त्यामुळे आम्हांला अतिशय योग्य माणूस नेतृत्व करायला मिळतो आहे, त्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळवून देणे ही आवश्यक बाब वाटत होती. ते ख-या अर्थाने आमच्या नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी होते. असा उमेदवार मिळत असताना आमचे ज्येष्ठ काँग्रेस नेते यांच्या नावाचा का विचार करीत नाहीत, हे मला तरी समजू शकले नाही.
आम्ही आमचा प्रयत्न तसाच पुढे चालू ठेवला. सातारचे काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते बुवा गोसावी यांच्याशी मी आणि राघूआण्णांनी पुष्कळ वेळ चर्चा केली. मी बोरगावच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माझी जी मीमांसा मांडली होती, तीच त्यांच्यापुढे सांगण्याचा प्रयत्न केला. माझी ही मांडणी बुवासाहेबांना आवडली, की नाही, हे मला सांगता येणार नाही, परंतु त्यांना ती नवी होती. ते त्या मांडणीमुळे काहीसे प्रभावित झाले आणि म्हणाले,
''मी भाऊसाहेबांशी बोलेन. तुमच्या बोलण्यात काही नवीन अर्थ आहे, आणि तो समजून घेतला पाहिजे. भाऊसाहेबांच्या मनाविरूद्ध काही होणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा.''
नंतर आम्ही इतर अनेकांशी बोललो. त्यांमध्ये सातारची दुसरी प्रसिद्ध व्यक्ती श्री. शंकरराव साठे हेही होते. ते उत्तम वकील होते. आम्ही त्यांना आम्हां तरुण मडळींची वकिली भाऊसाहेबांजवळ करण्याची विनंती केली. ते मनाने अतिशय सरळ गृहस्थ होते. त्यांनी आम्हांला काही शंका विचारल्या आणि त्यांवरून या लोकांच्या मनात नेमके काय आहे, याचा काहीसा अंदाज आम्हांला लागला. त्यांच्या मते जिल्ह्यामध्ये संघटित असलेला जो कूपर गट आहे, त्याचाही एकेक उमेदवार निवडणुकीत उतरणार आहे. करतो म्हटले, तरी त्यांचा पराभव आपण करू शकणार नाही, अशी त्यांची समजूत होती. प्रत्येक मतदार-संघातून चार उमेदवार निवडून जाणार होते. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले,
''हा तुमचा व्यवहार आम्ही समजू शकतो. आम्ही काही चार जागा मागत नाही. आम्ही फक्त एक जागा मागतो आहोत. आणि गेल्या सहा वर्षांच्या राष्ट्रीय चळवळीनंतर कूपर गटाशी भीती बाळगून किंवा हाय खाऊन जर आम्ही निवडणुकांचा विचार करणार असलो, मग आम्ही निवडणुका जिंकणार कशा?''
त्यांनी सांगितले,
''तुम्ही म्हणता, हे जरी खरे असले, तरी जी निवडणूक-पद्धती आहे, तीमध्ये आपण सर्व चारही जागा प्रत्येक ठिकाणी निवडून आणण्यात यशस्वी होऊ शकणार नाही.''
मला वाटते, त्यांचे धूर्त निदान बरोबर होते, हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले. इतर जागांसाठी मराठा समाजातील एक, ब्राह्मण समाजातील दुसरा आणि इतर अल्पसंख्याक समाजातील तिसरा असे आपण तीन उमेदवार उभे करू शकतो, असे त्यांनी आपले विश्लेषण आम्हांला सांगितले. श्री. शंकरराव साठे फार मोकळे बोलले, व्यवहार्य बोलले. त्यांनी सांगितले,
''मराठा समाजातील उमेदवार आत्माराम पाटील होऊ शकतील काय? याचा तुम्ही विचार करा. जुन्या ब्राह्मणेतर चळवळीतून वाढलेली जी मोठी वजनदार माणसे आहेत, त्यांच्यापैकी कोणा एकाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून घ्यायची जरूरी आहे, की नाही, याचाही विचार केला पाहिजेल. ही पार्श्वभूमी मनामध्ये ठेवून प्रयत्न करा, मी तुमच्या विरूद्ध नाही. या बाबतीत भाऊसाहेबांशी मी आवश्यक ते सर्व बोलेन, काही काळजी करू नका.''
या उमेदवारीसंबंधी झालेल्या चर्चांच्या पाठीमागे ज्या शंका होत्या, त्यांचा सारांश हा असा होता.
सातारचे प्रसिद्ध डॉक्टर आठल्ये यांच्याशीही आमची चर्चा झाली. ते आमच्याशी संपूर्णतया सहमत होते. ह्या वेळपर्यंत पुण्यात जाऊन प्रांतिकाच्या पातळीवर कुणाशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला नव्हता. त्याचे खरे कारण म्हणजे त्या मंडळींशी आमचा कोणाचा निकटचा संबंध आला नव्हता. वरवर ओळखीपाळखी होत्या. पण एकत्र बसून चर्चा करावी, असे संबंध नव्हते. जे संबंध होते, ते आत्माराम बापूंचे होते आणि तेही यूथ लीगच्या काही कार्यकर्त्यांशी किंवा त्यांच्या मित्रांशी होते. त्यांनी या कामासाठी पुण्याला एक चक्कर मारून त्या मंडळींमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.