कुसुमाग्रजांची 'गाभारा' ही कविता वाचून तर आम्ही दोघं अगदी हरखून गेलो:
'दर्शनाला आलात? या-
पण, या देवालयात सध्या देव नाही गाभारा आहे...
नाही, नाही- तसं नाही
एकदा होता तो तिथे-
पण, एके दिवशी, आमचं दुदैवं-
उत्तर दरवाजाजवळ आडवलेला कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला:
"बाप्पाजी बाहेर या!"
आणि काकड-आरतीला पहाटे आम्ही पहातो,
तो गाभारा रिकामा!
पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे
परत? कदाचित् येईलही-
पण महारोग्यांच्या वस्तीत राहिलेल्या त्याला पुन्हा इथं प्रवेश द्यायचा की, नाही याचा विचार करावा लागेल ट्रस्टींना!
तूर्त गाभा-याचंच दर्शन घ्या- तसं म्हटलं, तर अंतिम महत्व गाभा-याचंच असतं गाभारा सलामत तो देव पचास!"
इचलकरंजी साहित्य संमेलनात त्यांना व्यासपिठावर मंत्री नको होता, म्हणून मी समोर प्रेक्षकात बसलो... शारदेच्या मंदिरात जाताना अधिकार-पदाची पादत्राणं बाहेरच काढून ठेवलेली बरी!
मात्र, मी राजकारण कसं खेळावं, हे मला एक थोर, विनोदी लेखक-नट आणीबाणीच्या काळात शिकवायला लागले, तेव्हा मला त्यांना खडसावून सांगावं लागलं,
"राजकारणाचे धडे आम्हाला विदूषकांनी देऊ नयेत!"
कोणालाही उठसूट 'युगप्रवर्तक' म्हणणं मला काही पटत नाही. प्रा. ना. सी. फडके यांच्याविषयी संपूर्ण आदर बाळगूनही 'युगप्रवर्तक' या कार्यक्रमात बोलताना मी स्पष्टच सांगितलं:
"युग हे व्यक्तीच्या मानानं फार लांब, फार मोठं असतं! साहित्यिक कितीही थोर असला, तरी त्याच्या कर्तुत्वानं युगाला बांधून ठेवता येणार नाही." फडके म्हटलं की, अत्रे आठवणारच!
मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना अत्रे आमदार होते.... चौपाटीवर मी एक झाड लावलं, त्या संदर्भात अत्रे विधानसभेत म्हणाले,
"यशवंतरावांनी लावलेल्या झाडाला कुत्रं पाणी घालताना आम्ही काल पाह्यलं!"
मी ताडकन् उठलो. त्या दिवशी कोणती कोणती कामं केली, ते सांगून म्हणालो:
"मी काल एवढी कामं केली, आणि अत्रे मात्र कोणत्या झाडाला कोणतं कुत्रं पाणी घालतंय्, ते पहात हिंडत होते!!" (मोठा हशा)
'सीमेवरून परत जा' हे नाटक लिहिणारे बाळ कोल्हटकर मला 'छोटा गडकरी' वाटले.
'गीत रामायणा' सारखं अक्षर-लेणं महाराष्ट्र-सरस्वतीला चढवणारे आधुनिक वाल्मिकी ग. दि. उर्फ अण्णा माडगूळकर यांना मी एकदा म्हणालो,
"अण्णा! आता मोटार घेऊन टाका!" तर ते म्हणाले,
"साहेब, आमच्या कुंडलीत वाहन-योग नाही."
म्हटलं, "नसू द्या हो! वाहन घेऊन टाका आणि त्यात कुंडली द्या लटकावून!"
('पराधीन आहे जगती' या ओळी ऐकू येतात.)
उत्तम शब्दकळेवर माझं प्रेम आहे. एकदा आम्ही प्रवरानगरला बोलत बसलो होतो, तर बातमी आली:
"त्या अमक्या तमक्याला हदयविकाराचा झटका आला-"
मी म्हटलं, "अरे, तो तर फार सुखी दिसत होता. शेती चांगली पिकत होती. प्रपंच व्यवस्थित आहे- मग हदयविकाराचा झटका कसा?"
यावर थोरले, पदमश्री विखे-पाटील पटकन् म्हणाले, "साहेब! त्याच्या काळाजाला कुरूप झालं होतं."
वा: ! काय शब्द आहे- 'काळजाला कुरूप!'
अर्थमंत्री असताना शंतनुराव किर्लोस्करांशी आमची पैज लागली:
'निक्सन हरणार की जिंकणार?"
म्हटलं, "काय हरता?"
"एक रूपया!"
ते हरले, त्यांनी आठवणीनं एक रूपया पाठवून दिला.
मी अर्थमंत्री असतानाच ताई बस्तीकर-त्यांचा आणि नारायण पुराणिक यांचा वेरूळजवळ 'कैलास ट्रस्ट' होता-त्या दिल्लीला घरी आल्या. वेणूबाईला रागारागानं विचारू लागल्या:
"आमच्या 'ट्रस्ट' वर प्राप्ती-कर आकारणारा कोण गाढव अर्थमंत्री आहे हो?"
मी पटकन् पुढे होऊन, हात जोडून त्यांना म्हटलं,
"ताई, तो सध्या तुमच्यासमोर उभा आहे!"
'५६-५७ साली पुण्याच्या हिराबागेत 'तमाशा-परिषद' भरली होती. 'केसरी' चे भा. द. खेर पण आले होते. मी त्यांना विचारलं:
"कसा काय वाटला तमाशा?"