"सदाशिव-पेठी नाटकापेक्षा हा तमाशा फार सभ्य आहे!"
"अहो, माणूस सभ्य किंवा असभ्य असू शकतो! साहित्य नव्हे." (गंभीर होत) बंदुकीच्या गोळीनं जे प्रात्प होत नाही, ते सामर्थ्य विचारातून, संस्कारातून येतं-आणि हे काम साहित्यामार्फत घडतं! जनतेत सुत्प शक्ती आहेत. त्या जागृत करून तिचं सामर्थ्य वर्धिष्णू करायचं काम साहित्यानं केलं पाहिजे."
७४ साली एकसष्टीच्या निमित्तानं आळंदीला जायचा योग आला. जेव्हा जेव्हा मी आळंदीला गेलो, तेव्हा तेव्हा मी अजाण वृक्षाखाली १०-१० मिनिटं डोळे मिटून बसत असे. तेवढया वेळात राजकारणाचं ओझं कमी व्हायचं, तणाव सैल व्हायचे.
('समाधी साधन' – सुधीर फडक्यांचे स्वर ऐकू येतात)
आळंदीच्या भास्करराव साकतकरांना मी म्हटलं, "ज्ञानेश्वर महाराजांवर आपण स्वतंत्र ओवीबध्द ग्रंथ लिहा-"
तर ते म्हणाले, "द्रव्यबळ नाही!"
म्हटलं, "श्री निवृत्ती विजय, श्री सोपानदेव हे ग्रंथ कागदावर छापलेत, पण ज्ञानेश्वर माऊलीचा ग्रंथ लोक सुवर्णपत्रावर छापतील!"
'किर्लोस्कर' मासिकात पि-या मांगावर लेख लिहिणारे धों. म. मोहिते' ५२ च्या निवडणूक-दौ-यात भेटायला आले; म्हणाले,
"तुमच्या या दौ-यात नेमकं आमचं गाव वगळलंय तुमच्या त्या टग्यांनी-" त्यांचा टगे हा शब्द मला खूप आवडला.
मी त्यांना आश्र्वासन दिलं:
"त्यांनी आखलेला दौरा सकाळी ९ वाजता सुरू होतो. मी ठीक ८ वाजता तुमच्या गावी हजर होतो! मग तर 'टगे' आडवे येणार नाहीत ना?"
असलाच एक परभृत, वडखळ-नाका-फेम टग्या म्हणाला, "यशवंतराव म्हणजे महाराष्ट्रावरचा कलंक आहे."
त्याच्या स्वच्छ चरित्र्याचा वर्षभरात पंचनामा सुरू झाला, त्याची लक्तरं पुढे १२ वर्षं वा-यावर उडत होता....
काही टवाळखोरांना वाटतं: मी कुंपणावर बसणारा आहे-त्यांना मी एवढंच सांगेन:
"जुन्यातलं चांगलं वेचायचं,
आणि नव्याच्या स्वागताला पुढं जायचं;
हीचं आपली प्रवृत्ती असली पाहिजे!
अहो, दोन पिढयात अंतर आणि प्रसंगी संघर्ष येणारच!
पण, त्यातूनच तर प्रगती होते!!
१००हून अधिक वर्षांची कॉंग्रेस आणि तिचं राजकारण, हेच देशाचं मूळ राजकारण, हीच निष्ठा मी वा-या-वादळात जपली. सत्तेच्या राजकारणात कोण चढलं, कोण पडलं- ह्यापेक्षा देश पुढं गेला पाहिजे, पक्षाचं बळ वाढलं पाहिजे ह्या प्राणांतिक निष्ठेनंच मी कॉंग्रेसचा झेण्डा खांद्यावर घेऊन शेवटपर्यंत चालत राहिलो.
राजकारणाच्या धकाधकीत मला दिलासा देई ते संगीत! हिराबाई, भीमसेन- नागपूरला भीमसेन जोशींची एका मैफिल चालू होती. काही श्रोते अस्ताव्यस्त पसरले होते.... देशस्थ, व-हाडी! पंडितजींनी त्यांना समज दिली, तरी ते आपले लोळताहेत. मी ताडकन् उठून त्यांना खडसावलं:
'मैफिलीची म्हणून काही एक शिस्त असते! तीही पाळता येत नसेल, तर घरी जाऊन लोळा!!'
'घरी या' असा आग्रह भीमसेन नेहमी करीत.
"तुमचा बंगला होऊ द्या मग येतो."
८४ जून मध्ये कराडहून पुण्याला गेलो. भीमसेनजींची नवी वास्तू पाहून समाधान झालं!
त्यांच्या सौभाग्यवतींना म्हणालो,
"पंडितजींचं बाहेरचं सुरांचं वैभव अनेकदा पाह्यलंय, आज तुमचं घरचं वैभव पाहून आनंद झाला."