वा चंचल आणि दुबळें. पहिल्या वृत्तीचें नेतृत्व त्यांच्या, सुसंस्कृत म्हणा किंवा खानदानी म्हणा, मन:प्रवृत्तीला मानवलें नाही. दुस-या वृत्तीच्या नेतृत्वाने त्यांची फसगत केली. मग महाराष्ट्राचा प्रश्न सोडविण्यासाठी एकामागून एक पर्याय ते सुचवीत वा स्वीकारीत गेले आणि त्यांच्या निदर्शनास आलें तें हें की, महाराष्ट्राच्या त्यावेळच्या नेतृत्वाला स्वत:च्या वा इतरांच्या पर्याबद्दल निष्ठाच नाही. त्याचा परिणाम असा झाली की, दिल्लींतील अनेक राजकीय पुढारी वा निरीक्षक यांच्याप्रमाणे पंडितजींचीहि अशी समजूत झाली की, "महाराष्ट्राचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही. असमाधान हाच त्याचा बाणा झाला आहे."
यशवंतराव चव्हाण यांनी पंडितजींवर, काँग्रेसश्रेष्ठांवर आणि दिल्लीवर छाप टाकली ती आपल्या निष्ठेची त्यांना जाणीव करून देऊन. ही जाणीव त्यांनी अबोल कर्तृत्वाने करून दिली हें विशेष आहे. त्या वेळच्या परिस्थितीचा विचार मनांत आला म्हणजे मला मधून मधून वाटतें, महाराष्ट्रांतील काँग्रेसच्या नेत्यांनी. आपल्या तोंडची वाफ जरा कमी दवडली असती आणि बोलण्याऐवजी कृति केली असती तर किती बरे झालें असतें ! यशवंतराव चव्हाण दिल्लीच्या लोकांना उठून दिसतात ते त्यांच्या मुंबई व महाराष्ट्र राज्यांतील कर्तृत्वाने. त्यांचे दर्शन वा भेट ज्यांना होते त्यांना ते अघळपघळ बोलतांनाहि दिसत नाहीत आणि अवास्तव घोषणा करतांना तर मुळीच आढळून येत नाहीत.
अबोल कर्तृत्वाचे आदर्श म्हणून दिल्ली दोनच मुख्य मंत्र्यांना ओळखते. एक मद्रासचे मुख्यमंत्री कामराज नादर आणि दुसरे महाराष्ट्राच मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. दोघांनीहि आपल्या प्रदेशाचा राज्यकारभार इतरा कार्यक्षमतेने चालविला आहे की, पंडितजी. पंतजी व इतर काँग्रेसश्रेष्ठ, इतकेंच नव्हे तर परदेशांतून आलेले मुत्सद्दी सुद्धा त्यांना नि:शंकपणें प्रशस्तिपत्र देतात. पण हीं प्रशस्तिपत्रें शिरावर धारण करतांनाहि त्यांच्या तोंडून अभिमानाचा शब्द निघत नाही. कामराज नादर हे वृत्तीने अबोल आहेत आणि त्यांना बोलतांना भाषेचीहि अडचण पडते. यशवंतराव चव्हाण यांचा व्यासंग चांगला आणि बोलण्यांतहि ते वाकबगार आहेत. पण त्यांनी मितभाषित्व हा आपला बाणा केला आहे आणि जें कांही ते बोलतात तें मोजकें व मुद्देसूद असतें. राजकीय जीवनांत लोकांना कृतिशून्य पण शब्दशूर लोकांच्या तोंडाचा पट्टा चाललेला ऐकण्याची सवय झाल्यामुळे या अबोल व मितभाषी अशा दोन मुख्य मंत्र्यांच्या वर्तनाची त्यांच्यावर साहजिकच अधिक मोहिनी पडते.