त्या बराकी पाहून मला काहीसे हलके वाटले. माझ्या मनाशी विचार येऊन गेला, की हा तर सोपा जेल आहे. आमच्या आधी आलेले शे-दोनशे लोक त्या एवढ्या मोठ्या कॅम्प जेलमध्ये इतस्ततः हिंडताना पाहिले. त्यांच्या अंगांवरचे कपडे पाहून ते आमच्यासारखेच सत्याग्रही असावेत, हे उघड होते. या कॅम्प जेललाही असेच मोठे काटेरी तारेच्या कुंपणाचे प्रवेशद्वार होते. त्यातून त्यांनी आम्हांला आत घेऊन शिक्षा झालेल्या कैद्यांचा पेहराव आम्हांला दिला आणि आमचे कपडे व इतर सामान आपल्या ताब्यात घेतले. कोणीतरी येऊन आमच्या हातामध्ये जेलची जेवणाची थाळी, पाणी पिण्याचे भांडे आणि बिस्तरा आणून दिला. काखेत आपापला बिस्तरा आणि थाळी घेऊन आमची रपेट आत निघाली आणि आम्ही कॅम्प जेलचे बराक गावचे रहिवासी म्हणून मुक्कामासाठी बराकीमध्ये प्रवेश केला.
या कॅम्प जेलमध्ये मी १९३२ च्या फेब्रुवारीमध्ये आलो व तेथे संपूर्ण एक वर्ष होतो आणि त्यानंतरचे तीन महिने विसापूर जेलमध्ये होतो. अठरा महिन्यांच्या शिक्षेपैकी पंधरा महिने मला प्रत्यक्ष जेलमध्ये काढावे लागले आणि १९३३ च्या मे महिन्यामध्ये सुटून मी बाहेर आलो.
जेलमधले पंधरा महिन्यांचे माझे जीवन म्हणजे माझ्या जीवनातला एक अत्यंत उत्तम काळ होता, असे आजही मला वाटते. त्याचे कारण मी आता सविस्तरपणाने सांगू शकतो. मी एक गोष्ट कबूल केली पाहिजे, की माझ्या जीवनात भावनाशीलता कमी होऊन विचारांची खोली वाढविण्याची प्रक्रिया या जेलमध्येच सुरू झाली.
पहिले आठ दिवस मी असेतसेच काढले. तुरूंग हळूहळू भरत होता. एका आठवड्याच्या आत त्या जेलमध्ये जवळजवळ हजाराच्या वर कार्यकर्ते आले. या लोकांची वेगवेगळ्या बराकींमध्ये वाटणी करून त्यांची व्यवस्था लावण्याचे काम आम्हां सत्याग्रहींपैकी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घेतले. बराकींना नंबर देण्यात आले. या लोकांची त्यामध्ये बराक नंबर १२ या एका महत्त्वपूर्ण बराकीची निर्मिती झाली. ही बराक नंबर १२ मी जन्मभर विसरू शकणार नाही. जी प्रमुख माणसे जेलमध्ये आली होती, त्यांतील निवडक व नामवंत माणसांना या बराकीत घ्यायचे, असे कोणी तरी पुढाकार घेऊन ठरविले आणि त्याच मंडळींनी हायस्कूल व कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून याव्या लागलेल्या विद्यार्थ्यांना याच बराकीत ठेवावे, असे सुचविले. त्यामुळे माझी या बराकीत निवड झाली आणि या बराकीतील आमचा बंदिस्त जीवनक्रम सुरू झाला.
प्रत्येक बराकीत शंभर माणसे राहतील, अशी व्यवस्था होती. बारा नंबरच्या बराकीमध्ये अगदी निवडक शंभर माणसे होती. त्यामध्ये प्रमुख नावे सांगावयाची झाली, तर आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन यांची नावे प्रथम सांगावी लागतील. तसेच या बराकीचे सुरुवातीला तेच प्रमुख होते, असे म्हटले, तरी चालेल. रावसाहेबांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि इंग्रजीवरचे प्रभुत्व यांमुळे नवीनच आलेल्या जेल अधिकाऱ्यांनी त्यांना ऑफिसमध्ये येऊन कामात मदत करण्याची विनंती केली. रावसाहेबांनी ती मान्य केली आणि ते रोज ऑफिसमध्ये जाऊ लागले. रावसाहेबांच्या ऑफिसमध्ये जाण्यामुळे एक उत्तम फायदा झाला. त्यांनी अधिकाऱ्यांची मने वळवून राजबंद्यांना वाचण्यासाठी सर्व तऱ्हेची, सर्व विषयांवरील पुस्तके मिळविण्याची व्यवस्था केली. मुंबई, पुणे येथील कार्यकर्त्यांच्या व जाणत्या मित्रांच्या सहकार्यामुळे लायब्ररीतून आणि इतरही काही ठिकाणांहून नानाविध पुस्तके जेलमध्ये येऊ लागली. राष्ट्रीय चळवळीतील काही लोकांनी तर अशा तऱ्हेने राजकीय कैद्यांना पुस्तके पुरविण्याचे काम हेच आपले राष्ट्रीय काम मानले होते. त्यामुळे थोड्याच दिवसांत बारा नंबरच्या बराकीमध्ये एक चांगल्यापैकी लायब्ररी स्थापन झाली, असे म्हटले, तरी हरकत नाही. अर्थात या पुस्तकांचे महत्त्व मला पहिल्या प्रथम समजले नाही. ही गोष्ट खरी.
जाणते लोक बराकीत येऊन विविध विषयांवर चर्चा होऊ लागल्या आणि जेलमध्ये आमचे वास्तव्य अधिक समृद्ध व सुसंघटीत होऊ लागले. आमच्या दिनचर्या नियमाने बांधल्या गेल्या.
आम्हांला खरे तर सक्तमजुरीच्या शिक्षा झाल्या होत्या. पण आम्हां सर्वांना देण्यासारखे कठीण कामच तेथे नव्हते. पाच-पन्नास लोकांच्या गटाला ते दोन-चार तास जेलबाहेर घेऊन जात आणि कुठेतरी दगड एकत्र करून नवीन रस्ता बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते, तेथे कामाला लावत. पण तो रस्ता कधीच पुरा झाला नाही.