साहेब यशवंतरावजी चव्हाण-३

आमच्या भागातल्या मुली मागायच्या:
“कालं बेलं कासेगाव
ओण्ड मनू नांदगाव
साळ शिरंबं वाटेगाव
पाणी प्यायला येळगाव
आणि वस्तीला टाळगाव!”
इतर लक्षावधी गरीब घरातल्या मुलांप्रमाणेच
माझं लहानपण गेलं......
मी अवघा चार वर्षांचा होतो,
मामाच्या घरापाशी खेळत होतो-
समोरून वडिल आले,
म्हणाले,
“बाळ, आपण घरी जाऊ या-
मला बरं नाहीए-"
काय होतंय, ते मला कळत नव्हतं...
आम्ही मुलं तुळशीच्या कट्टयावर
घोंगडयावर बसलो होतो,
तोच आईच्या दु: खाचा हंबरडा कानावर आला:
“द्येवा रं द्येवा,
आसं कसं जालं रं पांडुरंगाss”

(सतारीवर करूण सुरावट... प्रकाश मंद)

चौथ्या वर्षी पित्याचं छत्र गेलं,
पण आईचं प्रेम दुप्पट वाढलं.

मी इंग्रजी शाळेत जायला लागल्यावर,
माझा वर्गमित्र सखाराम म्हस्के-
मला नेहमी विचारायचा:
“तू किती शिकवणार हायस् रं येशा?”
“जितकं जास शिकता यील, तितकं शिकणार म्या-“मामलंदार व्हन्यायवंड?”
“हो, तेवढं तर नक्कीच-"
“तू मामलेदार हो, इटयाला बदली करून घे-
आपल्या या गावाला भेट देयाला ये...
पाटील बिटिल समदं जमलं का,
मला नावानं हाक मारून जवळ बलीव!
म्हंजी, गावात माजी इज्जत वाहाडंल- कसं?”
(किंचित् हसून)