गांधीजी १९३१ च्या अखेरीस, डिसेम्बरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईस परतले, तेव्हा त्यांच्यापुढे अनेक महत्त्वाच्या समस्या वाढून उभ्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी देशातील अनेक नेते मुंबईस आले होते. पं. जवाहरलालजी यासाठीच मुंबईस निघाले असता त्यांना वाटेतच अटक झाली. १९३१ च्या मध्यात हिंदुस्थानचा व्हाईसरॉय बदलून गेला होता. लॉर्ड आयर्विनच्या जागी लॉर्ड विलिंग्डन यांनी व्हाईसरॉय-पदाची सूत्रे हाती घेतली होती. या विलिंग्डन साहेबाची हिंदुस्थानला पूर्ण ओळख होती. कारण त्यांनी यापूर्वी मुम्बई आणि मद्रास येथील गव्हर्नरपदाची सूत्रे सांभाळली होती. इंग्लडमधील हुजूर पक्षाचे ते समर्थक होते. भारतातील राष्ट्रीय चळवळीसंबंधी त्यांना काडीचीही सहानुभूती नव्हती, असा त्यांचा लौकिक होता. दडपशाहीच्या तंत्रात ते मोठे वाकबगार होते, अशीही त्याची कीर्ती झाली होती.
गांधी-आयर्विन कराराने काँग्रेसची व गांधीजींची शक्ती जनमानसात वाढली होती. जनतेच्या अंतःकरणातले त्यांचे हे स्थान दडपशाहीच्या मार्गाने कमी करण्याचा व्यूह या माणसाने रचला होता.
गांधीजी मुम्बईमध्ये येताच वर्किंग कमिटीची बैठक झाली. उत्तर प्रदेशात व इतरत्र चालू असलेल्या किसान-चळवळी, पं. नेहरूंची अटक, वगैरे प्रश्नांचा विचार करून गांधीजींनी लॉर्ड विलिंग्डनच्या भेटीची मागणी केली. त्याला तातडीने नकार देऊन ४ जानेवारी रोजी महात्माजींनाच अटक करण्यात आली व त्यांना येरवड्याच्या तुरूंगात रवाना केले. सरकारच्या या आक्रमक धोरणाविरूद्ध सर्व देशभर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली.
जिल्ह्याजिल्ह्यांतील प्रमुख पुढारी मंडळींनाही असेच अचानक पकडून काँग्रेसविरूद्ध एक प्रकारचे युद्धच ब्रिटिश सत्तेने पुकारले. आमच्या जिल्ह्यांतील पुढारीही पकडले गेले. आमच्या जिल्ह्यांतले आणि गावातले आम्ही इतर कार्यकर्ते एकत्रित आलो आणि पुढे कोणत्या पद्धतीने कार्य करावे, याबद्दल विचारविनिमय व चर्चा सुरू झाल्या.
मी यंदा माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार नाही, असे मी माझ्या घरी सांगून टाकले. माझ्या आईचे म्हणणे होते, की मी निदान मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर काय करावयाचे, ते करावे. पण मी तिला खरे ते सर्व सांगितले. माझ्या सर्व मित्रांची या नव्या चळवळीत काम करण्याची तयारी झालेली आहे. गांधीजी तुरूंगात आहेत आणि अशा वेळी मी माझ्या मित्रांपासून अलग होऊ शकत नाही. तिला माझे म्हणणे पटले नाही, पण परत तिने मला आग्रह करण्याचे सोडून दिले. गणपतरावांनी गेले वर्षभर माझे वाढते संबंध पाहिले होते. त्यांनी मला सांगितले,
''तुला आता तुझ्या सहकाऱ्यांबरोबर राहायला पाहिजे.''
त्यांचा पाठिंबा पाहून मला धीर आला आणि मी मित्रांना माझा निर्णय कळविला. सर्व कार्यकर्त्यांना सांगितले, की
'मी तुमच्या सर्वांबरोबर आहे. जरूर तर आघाडीवर राहीन.'
मी आमच्या शाळेतील काही मित्र जमा केले. त्यामध्ये श्री. पांडूतात्या डोईफोडे, विंगकर बंधू, अनंतराव कुलकर्णी, अहमद कच्छी आणि शांताराम इनामदार, त्याचप्रमाणे हल्लीचे रावसाहेब (पण त्यावेळचा मधू) गोगटे असे अनेक तरुण लोक होते.