१९३७ चे सबंध वर्ष मी माझ्या बी. ए. च्या अखेरच्या परीक्षेच्या तयारीत घालविले. जिल्ह्यातल्या आणि इतर ठिकाणच्या पाहुण्यांची कोल्हापूरला माझ्याकडे ये-जा होती. या संदर्भातली एक आठवण सांगितली पाहिजे. पुण्याचा माझा मित्र दयार्णव कोपर्डेकर मी मागे सांगितल्याप्रमाणे साने गुरूजींच्या निकटवर्तीयांपैकी झाला होता. एक दिवस दयार्णव कोपर्डेकर आणि त्याची नियोजित वधू असे दोघे जण कोल्हापूरच्या भुसारी वाड्यातील माझ्या खोलीवर आले. मला आंनद आणि आश्चर्यही वाटले. दयार्णवने इतक्या लवकर लग्न करायचे ठरविले, हे ऐकून मला थोडे नवल वाटले. साने गुरूजींच्या परिचयातल्या कुटुंबातीलच ही मुलगी होती आणि साने गुरूजींच्या आशीर्वादाने हे लग्न ठरले होते, असे त्याने मला सांगितले. माझ्या शक्तीप्रमाणे मी त्यांचा दोन-तीन दिवस पाहुणचार केला. साने गुरूजी आणि दयार्णव यांचा निकट संबंध इतका झाला होता, की साने गुरूजींची 'श्यामची आई' ही कादंबरी दयार्णवने प्रकाशित करावी, म्हणून त्यांनी त्याच्याकडे दिली होती. आयुर्वेदाचे शिक्षण घेता घेता दयार्णव प्रकाशक झाला होता. त्याने येताना 'श्यामची आई'चे हस्तलिखित आपल्याबरोबर आणले होते. ते त्याने मला दाखविले. एका मोठ्या वहीत आपल्या स्पष्ट हस्ताक्षरात साने गुरूजींनी ही कांदबरी लिहिली होती. दयार्णवने मला ती वाचण्याचा आग्रह केला. तोपर्यंत साने गुरूजींचे लेखक म्हणून नाव काही प्रसिद्ध नव्हते. लेखक या नात्याने त्यांचा माझा परिचय नव्हता. म्हणून ते हस्तलिखित वाचण्याची फारशी उत्सुकता माझ्यामध्ये नव्हती खरी; दयार्णवच्या आग्रहाकरता मी ती त्याच्या दोन-तीन दिवसांच्या मुक्कामात वाचून काढली. ते हस्तलिखित वाचताना मात्र मी मराठी वाङ्मयात काही नवीन वाचतो आहे, असे मला जरूर वाटले.
'श्यामची आई' वाचत असताना अनेक वेळा माझे डोळे पाणावून आले. 'आई' हा शब्दच असा आहे, की त्याच्या साध्या उच्चारानेसुद्धा मी भावनेने दुबळा बनतो. आणि त्यात साने गुरूजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथंबून गेलेले व आईच्या प्रेमाने ओसंडून चाललेले होते. मी तर दयार्णवला मिठीच मारली आणि सांगितले,
''साने गुरूजी फार मोठे साहित्यिक आहेत. मला त्यांचे हस्तलिखित वाचायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो. तुझे हे प्रकाशन यशस्वी होईल, याची मला खात्री आहे.''
साने गुरूजींच्या 'श्यामची आई' या कादंबरीचा आणि माझा असा ऋणानुबंध आहे.
बी. ए. च्या परीक्षेसाठी मी राजकारण, इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेतले होते. अर्थशास्त्रावरची काही पुस्तके मी पहिल्या प्रथम तेव्हा वाचली. माझ्या आतापर्यंतच्या वाचनात हा विषय विशेष आला नव्हता. समाजवादाचा अभ्यास करताना अर्थरचनेच्या प्रश्नांचे महत्त्व मी समजून चुकलो होतो. किंबहुना समाजाच्या अर्थजीवनाची शक्ती समाजाच्या इतर कामांवरही सतत आणि महत्त्वाचा परिणाम करत असते, याही मताशी मी परिचित होतो. परंतु अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून मी यापूर्वी वाचला नव्हता. तो या निमित्ताने अभ्यासावा लागला. अर्थात आम्हांला शिकविले जाणारे अर्थशास्त्र हे समाजवादी अर्थशास्त्रापासून मूलतः वेगळे आहे. परंतु त्या क्षेत्रातल्या परिभाषेची या निमित्ताने ओळख झाली आणि पुढे मला स्वतंत्रपणाने अधिक काही वाचण्याची आवश्यकता वाटली, तर त्याची तयारी झाली. माझ्या पुढच्या राजकीय आयुष्यामध्ये अर्थशास्त्राच्या मुलभूत तत्त्वांचा केलेला अभ्यास माझ्या उपयोगी पडला.
मी सवड काढून पुणे येथे भरलेल्या कौन्सिलच्या अधिवेशनासाठी गेलो होतो. श्री. आत्माराम बापू पाटील यांनी मोठ्या अगत्याने बोलावून नेले होते आणि त्यांचा पाहुणा म्हणून मी तेथे राहिलो होतो. मी तेथे असताना मुख्यमंत्री श्री. खेर यांना भेटण्यासाठी 'महार वतन नष्ट करा' या आंदोलनाचा एक मोठा मोर्चा आला होता, तो मी पाहिला होता. डॉक्टर आंबेडकर हे त्यामध्ये स्वतः होते, की नाही, हे मला आठवत नाही, पण त्यांच्या अनुयायांनी काढलेला तो मोर्चा होता. मी त्या मोर्च्यातील काही मंडळींना जाऊन भेटलो आणि यांच्याशी बोललोही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बाळासाहेब खेरांनीही मोर्च्याला मोठ्या अगत्याने भेट दिली. पण त्या निमित्ताने डॉक्टर आंबेडकरांच्या आमच्या जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांशी ओळख झाली. जमिनी वतन म्हणून देऊन त्या मोबदल्यात जन्मभर आणि पिढयान् पिढ्या गावगाड्याचे काम करून घ्यायचे, हे या महार-वतनाचे खरे स्वरूप होते आणि ते बदलणे अत्यंत आवश्यक होते. त्यांची मागणी रास्त होती.
मला अशी आशा होती, की त्यांची ही सरळ व साधी मागणी आमचे काँग्रेस सरकार मान्य करेल आणि त्यामुळे राष्ट्रीय चळवळीपासून बाजूला राहिलेला हा समाज मुख्य प्रवाहात येईल. मी आत्माराम बापू पाटील यांच्याशी याबाबत बोललो होतो. त्यांनाही माझ्यासारखेच वाटत होते. तेव्हा त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावा, असा मी आग्रह केला. त्यांनी आपल्या मताचे चार-दोन आमदार तयार केले. परंतु त्यांचे कोणी ऐकून घेईल, असे त्यांना दिसेना.