साहेब यशवंतरावजी चव्हाण-३४

अर्थमंत्री असताना कराडच्या विश्रामगृहात फाटक्या लुगडयातली एक म्हातारी मला भेटायला आली. पोलिस तिला येऊ देईनात. माझं लक्ष गेलं. लुगडयाच्या घोळात लपवून तिनं काहीतरी आणलं होतं. मी तिला जवळ बोलावून विचारलं:
"म्हातारे, का आलीस?"
"समदा गाव येशवंताला नावाजतुया, तवा त्येला हा हार द्येवा- म्हून आलो."
तोच हार मी तिच्या गळयात घातला, आणि तिच्या पाया पडलो.
अशीच आणखी एक म्हातारी आठवते. ६०-६५ च्या निवडणुकीचा काळ.... सातारा मतदार संघात म्हसवडची सभा खूप रात्री लावली होती. थंडी मी म्हणत होती. एक म्हातारी स्टेजजवळ यायला धडपडत होती, कार्यकर्ते तिला अडवीत होते. मी म्हटलं,
"येऊ द्या तिला"
म्हातारी जवळ आली. चिरगुटात बांधलेली चटणीभाकर माझ्यापुढे धरीत म्हणाली ,
“खाऊन घ्ये बाबा! कवा जेवला असशीला?”
तुम्हाला सांगतो, ती चटणीभाकर मी स्टेजवर खाल्ली. तिला अमृताची गोडी होती!!
ह्या अशा म्हाता-यांमध्ये मी माझी ‘आई’ पहात होतो.

३१ऑक्टोबर ८४ ला इंदिराजींची निघृण हत्या झाली.
(बंदुकीचे तीन आवाज ऐकू येतात.)
अशा १८ गोळया?
वै-यालाही असं मरण येऊ नये!
त्यानंतरचे ७-८ दिवस मी सुन्न होतो. त्यांचे माझे मतभेद होते, पण आता मन मोकळं करावं असं दिल्लीत कोण उरलं होतं?
माझा पी. ए. राम खांडेकर यानं विचारलं:
“साहेब, मुंबईला कधी जायचं?”
“खांडेकर, खंर सांगू? आता मी दिल्लीत का राहतोय, तेच कळत नाहीए”

त्याच्या आधीच, जून १९८३ ला वेणूबाई मला सोडून गेली. त्याच क्षणी,
माझ्या अंत:करणातल्या पवित्र नंदादीपाची ज्योत कायमची निमाली आणि हातात उरली ती फक्त चिमूटभर राख..... जीव कासावीस करणारी काजळी.

कराडला ‘विरंगुळा’ उभा राह्यला....
मुंबई-महाराष्ट्रात मानानं २५-३० वर्ष काढली.
दिल्लीत २२ वर्ष झाली इतमामानं वावरलो....
जग पाहून घेतलं......
सत्ता, संपत्ती, मान-सन्मान काही काही कमी पडलं नाही; खंत एकच होती: वात्सल्याचं इथलं, इथलं दालन रिकामंच राह्यलं.... चिमुकल्या बाळकृष्णाच्या इवल्याश्या पावलांनी आमचे कपडे मळले नाहीत.
एक चिमुकला अंकुर डोकावून गेला,
पण, कठोर दैवानं तो अवेळीच खुडुन नेला!
(सुस्कारून) जगी सर्व सुखी असा कोण आहे?
समर्थांच्या ह्या सवालाच्या आधारानंच,
आम्ही इतके दिवस एकमेकांचे डोळे पुशीत पुशीत बंगल्यावर साहित्यिक मैफिली भरवल्या,
काव्यवाचनाचे अनेक धुंद क्षण उपभोगले..... पण,
आता माझे डोळे कोण पुसणार?
कोण.....
(सावरून) शेवटी, जाता जाता मला नव्या पिढीला एकच सांगायचंय,
“धर्मानं तुम्ही कुणीही असा-कुणीही.....
हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन कुणीही!
आपला धर्म आपण आपल्या अंत:करणात, आपल्या घरात आणि आपल्या प्रार्थना मंदिरातच ठेवायला हवा.

राजकारणात आणि सस्त्यात आणू नये. भिन्न धर्म, भिन्न पोशाख, भिन्न भाषा यांनी नटलेला हा आपला प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारा भारत म्हणजे ‘विविधतेत एकता’
ह्या सत्याचं इंद्रधनुषी प्रतीक आहे!
इंद्रधनुष्यातला ‘केशरी’ कधी ‘हिरव्या’ शी भांडतो का?
५००० वर्षांच्या सहिष्णुतेचा इतिहास असणारे हे राष्ट्र वर्धिष्णु होवो, जगाला शांतीचा संदेश देवो.

महाकवी इकबालनं म्हटल्याप्रमाणे:

‘मजहब नहीं सिखाता
आपस में बैर रखना
हिंदी है हम
हिंदी है हम
हिंदी है हम
वतन है हिन्दोस्तॉं हमारा!!
सारे जहॉंसे अच्छा, हिन्दोस्तॉं हमारा!!