शिक्षेच्या दुस-या दिवशी आई आणि घरची सर्व मंडळी भेटायला आली. त्यांच्याबरोबर आमच्या मराठी शाळेतले एक जुने शिक्षकही आले होते. पोलिसांनी मला कोठडीतून बाहेर काढले आणि त्यांच्या पहा-यातच मला फौजदार कचेरीकडे नेण्यात आले. फौजदारांच्या उपस्थितीतच आईची भेट झाली. मला पाहताच आईच्या डोळ्यांत पाणी आले. मी वयाने पोरसवदा, त्यातून शिक्षा अशी दीर्घ मुदतीची. त्यामुळे आईचे रडणे स्वाभाविक होते. मास्तर आमचे सांत्वन करीत होते. मध्येच ते मला म्हणाले,
''फौजदारसाहेब दयाळू आहेत. माफी मागितलीस, तर सोडून देतील.''
''काय बोलता तुम्ही, मास्तर? माफी मागायची? माफी मागायचे काहीएक कारण नाही. तब्येतीची काळजी घे, म्हणजे झाले, देव आपल्या पाठीशी आहे.'' आई हे बोलली आणि उठूनही गेली.
आमची भेट संपली.
आईच्या या स्वाभिमानी गुणाचा ठेवा अंतःकरणात जतन करून मी कोठडीत परत आलो. मनाने मी निश्चिंत झालो.
आज हा प्रसंग आठवतो, तेव्हा आईचा हा मोठेपणा मला किती उदात्त वळण देऊन गेला, हे जाणवते.
नंतर माझ्या खोल्या बदलण्यात आल्या. मी ज्यावेळी जेलमध्ये होतो, त्याचवेळी आमच्या कराडमधले प्रसिद्ध समाजसेवक बाबूराव गोखले यांनाही अटक होऊन अशीच काही तरी एक वर्षांची शिक्षा झाली होती. तेही याच जेलमध्ये होते. मला माझ्या कृष्णा धनगराच्या खोलीतून काढून बाबूरावांच्या खोलीत एक दिवसासाठी ठेवण्यात आले. एक-दोन दिवसांत आमची येरवड्यास रवानगी होणार होती.
एका संध्याकाळी पोलिस पहा-यात आम्ही रेल्वेने पुण्याकडे निघालो. वाटेत वेगवेगळ्या स्टेशनवर ठिकठिकाणचे आमच्यासारखेच अटक केलेले कायदेभंगाचे सत्याग्रही आमच्या या ताफ्यात येऊन मिसळत होते. आम्ही पुणे स्टेशनवर पोहोचेपर्यंत जवळजवळ ही संख्या आठ-दहा झाली.
पुण्याहून सकाळी येरवडा जेलमध्ये जाण्यासाठी आलेल्या मोटारीतून आम्ही जेलकडे निघालो. जेलच्या दारासमोर गाडी उभी राहिली आणि आम्ही सर्व मोटारीतून खाली उतरलो. वाघाच्या जबड्यासारखा असलेला तो जेलचा दरवाजा मी प्रथम पाहिला आणि मनाशी म्हटले, आता या जबड्यात प्रवेश करायलाच पाहिजे. जेलचे तपासनीस पुढे आले आणि त्यांनी प्रत्येक कैद्याची पाहणी केली. त्यांपैकी फक्त बाबूराव गोखले यांना 'बी क्लास' असल्यामुळे दरवाज्यातून आत घेतले, आणि आम्हां बाकीच्यांना पुन्हा गाडीत बसायला सांगून हुकूम सोडला.
''या लोकांना कॅम्प जेलमध्ये घेऊन जा,''
मी तर आश्चर्यचकित झालो. मी त्या दरवाज्याच्या आत जायच्या तयारीत असताना हा कॅम्प जेल पुन्हा कसला काढला, या विवंचनेत राहिलो.
येरवडा जेलच्या पाठीमागेच, पण सर्व जेलला चक्कर टाकून आल्यानंतर जे मोकळे मैदान होते, त्यामध्ये तारेच्या काटेरी कुंपणाचे एक मोठे वर्तुळ बांधून तयार केले होते आणि आत सर्वत्र तंबूच्या बराकी उभ्या होत्या.