पुढं मी मंत्री झालो,
मुखमंत्री झालो,
पण मामलेदार झालो नाही,
याची खंत बहुधा त्याच्या मनातून गेली नसावी!
(सौम्य हशा)
माझ्या आईचा एकच ध्यास होता,
एकच मंत्र होता:
“शिक्षण ही शक्ती आहे,
आणि ती आपण मिळवलीच पाहिजे!”
पहाटे जात्यावर ती ओवी म्हणायची:
“नका बाळांनो डगमगू-
चंद्रसूर्यावरील जाईल ढगू
नका बाळांनो डगमगू||”
७वी पास झाल्यावर,
लोकसंगीताप्रमाणेच मला तमाशा पण आवडायला लागला!
एक दिवस संध्याकाळी,
आम्ही ५-६ मित्र निघालो तमाशा पहायला!
कृष्णा नदीची फरशी ओलांडून
एक मैल गेलो असू नसू-
तोच
समोरून आमचे ‘ड्रिल’ मास्तर:
(दटावीत) ‘फुर्र र्र र्र- काय रे ए पोरांनो!
कुठं चाललात एवढया सायंकाळी?”
“स्टेशनावर! तिथं टॉमशॉ येणार आहेत,
त्यांना पहायला-“
“हा कोण टॉम- शॉ?”
“बर्नार्ड शॉचा मोठा भाऊ!” (मोठा हशा)
ह्याच काळात मी केळुसकरांनी लिहिलेलं
“छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र,”
शिवरामपंत परांजपे यांचे
“काळातले निबंध”
आणि पंढरनाथ पाटलांनी लिहिलेलं:
“महात्मा जोतीराव फुले यांचं चरित्र”
वाचून काढले.
(गंभीर मुद्रेने) ते ‘सायमन कमिशन’ चे दिवस होते...
यतींद्रनाथ दासांचं आमरण उपोषण सुरू झालं तुरूंगात-
मी मनानं विलक्षण अस्वस्थ झालो:
लाहोरच्या तुरूंगात,
भर दुपारी प्रखर सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी तेजस्वी आत्मार्पण केलं...
त्याच क्षणी मी निश्चय केला: